Monday, 31 August 2020

राशबिहारी बोस


राशबिहारी बोस: (२५ मे १८८६ — २१ जानेवारी १९४५). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक देशभक्त. फ्रेंच चंद्रनगरच्या परंतु सिमल्याला एकटे राहून सरकारी छापखान्यात नोकरी करणाऱ्या विनोदबिहारींचा हा मुलगा. त्यांच्या जन्मतिथीविषयी तसेच जन्म स्थानाविषयी एकवाक्यता नाही. बहुतेक तज्ञांच्या मते त्यांचा जन्म आजोळी सुबलदाह (बरद्वान) येथे झाला; पण आई लगेच गेली.  सावत्र आई व आजोबा कालिचरण यांनी संगोपन केले. चंद्रनगरला किंवा आजोळी कोणत्याच शाळेत हा आडदंड मुलगा स्थिर झाला नाही. उलट विद्यार्थिदशेतच चंद्रनगरच्या तरुण क्रांतिकारी गटाशी त्याने सूत जमविले होते. श्रीष घोष व अमरेंद्र चतर्जी यांनी त्याला क्रांतिदीक्षा दिली होती. मुलगा शिकत नाही म्हणून वडिलांनी त्याला पुढे सिमल्याला आणले. घरीच इंग्रजी व टंकलेखन शिकविले. दोन्हीत चांगली प्रगती झाल्यावर आपल्याच छापखान्यात चिकटवून दिले. स्वतंत्र वृत्ती व क्रांतीकडे ओढा असल्यामुळे घर सोडून दूर डेहराडूनला जंगल खात्यात राशबिहारींनी नोकरी धरली. १९०८ पासून १९१३ पर्यंत वारंवार रजा घेत असूनसुद्धा कशीबशी नोकरी टिकली. त्या वेळी बंगालच्या अनेक शहरांतून त्याचप्रमाणे बनारस, दिल्ली, लाहोर इ. शहरांतून क्रांतिगट कार्यरत होते.
प्रत्येक गटात एक तरी बंगाली असायचाच. त्यामुळे राशबिहारींना या सर्वांशी संबंध ठेवणे सुलभ गेले. १९१२ च्या मध्यास त्यांनी बंगाल-चंद्रनगरला जाऊन बाँब व बाँब साहित्य आणि अनेक तरुण क्रांतिकारक जमविले. बसंतकुमारला आपल्या घरी बरेच महिने ठेवून पूर्ण संधा दिली. बंगाली व पंजाबी क्रांतिकारी नेत्यांच्या सल्ल्याने व्हाइसरॉयवर बाँब टाकण्याची योजना आखली. बंसतकुमार तयार झाल्यावर त्यास लाहोरला धाडले. २२ डिसेंबरला लॉर्ड चार्ल्स हार्डिंग मोठ्या मिरवणुकीने दिल्ली येथे प्रवेश करून तेथे भारताची राजधानी सुरू करणार होते. आदल्या दिवशी राशबिहारी डेहराडूनहून व बसंतकुमार लाहोरहून दिल्लीला आले. एका क्रांतिकारक मित्राकडे दोघेही उतरले. दुसऱ्या दिवशी हत्तीच्या अंबारीत दिमाखाने बसलेल्या व्हाइसरॉयसाहेबांवर बसंतने बाँब फेकला. हार्डिंगना गंभीर इजा झाली. शरीररक्षक ठार झाला. राशबिहारी बरोबर होतेच. दोघेही नंतर लाहोर-डेहराडूनला परतले. पुढे राशबिहारींनी पुरविलेल्या बाँबच्या साहाय्याने व बसंतकुमारच्या मदतीने लाहोर गटाने धमाल उडवून दिली; पण शेवटी बिंग फुटले. दिल्ली कटाच्या खटल्यात बसंतकुमारसह चौघांना फाशी देण्यात आले. राशबिहारींवर वॉरंट होते; पण ते बनारसला गेले. तेथल्या अनुशीलन गटाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपविण्यात आले.
गदर चळवळ १९१४ च्या महायुद्धानंतर सुरू झाली. गदर क्रांतिकारकांच्या हालचाली सॅन फ्रॅन्सिस्कोपासून पंजाबपर्यंत पसरल्या होत्या. विष्णुपंत पिंगळे बनारस गटाचे साह्य घेण्यासाठी राशबिहारींना बनारसलाच भेटले. ज्या पंजाबमध्ये मुख्य उठाव योजिला होता, तेथेच समर्थ नेतृत्वाची उणीव होती. पिंगळ्यांच्या विनंतीवरून राशबिहारींनी पंजाबच्या गदर उठावाची योजना तयार करण्याचे मान्य केले. थोड्याच अवधीत त्यांनी सुसूत्रता आणली. क्रांतिकारकांचा विश्वास संपादन केला; पण एका घरभेद्यानेच संकल्पित उठावाची खडान् खडा माहिती पुरविल्यामुळे आदल्या दिवशीच धरपकडी झाल्या. या वेळीही राशबिहारी पोलिसांचे हाती लागले नाहीत. निरनिराळ्या खटल्यांतून ते फरारी आरोपी म्हणून जाहीर करण्यात आले होते. हजारो रुपयांची इनामे घोषित झाली होती.
