Saturday, 16 January 2021

मुंबई जगातील दुसरे सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे शहर; लॉकडाउननंतरही नकोशा यादीत समावेश



जगामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये फारशी वाहतूक नसतानाही मुंबई या नकोश्या यादीत जगात दुसऱ्या स्थानी आहे.

सन २०२० मधील सर्वाधिक वाहतूक कोंडींच्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये मॉस्को हे एकमेव शहर मुंबईपेक्षा अधिक वाहतूक कोंडी असणारं शहर ठरलं आहे.

टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये जगभरातील ५७ देशांमधील ४१६ शहरांचा अभ्यास केल्यानंतर ही यादी जाहीर केली आहे.

सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये भारतामधील आणखीन दोन शहरांचाही समावेश आहे. या यादीमध्ये बंगळुरु सहाव्या तर दिल्ली आठव्या स्थानी आहे. 

मुंबईमधील वाहतूक कोंडीची परिस्थिती दर वर्षाला बिकट होत असल्याचे चित्र या आकडेवारीमधून दिसून येत आहे. सन २०१९ आणि २०१८ च्या यादीमध्ये मुंबई चौथ्या स्थानी होती. मात्र यंदा मुंबईने दुसऱ्या स्थानी झेप घेतलीय.

जगभरातील ४०० हून अधिक शहरांमधील वाहतूक कोंडीवर अभ्यास केल्यानंतर मुंबईला दुसरं सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारं शहर म्हणून घोषित करण्यात आलं असलं तरी एक समाधानकारक बाब सुद्धा या अहवालामध्ये नमूद करण्यात आली आहे. यादीमध्ये मुंबईने दोन स्थानांनी झेप घेतली असली तरी मुंबईतील वाहतूक कोंडीचे प्रमाण हे मागील वर्षीपेक्षा १२ टक्क्यांनी कमी आहे.

सरकारी यंत्रणांना अधिक चांगल्याप्रकारे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे, सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचे नियोजन करण्यासाठी ही माहिती पुरवली जाते. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. फोटो सौजन्य : पीटीआय आणि रॉयटर्स)

No comments:

Post a Comment