Tuesday, 5 January 2021

राजस्थानमध्ये ‘बर्ड फ्लू’चा इशारा



राजस्थानच्या झालावाड जिल्ह्य़ात मृत कावळ्यांमध्ये एका भयंकर विषाणूचे अस्तित्व आढळल्यानंतर, तसेच जयपूरसह इतर काही जिल्ह्य़ांत आणखी पक्षी मृत्युमुखी पडल्यानंतर राज्यात ‘बर्ड फ्लू’चा इशारा जारी करण्यात आला आहे.


पशुसंवर्धन विभागाने एक राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, परिणामकारकरीत्या देखरेखीसाठी आपली पथके विविध जिल्ह्य़ांमध्ये पाठवली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


जयपूरमधील प्रसिद्ध जल महल येथे रविवारी ७ कावळे मृतावस्थेत आढळले. यामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्या कावळ्यांची एकूण संख्या २५२ झाली आहे.


बर्ड फ्लू रोगामुळे झालेले मृत्यू प्रामुख्याने कावळ्यांमध्ये आढळले असून, त्यापैकी बहुतांश कोटा व जोधपूर विभागांतील आहेत, असे पशुसंवर्धन खात्याचे प्रधान सचिव कुंजीलाल मीणा यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले.

‘हा विषाणू भयानक असून त्या संदर्भात आवश्यक ती मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. 


सर्व फील्ड अधिकारी आणि पोल्ट्री फार्म मालकांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे. प्रामुख्याने पाणथळ जागा, सांभर सरोवर आणि कायलादेवी पक्षी अभयारण्य यांच्यासह सर्व ठिकाणांवर परिणामकारक देखरेख सुनिश्चित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्य स्तरावर एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे’, अशी माहिती मीणा यांनी दिली. झालावाड येथे २५ डिसेंबरला कावळ्यांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. त्यांचे नमुने भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हाय- सिक्युरिटी अ‍ॅनिमल डिसिझेस (निषाद) येथे पाठवण्यात आल्यानंतर बर्ड फ्लू विषाणू आढळला, असेही मीणा यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment