📋पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा वारसा सांगण्यासाठी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये शनिवारी ‘वारसास्पर्धे’ला तोंड फुटले. तृणमूलने नेताजींच्या १२५व्या जंयतीनिमित्त त्यांचा जन्मदिवस ‘देशनायक दिवस’ जाहीर केला, तर केंद्र सरकारने ‘पराक्रम दिन’ म्हणून घोषित केला.
📋तणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सकाळी कोलकात्यात मोठी मिरवणूक काढून नेताजींची जयंती साजरी केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘पराक्रम दिना’च्या कार्यक्रमात सहभागी झाले. नेताजींच्या जयंतीनिमित्त तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राज्यभर अनेक कार्यक्रम आयोजित करून परस्परांशी जणू स्पर्धाच केली.
📋तणमूल आणि भाजप यांच्यातील निवडणूकपूर्व राजकीय संघर्ष आजपर्यंत रस्त्यावर होत होता. परंतु शनिवारी नेताजींच्या १२५व्या जंयतीनिमित्त कोलकाता येथील व्हिक्टोरिया स्मारकात झालेल्या सरकारी कार्यक्रमातही निवडणुकीच्या राजकारणाने शिरकाव केल्याचा प्रत्यय आला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकाच व्यासपीठावर होते.
📋ममता भाषणासाठी उभ्या राहताच श्रोत्यांमधील भाजप समर्थकांनी जय श्रीराम घोष सुरू केला. त्यामुळे ममता यांनी भाषण करण्यास नकार दिला आणि अशा प्रकारचा अपमान अस्वीकारार्ह आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा सरकारी कार्यक्रम आहे, राजकीय नाही. निमंत्रित केल्यानंतर मान राखला पाहिजे. निमंत्रित करून कोणीही अपमानित करीत नाही, अशा शब्दांत ममता यांनी संताप व्यक्त केला.
No comments:
Post a Comment