Thursday, 7 January 2021

देवतांच्या नावे यंत्र विक्रीच्या जाहिरातीवर बंदी घालण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश



देवी-देवतांच्या नावाने यंत्र-तंत्र विक्री करण्याची जाहिरात दाखविण्यावर बंदी घालावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एम. जी. शेवलीकर यांनी मंगळवारी दिले. अशा प्रकारच्या यंत्राची विक्री, उत्पादन, प्रसार व प्रचार करणाऱ्यांवर १०१३ अघोरी कृत्य आणि काळी जादू कायदा २०१३ अनुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत. केंद्र व राज्याने ३० दिवसांत अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठी काय पावले उचलली, याबाबतचा अहवाल खंडपीठास सादर करावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


विविध प्रसार माध्यमांवर धर्माच्या नावाने भीती दाखवून हनुमान चालिसा, देवीचे यंत्र आदी वस्तू विक्रीच्या जाहिराती मोठय़ा प्रमाणावर दाखविल्या जातात. सर्वसामान्य नागरिकांची अशा भोंदूगिरीच्या माध्यमातून लूट केली जाते.


राज्य शासनाच्या २०१३ मधील अघोरी कृत्य व काळी जादू कायद्यानुसार प्रसार माध्यमांवर प्रक्षेपण करता येत नाही. याविरुद्ध २०१५ मध्ये औरंगाबाद येथील राजेंद्र गणपतराव अंभोरे (रा. टाउनसेंटर सिडको औरंगाबाद) यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. समाजात विज्ञाननिष्ठ नागरिक तयार होऊन वैज्ञानिक वातावरणास गती मिळावी, अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावे यासाठी २०१३ मध्ये कायदा निर्माण केला. प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या समवेत अशा बाबींवर प्रतिबंध घालण्यासाठी एक अधिकारी नियुक्त केलेला आहे.


कायद्याच्या माध्यमातून भोंदूगिरीला वेसण घालावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. हनुमान चालिसा यंत्र विक्री करणाऱ्या जाहिरातीमधून व्यवसायात तोटा होत असेल, तर अशा प्रकारे यंत्र जवळ ठेवल्यावर लाभ होतो वगैरे दावे केले जात होते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...