अनेक भाषांवर प्रभुत्व, गुप्ततेच्या नियमांचे काटेकोर पालन, चाणाक्षपणा, हजरबाबीपणा आणि बेमालूम वेषांतरे करण्याची हातोटी, यांमुळे ते पुढे काही महिने पंजाब, बनारस, चंद्रनगर येथे राहू शकले. शेवटी जून १९१५ मध्ये ते जपानला पवननाथ टागोरांच्या पारपत्राच्या मदतीने निसटले. तेथेही युद्ध संपेपर्यंत त्यांनी क्रांतिकार्य चालू ठेवले होते. जपानी सरकारने त्यांना पकडण्याचे व ब्रिटिशांच्या हवाली करण्याचे हुकूम काढले. तेव्हा ते तेथेही अज्ञातवासात गेले. पुढे शोभा व जपानी युवतीशी विवाह केल्यामुळे काही वर्षांनी म्हणजे १९२३ साली त्यांना जपानी नागरिकत्व मिळाले. पुढील १८-१९ वर्षे त्यांनी लेखन-भाषणाद्वारे हिंदी स्वांतत्र्याच्या प्रश्नावर जपानी जनतेमध्ये जाणीव निर्माण करण्याचा अखंड प्रयत्न केला. जपानी जीवनाशीही ते समरस झाले होते.
पूर्व आशियातील हिंदी लोकांची १९४२ च्या मार्चमध्ये भव्य परिषद घेऊन त्यांनी हिंद स्वराज्य लीग स्थापन केली. हिंदी युद्धकैदी व इतर नागरिकांमधून आझाद हिंद फौज उभी करण्याचे कामीही त्यांनी हातभार लावला. जुलैमध्ये लीगचे दुसरे अधिवेशन बँकॉकला भरले. त्यात आझाद हिंद सेनेला जपानी सेनेच्या समान दर्जा मिळावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच राशबिहारींच्या नेतृत्वाखालच्या अस्थायी सरकारचे व आझाद हिंद फौजेचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी जपानला यावे असे जाहीर आवाहन नेताजी सुभाषचंद्र बोस यांना करण्यात आले. वर्षभराने नेताजींकडे दोन्ही संघटना सुपूर्द करून मोठ्या आनंदाने राशबिहारींनी प्रमुख सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांचा तरुण मुलगा महासिदे जपानी फौजेत होता. त्याला ब्रिटिश सेनेशी झालेल्या लढाईत वीरमरण आले. दुसरे महायुद्ध चालू असतानाच त्यांनी देह ठेवला. त्यांची पत्नी शोभा व मुलगी टेटूकी पुढे जपानमध्येच स्थायिक झाल्या.

श्रीपाद अमृत डांगे

: (१० ऑक्टोंबर १८९९ - २२ मे १९९१)  एक ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते व कामगार पुढारी. नासिक येथे सामान्य कुटुंबात जन्म. शालेय शिक्षण नासिक येथे. उच्च शिक्षणाकरिता ते मुंबईचा विल्सन महाविद्यालयात आले. विद्यार्थिदशेत त्यांनी चळवळीत भाग घेतला. महाविद्यालयात बायबलच्या सक्तीचा पठणास विरोध केला. गांधींच्या असहकाराच्या चळवळीत सहभागी होण्याकरिता बी.ए.ला असताना महाविद्यालयीन शिक्षणास कायमचा रामराम ठोकला. पण गांधीच्या तत्त्वज्ञानाने भ्रमनिरास झाला, म्हणून ते राष्ट्रवादाकडून साम्यवादाकडे वळले आणि गांधी व्हर्सस लेनिन (१९२१) हे पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकाने मानवेंद्रनाथ रॉय यांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले. साम्यवादी विचारांचा प्रचारार्थ त्यांनी सोशॅलिस्ट हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र १९२२ मध्ये सुरू केले. या वृत्तपत्रातून त्यांनी इंडियन सोशॅलिस्ट लेबर पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले. कानपूर-बोल्शेव्हिक कटात भाग घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक होईपर्यंत हे वृत्तपत्र चालू होते (१९२४). या वृत्तपत्रामुळे मानवेंद्रनाथ रॉय यांनी चौथ्या कम्युनिस्ट इंटरनॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनास डांगे यांना चार्ल्स ॲश्ले यांच्यामार्फत नियंत्रण पाठविले; पण डांगे मॉस्कोला १९४६ पर्यंत जाऊ शकले नाहीत.
डांगे मुंबईत कामगारांमध्ये काम करीत असता आर्. बी. लाटवाला या गिरणीमालकाशी त्यांचा परिचय झाला. डांग्यांना आपल्याकडे नोकरीस घेण्याकारिता त्यानी विठ्ठलभाई पटेलांमार्फत प्रयत्न केले. पटेल बंधूंशी डांग्यांचे प्रथमपासून मित्रत्वाचे संबंध होते. १९२४ मध्ये डांगे तुरुंगात गेले व १९२७ मध्ये त्यांची सुटका झाली. १९२६–२७ चा कामगार चळवळींना मुंबईमध्ये जोर चढला. डांग्यांनी गिरणी कामगारांची संघटना श्रीपाद अमृत डांगेश्रीपाद अमृत डांगे उभी करण्यास प्रारंभ केला. डांगे अखिल भारतीय ट्रेंड युनियन काँग्रेसचे (आयटकचे) सहसचिव झाले. चळवळीच्या प्रसाराकरिता त्यांनी क्रांति (१९२७) हे मराठी साप्ताहिक काढले. थोड्यास अवधीत ते गिरणी कामगारांचे पुढारी झाले. कलकत्ता येथील अखिल भारतीय कामगार व कृषी पक्षाच्या आधिवेशनास ते हजर राहिले (१९२८). १९२९ मध्ये त्यांना मीरत कटात सामील झाल्याबदल पुन्हा अटक झाली आणि सात वर्षांच्या शिक्षेनंतर १९३५ मध्ये ते सुटले. या वेळी ब्रिटिश सरकारने कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली होती. तथापि डांगे त्या पक्षाचा प्रसार व प्रचार गुप्त रीत्या करीत असत. १९३९ मध्ये त्यांनी महागाई भत्त्याच्या प्रश्नावर गिरणीकामगारांचा संप प्रदीर्घ काळ चालविला. त्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली.
१९४३ मध्ये ते सुटले व आयटकचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९४६ मध्ये कम्युनिस्ट पक्षातर्फे ते मुंबईच्या विधानसभेवर निवडून आले आणि १९५७ च्या निवडणुकीत त्या पक्षातर्फे ते लोकसभेवर निवडले गेले. १९४५ मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनच्या कमिटीवरही त्यांची निवड झाली. त्यांनी १९४६ मध्ये यूरोपचा दौरा करून मॉस्को, लंडन, पॅरिस, वगैरे शहरांना भेटी देऊन तेथील कामगार नेत्यांशी चर्चा केली. लोकसभेत एक निर्भिड व सडेतोड संसदपटू म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळविली. तत्पूर्वी ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी झाले व गोवा विमोचन समितीचे ते अध्यक्ष होते. १९६२ च्या भारत–चीन युद्धात त्यांनी नेहरू सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. पण नंतर कम्युनिस्ट पक्षात लवकरच फाटाफूट झाली (१९६४). त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष झाले. प्रथमपासून त्यांचा साम्यवाद रशियानुकूल असल्यामुळे चीन–रशिया वैचारिक संघर्षात त्यांनी रशियाची बाजू घेतली. १९७१ मध्ये पुन्हा त्यांची कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनचे ते अध्यक्ष झाले. डांगे हे व्यवहारी राजकारणपटू आहेत. त्यांचा साहित्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यांचा अभ्यास सखोल असून त्यांचे ग्रांथिक आणि स्फुटलेखन विपुल आहे. इंडिया फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी (१९४९) व व्हेन कम्युनिस्ट डिफर (१९७०) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
खासगी जीवनात स्पष्टवक्ता, विश्वासू मित्र म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. त्यांनी आपल्या विचारांशी सहमत असलेल्या विधवा उषाताईंशी १९२८ मध्ये विवाह केला. त्यांचा अमृतमहोत्सव १९७४ मध्ये साजरा झाला. या प्रसंगी सोव्हिएट रशियाने आपले सर्वोच्च ‘लेनिन पदक’ देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. या प्रसंगी त्यांच्याविषयी एक स्मरणिका व गौरवग्रंथही प्रसिद्ध झाला आहे.

बद्रुद्दीन तय्यबजी

बद्रुद्दीन तय्यबजी : (१० ऑक्टोबर १८४४–१९ सप्टेंबर १९०६). राष्ट्रीय काँग्रेसच्या आद्यपर्वातील एक थोर मुस्लिम पुढारी आणि मुस्लिम समाजात निधर्मवादी भूमिका घेणारे व गोषा पद्धतीविरुद्ध प्रचार करणारे पहिले समाजसुधारक. त्यांचा जन्म मुंबई येथे अरबमुसलमान कुटुंबात झाला. त्यांची आई अमीना आणि वडील भाई मियान हे सनातनी सुलेमानी मुसलमान कुटुंबातील होत, तरीही बद्रुद्दीननी पुढील आयुष्यात पाश्चात्य शिक्षणाची कास धरली आणि लंडनमध्ये पुढील शिक्षणासाठी वास्तव्य केले; पण शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नेत्ररोगामुळे त्यांना मुंबईस परतावे लागले. आपल्या लंडनमधील वास्तव्यात नेहमीच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्यांनी फ्रेंच, उर्दू, फार्सी, अरबी वगैरे भाषांचा अभ्यास केला. भारतात एक वर्षभर राहून पुन्हा ते इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेले. तत्पूर्वी त्यांनी रहत–उन–नफ्स या युवतीबरोबर विवाह केला. १८६७ मध्ये ते बॅरिस्टर होऊन भारतात परत आले आणि मुंबईस कायदेपंडित म्हणून त्यांनी लवकरच नावलौकिक मिळविला. सु. दहा वर्षे त्यांनी वकिली केली. १८७१ मध्ये त्यांनी सार्जवनिक कार्यास प्रारंभ केला आणि १८८२ मध्ये ते मुंबईच्या कायदेमंडळावर निवडून आले. १८८५ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले. त्यात बद्रुद्दीन यांनी सर्व सहकार्य दिले; पण अधिवेशनास ते हजर राहू शकले नाहीत. मात्र १८८७ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या मद्रास अधिवेशनाचे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले. १८७८ मध्ये पडलेल्या दुष्काळात तसेच १८९८ मधील प्लेगच्या साथीच्या वेळी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले व जनतेस सर्वतोपरी मदत दिली. १८७६ मध्ये भावाच्या सहकार्याने त्यांनी मुसलमानांच्या शिक्षणाकरिता अंजुमन-ई-इस्लाम या शिक्षणसंस्थेची स्थापना केली. मुसलमान समाजाचा मागासलेपणा घालविण्यासाठी त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाचे कार्य केले. गोषा पद्धतीविरुद्ध त्यांनी मोहीम काढली. त्यांनी आपल्या घरातून पडदापद्धती बंद करून मुलींना शिक्षणासाठी परदेशात पाठविले. संमतिवयाच्या कायद्याला हिंदू आणि मुसलमान यांचा विरोध असतानासुद्धा त्यांनी १८९१ मध्ये पाठिंबा दिला.
