Friday, 15 January 2021

उद्यापासून लसीकरण.


देशात बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण उद्या, शनिवारपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले.


करोनायोद्धय़ांना सर्वात आधी लशीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे संवादही साधणार आहेत. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.


देशातील एकूण २९३४ लसीकरण केंद्रांपैकी काही ठरावीक केंद्रांतील लाभार्थ्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी या केंद्रावरील अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीतील एम्स आणि सफदरजंग रुग्णालयांचा या केंद्रांमध्ये समावेश आहे.


आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना २९३४ केंद्रांवर लस टोचण्यात येणार आहे. एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment