बिहार राज्याची अश्रूंची नदी. मुख्य प्रवाहाची लांबी सु. ५९० किमी. ही पूर्व नेपाळच्या हिमालय प्रदेशात उगम पावते. तिचा एक शीर्षप्रवाह तर तिबेटातून येतो. उंच पर्वतांवरून येणाऱ्या सात प्रवाहांनी ती बनलेली असल्यामुळे तिला सप्त कोसी व त्या प्रदेशाला सप्तकोसिकी म्हणतात. मुख्य प्रवाह सुन कोसी हा आहे. गाधीच्या कुशिक राजाची मुलगी कौशिकी हिने पुत्रप्राप्तीनंतर नदीचे रूप घेतले. तीच कोसी नदी अशी आख्यायिका आहे. सु. ९६ किमी. दक्षिण व
नैर्ऋत्य दिशांनी वाहिल्यावर सुन कोसी पूर्व व आग्नेय दिशांस २९६ किमी. वाहते. तिला मग उत्तरेकडून अरुण व पूर्वेकडून तांबर नद्या मिळाल्यावर ती दक्षिणाभिमुख होते. भारत-नेपाळ सीमेच्या उत्तरेस ४८ किमी. छतरा येथे ती खडकाळ, अरुंद निदरीतून सपाटीवर येते.
येथपर्यंतचा तिचा प्रवाह लहानमोठे धबधबे, द्रुतवाह इत्यादींनी युक्त असून मौंट एव्हरेस्टच्या पश्चिमेस गोसाइंतान व पूर्वेस कांचनजंघा यांमधील सु. ६२,४०० चौ. किमी. पर्वतप्रदेशातील पावसाच्या व वितळलेल्या बर्फाच्या पुराचे पाणी ती आपल्या वेगवान प्रवाहाने घेऊन येते.
No comments:
Post a Comment