अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा संभाळल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये जो बायडेन यांनी भारतीयांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बायडेन यांनी अमेरिकेच्या इमीग्रेशन पॉलिसीमध्ये (स्थलांतर धोरणांमध्ये) मोठे बदल करण्यास सुरुवात केलीय.
बायडेन यांनी अमेरिकन काँग्रेससमोर बोलताना एक नवीन कायदा तयार करण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. या कायद्यामुळे एक कोटी १० लाख अप्रवासी नागरिकांना म्हणजेच कायमस्वरुपी अमेरिकेमध्ये स्थायिक होण्यासाठी गेलेल्या भारतीयांना स्थानिक म्हणून दर्जा मिळण्याबरोबरच अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याच्या मार्गातील अनेक अडथळे दूर होणार आहेत.
यात लाखो भारतीयांचाही समावेश आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतील कोट्यावधी अप्रवासी नागरिकांवर देश सोडून जाण्याची टांगती तलवार होती. मात्र अध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर बायडेन यांनी ट्रम्प यांचे अनेक निर्णय रद्द केले असून त्यामध्ये या स्थलांतर धोरणांमधील बदलांचाही समावेश आहे. बायडेन प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकेत स्थायिक होण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
बायडेन यांनी जारी केलेल्या नवीन आदेशामुळे कायदेशीर कागदपत्र नसतानाही अमेरिकेत वास्तव्य करत असणाऱ्यांना फायदा होणार आहे. अमेरिकेमध्ये अशा लोकांची संख्या एक कोटी १० लाख इतकी आहे. त्यापैकी पाच लाख नागरिक हे मूळचे भारतीय आहेत. बायडेन यांनी पहिल्याच दिवशी घेतलेला हा निर्णय ट्रम्प यांच्या धोरणांच्या अगदी उलट आहे.
No comments:
Post a Comment