मुंबईच्या उच्च न्यायालयाचे १९०२ मध्ये ते न्यायाधीश झाले. हा मान मिळविणारे ते पाहिले भारतीय होते. न्यायालयात राष्ट्रीय काँग्रेसची निंदा करण्यास त्यांनी मज्जाव केला; तसेच लो. टिळकांना तीन न्यायाधीशांनी जामीन नामंजूर केला असता, त्यांनी तो मंजूर केला. एक निस्पृह व निःस्वार्थी न्यायाधीश म्हणून त्यांनी लौकिक मिळविला. महात्मा गांधींनी ‘काँग्रेसच्या सर्व सभांमधील एक महत्त्वाचा निर्यायक दुवा’ असे त्यांचे वर्णन हरिजन (१८ नोव्हेंबर १९३९) मध्ये केले होते. तय्यबजी लंडन येथे मरण पावले.

मदर तेरेसा


 : (२६ ऑगस्ट १९१० - ५ सप्टेंबर १९९७)  एक थोर मानवतावादी समाजसेविका. भारतात स्थायिक झालेल्या अँल्बेनियन महिला व शांततेच्या नोबेल पारितोषिकाची मानकरी. तेरेसाचे पूर्ण नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू. तिचा जन्म रोमन कॅथलिक अँल्बे-नियन कुटुंबात स्कॉपये (यूगोस्लाव्हिया) येथे झाला. तेरेसाचे वडील किराणामालाचे दुकानदार होते आणि आई शेतकर्‍याची मुलगी.    तिचे बालपण सुखात गेले. स्कॉपथे येथील सरकारी शाळेत शिक्षण घेत असताना ती सेवाकार्यांत रस घेत असे. अठराव्या वर्षी सिस्टर्स  ऑफ लॉरेटो या आयरिश संघात तिने प्रवेश केला. नंतर एक वर्ष  डब्लिन (आयर्लंड) येथे तिने इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर   तिने जोगीण बनून पूर्णतः मिशनरी कार्यास वाहून घेतले. त्या कार्यानिमित्त ती भारतात कलकत्ता येथे लॉरेटो मिशनच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये भूगोल विषयाची अध्यापिका म्हणून रूजू झाली (१९२९).
स्पॅनिश योगिनी संत तेरेसाच्या नावाने तिचे नामान्तर झाले आणि पुढे मातृवत सेवाधर्मामुळे ती ‘मदर तेरेसा’ या नावाने ओळखली जाऊ लागली. तिने १९ वर्षे अध्यापन केले. ती प्राचार्य    झाली; अध्यापन करीत असताना शाळेजवळील मोती झील झोपडपट्टी-तील गरिबांच्या दीन जीवनाचे तिला अनेक वेळा दर्शन होत असे.  त्यामुळे तिच्या मनात अपंग, पददलित, शोषित, पीडित, दीनदुबळे इत्यादींची सेवा करावी, हे विचार येत. किंबहुना हीच ईशसेवा होय,   असे विचार तिच्यात दृढमूल झाले. एकदा  दार्जिलिंगला जात असताना ‘तू गरिबांच्या सेवेला लाग’ असा जणू दैवी संदेशच तिला मिळाला.  तेव्हा शैक्षणिक जबाबदारीतून मुक्त होऊन तिने केवळ निराश्रित व दीनदुबळे यांच्या सेवेस आमरण वाहून घेतले.
या कार्यासाठी तिने पोपची परवानगी मिळविली आणि कलकत्ता येथे मिशनरिज ऑफ चॅरिटी ही सेवाभावी संस्था स्थापन केली    (१९५०). पुढे या संस्थेचे रूपांतर संघात झाले. तिच्या विचारांशी सहमत असणार्‍या स्त्री-अनुयायीही कार्यकर्त्या म्हणून तिला लाभल्या. सुरूवातीस समाजातील उच्चभ्रू लोकांकडून तेरेसासह सेवाभावी महि- लांची खूप हेटाळणी व अवहेलना झाली. तेरेसाला तर लोक सेंट ऑफ द गटर्स म्हणत; तथापि या टीकेला न जुमानता तिने सेवाकार्य अखंड चालू ठेवले. विशेषतः मृत्युशय्येवरील व्यक्तीस अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजांबरोबर सहानुभूती, सांत्वन व प्रेम यांची नितांत गरज असते, हे तेरेसाने जाणले आणि इतरांनाही दाखवून    दिले. या संस्थेच्या जोगिणी गटारात, उकिरड्यात व इतरत्र टाकून दिलेल्या उपेक्षित मुलांचे मातृप्रेमाने संगोपन करू लागल्या. मुलांसाठी तिने स्वतंत्र अनाथ आश्रम काढले. तसेच बेवारशी, निर्वासित, निराश्रित व रोगीपीडित मरणोन्मुख व्यक्तींसाठी होम्स फॉर द डायिंग डेस्टिट्यूट्स (निर्मल हृदय) हे आधार आश्रम स्थापन केले (१९५२). १९६४ मध्ये तेरेसाने पश्चिम बंगालमध्ये कुष्ठगृहाची स्थापना केली. या लोकांची सेवा करण्यात ती स्वतःस कृतार्थ मानू लागली; कारण   त्यांची सेवा म्हणजे येशूचीच सेवा होय, अशी तिची धारणा आहे. ती स्वतःस ख्रिस्ताची विनम्र दासी मानत असे.
