🔶ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड -अॅस्ट्राझेनेका यांची कोविड प्रतिबंधक लस डायलिसिसवर असलेल्या एका ८२ वर्षीय रुग्णास देण्यात आली. याआधीच मान्यता दिलेल्या फायझर-बायोएनटेक लशीच्या मदतीने लसीकरणाची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.
🔶ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाची लस पहिल्यांदा या व्यक्तीस देण्यात आली. ब्रायन पिंकर असे या व्यक्तीचे नाव असून ऑक्सफर्ड विद्यापीठ रुग्णालयात ही लस देण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य सेवेने लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने सुरू केला असून ऑक्सफर्डची लस हे आता तेथील करोना विरोधी लढाईत दुसरे शस्त्र ठरले आहे. याआधी फायझर व बायोएनटेक यांच्या लशीस मान्यता देण्यात आली होती.
🔶मूत्रपिंड विकाराने डायलिसिसवर असलेल्या निवृत्त व्यवस्थापकास ऑक्सफर्डची लस देण्यात आली असून पिंकर यांनी सांगितले, की करोना विषाणूपासून संरक्षण मिळाले याचे समाधान आहे. पिंकर यांच्याव्यतिरिक्त तीन मुलांचा पिता असलेले शिक्षक ट्रेव्हर कोलेट व प्रा. अँड्रय़ू पोलार्ड यांना सोमवारी लस देण्यात आली. पोलार्ड हे बालरोगतज्ज्ञ असून ऑक्सफर्डची लस तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
🔶ऑक्सफर्ड लस गटाचे संचालक व ऑक्सफर्ड लस चाचणीचे मुख्य संशोधक प्रा. पोलार्ड यांनी सांगितले, की ऑक्सफर्ड विद्यापीठाने अॅस्ट्राझेनेकासाठी तयार केलेली लस मिळाली हा अभिमानाचा क्षण आहे. आमच्या चमूने त्यासाठी बरेच कष्ट केले होते व आता ही लस जगात उपलब्ध होत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने लस देणे गरजेचे आहे. कारण या रोगाच्या उच्चाटनात त्यांचा मोठा वाटा आहे. नव्या ऑक्सफर्ड लशीची वाहतूक व साठवणूक सोपी आहे. फायझरची लस उणे ७० अंश सेल्सियस तापमानाला ठेवावी लागते, त्यामुळे तिचा वापर सोपा नाही.
No comments:
Post a Comment