Monday, 4 January 2021

राष्ट्रीय महिला आयोगाकडे गत वर्षभरात सर्वाधिक तक्रारी



राष्ट्रीय महिला आयोगाकडे गतवर्षी सहा वर्षांतील उच्चांकी म्हणजे २३,७२२ तक्रारींची नोंद झाली आहे. त्यातील एक चतुर्थाश तक्रारी या घरातील हिंसाचाराशी संबंधित होत्या, असे दिसून आले आहे.


✍🏻 _ उत्तर प्रदेशातून ११,८७२, दिल्लीतून २,६३५, हरियाणा १,२६६, महाराष्ट्र १,२८८ या प्रमाणे तक्रारींची संख्या आहे. एकूण २३,७२२ तक्रारींपैकी ७,७०८ तक्रारी या सन्मानाने जगण्याचा अधिकार या मुद्दय़ांवर आहेत. सन्मानाने जगण्याचा अधिकार याचा अर्थ महिलांच्या भावनांचा आदर करून केलेली वर्तणूक असा आहे. अनेक प्रकरणात महिलांच्या भावनांची कदर केलेली दिसत नाही.


एकूण ५२९४ तक्रारी या घरातील हिंसाचाराच्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले, की आर्थिक असुरक्षितता, वाढता ताण, नैराश्य, आर्थिक चिंता, भावनिक आधार नसणे, आईवडील किंवा कुटुंबाने काळजी न घेणे यातून घरगुती हिंसाचाराची प्रकरणे घडतात. शाळा, महाविद्यालये व काही प्रमाणात कार्यालये बंद असल्याने सर्व जण घरातच असल्याने महिलांना अनेक कामे करावी लागत आहेत. तसेच त्या कुटुंबाला आधार देत आहेत. या कठीण परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी महिलांना बरेच कष्ट पडत आहेत. २०२० मध्ये सहा वर्षांतील सर्वाधिक तक्रारी आल्या असून २०१४ मध्ये ३३,९०६ तक्रारी आल्या होत्या. जुलै व त्याआधीच्या काही महिन्यांत घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्या असून त्याबाबत एकूण ६६० तक्रारी आल्या आहेत. या प्रकारचा हिंसाचार हा वर्षभर चिंतेचा विषय होता, असे शर्मा यांनी सांगितले.


टाळेबंदीमुळे कोंडी


घरातील हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना आधार देणारी घरातील यंत्रणा निरुपयोगी ठरली. त्यांना बाहेरूनही मदत घेता आली नाही. कोविड १९ टाळेबंदीमुळे घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी करण्याची संधी त्यांना फार कमी मिळाली, असेही त्या म्हणाल्या. हुंडय़ासाठी छळवणुकीच्या ३,७८४ आणि विनयभंगाच्या १,६७९ तक्रारी आल्या आहेत. १,२७६ तक्रारी या पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या असून ७०४ तक्रारी या सायबर गुन्ह्य़ांबाबत आहेत. बलात्काराच्या १,२३४ तर लैंगिक छळवणुकीच्या ३७६ तक्रारी आहेत.


वाढती जागरूकता


अलीकडे बलात्काराच्या घटनांबाबत महिला बोलू लागल्या आहेत. त्यामुळे तक्रारींची संख्या वाढली आहे, असे मत महिला हक्क कार्यकर्त्यां योगिता भयाना यांनी व्यक्त केले. समाज माध्यमांमुळेही घरगुती हिंसाचाराच्या घटना समोर येण्यास मदत होत आहे. घरगुती हिंसाचाराविरोधात सरकारने खंबीर भूमिका घ्यावी, असे महिला कार्यकर्त्यां शमिना शफीक यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...