तिच्या कार्याचा कालानुरूप व्याप वाढला आणि कुष्ठरोग रूग्णालये, अनाथालये, महिला-अपंग-वृद्धांची आश्रमगृहे, फिरते दवाखाने, मरणोन्मुखांसाठी आधारगृहे, शाळा इ. विविध संस्था भारतात व भारतेतर देशांत पसरल्या. तेव्हा कार्यकर्त्यांची उणीव भासू लागली. या संस्थांत १९६२ पर्यंत फक्त सेविकांनाच प्रवेश होता; परंतु तेरेसाने मिशनरी ब्रदर्स ऑफ चॅरिटी ही वेगळी संघटना स्थापन करून पुरूष सेवकांना त्यात प्रवेश दिला. या संघात २,००० जोगिणी व ४०० ब्रदर्स कार्य करतात (१९८३).
मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या शाखा व उपशाखा जगभर ५२ देशांत प्रसृत झाल्या असून एकूण २२७ ठिकाणी संस्थेची सेवाकेंद्रे आहेत. भारतात व इतर देशांत संस्थेने चालविलेल्या ९८ शाळा, ४२५ फिरती रूग्णालये, १०२ कुष्ठरोग उपचार केंद्रे, २८ शिशुभवने, ४८ अनाथा-लये व ६२ आश्रमगृहे आहेत. महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद, विलेपार्ले या ठिकाणीही सेवा केंद्रे आहेत. मुंबई येथे आशादान नावाचे स्वीकार- गृह १९७६ मध्ये सुरू करण्यात आले. त्यात शिशुभवन, निर्मल हृदय व रूग्णांची सेवा या तिन्ही शाखा एकत्र केल्या आहेत. या संस्था-साठी लागणारा खर्च विविध देणग्यांतून तसेच तेरेसाला मिळालेल्या पारितोषिकांच्या रक्कमेतून करण्यात येतो.
दारिद्र्य, भूक, दुर्दशा आणि गर्भपातादी प्रकार यांमुळे कोणत्याही देशाची शांतता धोक्यात येते, असे तिचे मत आहे. म्हणून प्रथम या शत्रूंना दूर केले पाहिजे; यासाठी दुःखी व अपदग्रस्त लोकांची सेवा   हाच एकमेव मार्ग आहे. या तिच्या सेवाकार्याची दखल घेऊन १९७९ चे शांततेचे नोबेल पारितोषिक तिला दिले. याशिवाय तिला त्रेचाळीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानसन्मान लाभले. त्यांपैकी मागसाय-साय पारितोषिक (१९६२), पोपचे शांतता पारितोषिक (१९७१),  नेहरू पुरस्कार (१९७२), पद्मश्री देशिकोत्तमा, नॉर्वे लोकपारितोषिक   (१९७९), भारतरत्न (१९८०) इ. महत्त्वाची व मानाची आहेत.   विविध मान्यवर विद्यापीठांनी तिला डॉक्टरेट ही सन्मान्य पदवीही   दिली आहे. ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा अत्युच्च ब्रिटिश पुरस्कार राणी दुसरी एलिझाबेथ हिने २४ नोव्हेंबर १९८३ रोजी तिच्या मानवतेच्या  श्रेष्ठ सेवेबद्दल दिला. मदर तेरेसाचे विचार स्फुटलेखांद्वारे ए गिफ्ट    फॉर गॉड (१९७५) या पुस्तकात संकलित केले आहेत.
‘मदर ऑफ द मॅनकाइंड’ म्हणूनच तिच्या ठायी वसत असलेल्या मातृत्वाच्या भावनेला गौरवाने उल्लेखण्यात येते. तिचे कार्य अति- श्रमाचे आणि कष्टाचे आहे. पीडितांना प्रेम देऊन त्यांचे जीवन सुसह्यकरण्याचा तिचा प्रयत्न जगन्मान्य झाला आहे. अपरिमित, आभाररहित अखंड कष्ट म्हणजेच मदर तेरेसा, असे समीकरण झाले आहे.

