Wednesday, 26 June 2024

विद्युत चुंबकत्व


विद्युतधारा जेव्हा एखाद्या वाहक तारेतून वाहते तेव्हा तिच्या सभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते व त्याच्याजवळ असलेल्या चुंबकसूचीचे विचलन होते. हा शोध इ. स. १८१९ मध्ये डेन्मार्क देशातील एक भौतिकशास्त्रज्ञ हॅन्स ओरस्टेड यांनी लावला.


जर तारेतून वाहणारी विद्युतधारा वाढवली तर चुंबकसूचीचे विचलन अधिक प्रमाणात होते. जर चुंबकसूची तारेपासून दूर नेली तर चुंबकसूचीचे विचलन कमी होत जाते. म्हणजेच दिलेल्या बिंदूजवळ निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र हे वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेच्या समप्रमाणात असते. वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र हे तारेपासूनचे अंतर वाढत गेल्यास कमी होत जाते. वर्तुळाकार तारेतून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे कोणत्याही बिंदूत तयार होणारे चुंबकीय क्षेत्र हे तारेतून वाहणाऱ्या विद्युतधारेशी समानुपाती असते. वलयाचे जर ‘न’ वेढे असतील तर निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र एका वेढय़ापासून तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या ‘न’ पट असते.


प्रत्येक चुंबकाच्या सभोवती विशिष्ट चुंबकक्षेत्र असते व ते चुंबकाच्या शक्तीनुसार कमीजास्त असते. रक पद्धतीत चुंबकीय क्षेत्राची तीव्रता वेबर/ मीटर2 Wb/(m2) या एककात मोजतात. यालाच टेस्ला (tesla) असेही म्हणतात.


नरम लोखंडाच्या सळईभोवती गुंडाळलेल्या विद्युतरोधक वेष्टित तारेतून विद्युतप्रवाह जात असल्यास; सळईमध्ये तात्पुरते चुंबकत्व येते. प्रवाह बंद केल्यास चुंबकत्व नाहीसे होते. विद्युतचुंबकाची शक्ती सळईभोवतीच्या वेढय़ांची संख्या वाढवून आणि तारेतून जाणाऱ्या प्रवाहाची शक्ती वाढवून म्हणजे जोरदार विद्युतप्रवाह वापरून अधिक करता येते. अशा तऱ्हेने तात्पुरता प्रभावी विद्युत चुंबक बनविता येतो.


कारखान्यात लोखंडाचे अवजड पदार्थ उचलण्यासाठी क्रेनमध्ये तात्पुरत्या विद्युत चुंबकाचा उपयोग करतात. तसेच याचा वापर बोटीत अथवा आगगाडीत फार अवजड लोखंडी सामान उचलून ठेवण्यासाठी होतो. विद्युतप्रवाहाची शक्ती व दाब मोजण्याची उपकरणे विद्युतप्रवाहाच्या चुंबकीय परिणामावर आधारलेली असतात. विद्युतप्रवाहदर्शक, विद्युतप्रवाहमापक व विद्युतदाबमापक ही उपकरणे बनवताना त्यात टांगलेली चुंबकसूची असते किंवा टांगलेले वेटोळे असते. विजेच्या घंटेतही विद्युत चुंबकच वापरतात.


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...