शिवराम हरि राजगुरू

 : (२४ ऑगस्ट १९०८ - २३ मार्च १९३१) भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक. त्यांचा जन्म मध्यम वर्गीय कुटुंबात पुणे जिल्ह्यात खेड येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीस गेले. तेथे हनुमान व्यायाम शाळेच्या वातावरणात त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली. वयाच्या १५ व्या वर्षी ते बनारसला संस्कृत अध्ययनासाठी गेले. तेथे न्यायशास्त्रातील मध्यमा परीक्षा ते उत्तीर्ण झाले. लघु सिध्दान्त कौमुदीचा त्यांनी अभ्यास केला. त्यांना संस्कृत व मराठीखेरीज इंग्रजी, कन्नड, मलयाळम्, हिंदी व उर्दू या भाषाही चांगल्या अवगत होत्या. शिवाजी आणि त्यांची गनिमी युध्दपध्दती यांबद्दल त्यांना विशेष कौतुक होते. काही काल ते काँग्रेस सेवा दलातही होते. बनारसला असतानाच त्यांची सचिन्द्रनाथ संन्याल, चंद्रशेखर आझाद आदी क्रांतिनेत्यांशी ओळख झाली. हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीमध्ये दाखल होऊन त्यांनी उत्तर भारतात क्रांतीकार्यात भाग घेतला. रघुनाथ या टोपणनावाने ते प्रसिध्द होते. पुढे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी सुरू झाल्यावर ते या क्रांतिसैन्याचे सैनिक बनले. त्यांचा बंदुकीचा नेम अचूक होता. त्यानंतर त्यांची भगतसिंग, जतीनदास, सुखदेव आदी नेत्यांशी, विशेषतः पंजाबी क्रांतिनेत्यांशी मैत्री झाली.
शिवराम हरी राजगुरूसायमन कमिशन विरोधी निदर्शनात पोलीस हल्ल्यात लाला लजपतराय जबर जखमी झाले. त्यामुळे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी या थोर पंजाबी नेत्याला मृत्यू आला. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा पंजाबी क्रांतिनेत्यांनी निर्धार केला. यासाठी चंद्रशेखर आझाद, शिवराम राजगुरू, भगतसिंग आणि जयगोपाल यांची नेमणूक करण्यात आली. चंद्रशेखर आझाद व राजगुरू हे दोघेही संयुक्त प्रांतातून आले. पंजाब आणि उत्तर प्रदेश शाखेच्या नेत्यांनी संयुक्तपणे लाहोरमध्ये ही कृती केली. ब्रिटिश पोलीस अधिकारी साँ डर्स याच्यावर लाहोरला १७ डिसेंबर १९२८ रोजी हल्ला झाला, तेव्हा पहिल्या दोन गोळ्या राजगुरूंनी झाडल्या. पंजाबी नेते पुढे कौन्सिल हॉलमधल्या बाँ बफेकीनंतर पकडले गेले; पण आझाद व राजगुरू सु. दोन वर्षे अज्ञात स्थळी भूमिगत होते. साँ डर्स वधानंतर २२ महिन्यांची म्हणजे ३० सप्टेंबर १९२९ रोजी राजगुरूंना पुण्यात अटक झाली. त्यांना भगतसिंग, सुखदेव यांच्याबरोबर लाहोरच्या कारावासात सुळावर चढविण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या जन्मगावाचे राजगुरूनगर असे नामांतर करण्यात आले.

डॉ. झाकिर हुसेन


(८ फ्रेब्रुवारी १८९७ – ३ मे १९६९ ). भारताचे तिसरे राष्ट्रपती व एक ख्यातनाम शिक्षणतज्ञ. त्यांचा जन्म अफ्रिडी अफगाण मुसलमान कुटुंबात हैदराबाद (सिंध) येथे झाला. त्यांचे वडील वकील होते; पण झाकिर हुसेन नऊ वर्षांचे होते, तेव्हा ते वारले. त्यामुळे शिक्षणासाठी त्यांस अनेक ठिकाणी हिंडावे लागले. इटावा, अलीगढ आणि बर्लिन या ठिकाणी शिक्षण घेऊन अखेर त्यांनी अर्थशास्त्र विषयात पीएच्.डी. ही पदवी मिळविली. ही पदवी मिळविण्यापूर्वी ते १९२० मध्ये ⇨जामिआ मिल्लिया इस्लामिया या शिक्षणसंस्थेकडे आकर्षित झाले होते. जर्मनीहून भारतात परत येताच, त्यांनी आपले सर्व जीवन या संस्थेस समर्पित केले. १९२५ मध्ये ही संस्था दिल्लीस हलविण्यात आली व तिचे झाकिर हुसेन १९२६ मध्ये कुलगुरू झाले. त्यांनी जवळजवळ बावीस वर्षे (१९२६–४८) या संस्थेचे कार्य केले व तिला एका अभिनव शिक्षणसंस्थेचे स्वरूप दिले. शैक्षणिक वाटचालीतील त्यांची स्फूर्तिस्थाने दोन होती : म. गांधी व जर्मन शिक्षणशास्त्रज्ञ केर्शेनस्टाइनर. विद्यापीठात बौद्धिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य पुरेपुर असावे आणि व्यासंगी विद्वानांचे ते सभास्थान व्हावे; कारण अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे नीतिधैर्य विकास पावते अशी त्यांची धारणा होती. त्यांनी स्वयंशिक्षणावर भर देऊन नव्या शैक्षणिक कल्पना जामिआ मिल्लियामध्ये रुजविल्या. ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू झाले (१९४८–५६). १९५६ साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले (१९६२). १९६७ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले.
अनेक शैक्षणिक समित्यांवर त्यांनी काम केले. त्यांपैकी यूनेस्को, विद्यापीठ अनुदान आयोग, मध्यवर्ती माध्यमिक मंडळ, विद्यापीठीय शैक्षणिक आयोग ह्या काही महत्त्वाच्या संस्था होत. त्यांना अनेक परदेशीय आणि भारतीय विद्यापीठांनी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले. भारत सरकारने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव पद्मविभूषण (१९५४) आणि सर्वोच्च असा भारतरत्न (१९६३) हा पुरस्कार देऊन केला. महात्मा गांधींचे ते प्रथमपासून निष्ठावान अनुयायी होते. महात्माजींनी त्यांना मूलोद्योग शिक्षण समितीचे १९३७ मध्ये अध्यक्ष केले. आयुष्यभर त्यांनी या शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला.
त्यांनी शिक्षण, अर्थशास्त्र वगैरे विषयांचे आपले विचार अनेक व्याख्यानांद्वारे मांडले. त्यांपैकी काही व्याख्याने द डायनॅमिक युनिव्हर्सिटी या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. जर्मन भाषेमध्ये त्यांनी म.गांधींचे चरित्र लिहिले, तसेच प्लेटोच्या रिपब्लिकचे उर्दूत भाषांतर केले. लहान मुलांकरिता काही गोष्टीही त्यांनी लिहिल्या.
स्फटिकांचा आणि चित्रविचित्र खड्यांचा संग्रह करणे, हा त्यांचा आवडता छंद होता. ते ग्रंथप्रेमी होते व त्यांचे ग्रंथालय नव्या नव्या ग्रंथांनी नेहमी भरलेले असे. राष्ट्रपती असतानाच नवी दिल्ली येथे ते हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. एक नेमस्त, चारित्र्यवान व शिक्षणतज्ञ असा राष्ट्रीय मुस्लिम नेता म्हणून त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे.

रामकृष्ण परमहंस


(१८ फेब्रुवारी १८३६–१५ ऑगस्ट १८८६). एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगविख्यात सत्पुरुष. मूळ नाव गदाधर, वडील क्षुदिराम चतर्जी, आई चंद्रामणीदेवी. गदाधरांचा जन्म कलकत्त्यापासून सु. १०० किमी. दूर असलेल्या कामारपुकुर या खेड्यात व शालेय शिक्षण गावातील धर्मदास लाहा यांच्या शाळेत केवळ एकदोन इयत्ता इतकेच झाले. अगदी लहानपणापासून ईश्वरभक्ती व साधुबैरागी यांकडे त्यांची ओढ होती.काळ्याभोर ढगांच्या पृष्ठभूमीवरून आकाशातून उडत चाललेली पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची रांग पाहून गदाधरांचे भान नष्ट झाले. भक्तिपर गाणी ऐकताना, शिवाची भूमिका नाटकात करीत असतानाही तसाच भावावेश होई. ईश्वराशी मन असे तन्मय होण्याची जन्मसिद्ध प्रवृत्ती त्यांच्या ठायी होती व ती सतत टिकून राहिली. १८४३ मध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.
गदाधरांची नवव्या वर्षी मुंज झाली. आधी शब्द दिला होता म्हणून मुंजीच्या वेळी पहिली भिक्षा त्यांनी धानी लोहारणीकडून घेतली. हे परंपरेहून वेगळे पाऊल होते.उदरनिर्वाहासाठी पाठशाळा चालवणारा थोरला भाऊ राजकुमार याने १८५२ मध्ये गदाधरांना कलकत्त्यास आणले. शाळेत शिकण्याचा विषय काढला, तर गदाधरांनी म्हटले, ‘मला भातभाकरीची विद्या नको, ईश्वरदर्शन होईल अशी विद्या हवी’. कलकत्त्यापासून सु. ६ किमी. वरील दक्षिणेश्वर या खेड्यात गंगेच्या तीरावर १८५५ मध्ये राणी रासमणीने उभारलेल्या कालीमातेच्या मंदिरात रामकुमार पुजारी झाला. शुद्राची सेवा ब्राह्मणाने करू नये, या कारणासाठी प्रथम नकार दिलेल्या गदाधरांनी राणी रासमणीचे जावई व मंदिराचे व्यवस्थापक मथुरानाश विश्वास यांच्या आग्रहावरून वर्षभराने ते पुजारीपण स्वीकारले. १८५६ मध्ये रामकुमारचा मृत्यु झाला.
यानंतर गदाधरांची ईश्वरभक्ती उत्कट होत चालली. मंदिराजवळच्या पंचवटीतील वडाच्या झाडाखाली ते रात्री जात. धोतर सोडून ठेवीत, ब्राह्मणत्त्वाचे चिन्ह असे यज्ञोपवीत काढून ठेवीत आणि ध्यानधारणा करीत. उत्कटता वाढत चालली. रात्र व दिवस यांचे भान नष्ट होत गेले. ‘आई, दर्शन दे’ असा आक्रोश सुरू झाला. अशा वेळी तहानभुकेची वा अंगावरच्या वस्त्राचीही शुद्ध त्यांना राहत नसे.भाचा हृदय हा दोन घास गदाधरांना भरवी. अखेर एके दिवशी आवेगाच्या भरात गाभाऱ्यातील कालीमातेचे खड्‌ग घेतले व ते मानेवर चालवणार, एवढ्यात जगन्मातेचे दर्शन त्यांना झाले. या वेळी त्यांचे वय पंचवीस होते. यानंतरचे त्यांचे सारे दैनंदिन जीवन ईश्वरानुभवाच्या प्रकाशात उजळून निघाले. गदाधरांस रामकृष्ण हे नाव कोणी व केव्हा दिले हे ठरवता येत नाही. रामकृष्ण विवाहित होते. १८५९ मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी जयरामवाटी येथील रामचंद्र मुखोपाध्याय यांची सहा वर्षांची कन्या सारदामणी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. पण लौकिक अर्थाने त्यांनी वैवाहिक जीवन स्वीकारले नाही. वयाच्या अठराव्या वर्षी दक्षिणेश्वरला आलेल्या सारदादेवींची त्यांनी जगन्माता या नात्याने केलेली षोडशी पूजा, हा रामकृष्णांच्या आध्यात्मिक साधनेतील अखेरचा टप्पा. सारदादेवींना रामकृष्णांनी आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णपणे सहभागी करून घेतले आणि त्याही सर्वार्थांनी त्यांच्या सहधर्मिणी झाल्या. रामकृष्णांच्या खालोखाल त्यांच्या अनुयायीवर्गात सारदामाता यांचे स्थान मान्यता पावले आहे.
कालीमातेची रीतसर पूजा करू लागण्याच्या आधीचा एक धार्मिक विधी म्हणून रामकृष्णांनी कलकत्त्यातील केनाराम भट्टाचार्य यांच्याकडून दीक्षा घेतली होती. ते साधनाकालापूर्वीचे त्यांचे दीक्षागुरू. त्यानंतरचे त्यांचे गुरू दोन. १८६१ मध्ये दक्षिणेश्वरला आलेल्या भैरवी ब्राह्मणी या चाळिशीतील संन्यासिनीने दोन अडीच वर्षांच्या अवधीत रामकृष्णांकडून तंत्रमार्गानुसार सर्व प्रकारच्या साधना करून घेतल्या. रामकृष्ण हे ईश्वराचा अवतार आहेत, असे शास्त्रीपंडितांच्या सभेत भैरवी ब्राह्मणीने प्रथम म्हटले. सुमारे सहा वर्षे रामकृष्णांच्या सहवासात राहून ती काशीला गेली. १८६४ मध्ये तोतापुरी हा संन्यासी दक्षिणेश्वरला आला. त्याने रामकृष्णांकडून वेदान्ताची साधना करून घेतली. त्या आधी त्यांना संन्यास दीक्षा दिली. तीन दिवसांनी समाधी लागली. ती तीन दिवस राहिली. हा निराकाराचा साक्षात्कार. दहा महिने राहून तोतापुरी गेल्यावर रामकृष्ण अद्वैतानुभवाच्या अवस्थेत सतत सहा महिने होते. त्यानंतर त्यांना आदेश मिळाला. ‘भावमुखी राहा’. १८६६ मध्ये गोविंद राय यांच्यामुळे इस्लाम धर्मानुसार त्यांची साधना झाली, तर शंभुचरण मल्लिक यांच्यामुळे बायबलचा परिचय झाला. येशू ख्रिस्तीने दर्शन दिले आणि आपल्या शरीरात प्रवेश केला, असे रामकृष्णांनी म्हटले आहे. या सर्व अनुभवांतून, सारे धर्म हे एका परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग आहेत, हे रामकृष्णांचे मत बनले. १८६८ मध्ये त्यांनी मधुरबाबूंबरोबर काशीवृंदावनची यात्रा केली.
कलकत्त्यातील सुशिक्षितांना रामकृष्णांची माहिती ब्राह्मो समाजाचे नेते  केशवचंद्र सेन यांनी रामकृष्णांवर लिहिलेल्या लेखामुळे प्रथम झाली. दक्षिणेश्वरला दर्शनासाठी लोक येऊ लागले. रामकृष्णांचे भक्तगणांशी तासनतास चालणारे संवाद  महेंद्रनाथ गुप्त यांनी ‘एम्.’ या टोपणनावाने श्रीरामकृष्ण कथामृत – ५ खंड, १८९७ – १९३२ (म. भा. श्री रामकृष्ण वचनामृत – १९५१) या ग्रंथात संकलित केले. अखेरच्या चार वर्षातील हे संवाद आहेत. त्यांवरून त्यांची शिकवणूक कळते. या ग्रंथाचे इंग्रजी रूपांतर स्वामी निखिलानंदांनी द गॉस्पेल ऑफ श्रीरामकृष्ण (१९४४) या नावाने केले. या ग्रंथाची तुलना बायबलशी केली गेली. रामकृष्णांचा उपदेश अधिकारानुसार असे.कामिनीकांचनाच्या मोहात मर्यादेबाहेर गुंतू नये, आपली किमान कौटुंबिक कर्तव्ये पार पाडावीत, ईश्वरदर्शन हे जीवनाचे ध्येय मानावे व त्यासाठी पतिपत्नींनी मिळून प्रयत्न करावा, असा उपदेश ते प्रापंचिकांना करीत. कामिनीकांचनाचा सर्वथा त्याग, संन्यासव्रताचा स्वीकार व आध्यात्मिक जीवनाचा आदर्श हा उपदेश त्यांनी अगदी निवडक करूण शिष्यांना केला. कलियुगात सत्यपालन हीच तपश्चर्या, माया टाळावी पण दया टाकू नये, शिवभावाने जीवांची सेवा करावी, निर्विकल्प समाधीपेक्षा सारे विश्व हे परमेश्वराचे रूप हा अनुभाव श्रेष्ठ होय, ज्ञान वा भक्ती किंवा साकार वा निराकार यांतील आपल्याला रुचेल व पचेल ते घ्यावे, अशी त्यांची काही प्रमुख विचारसूत्रे आहेत.
रामकृष्णांनी एकही ग्रंथ वाचला नव्हात, काही पुराणे-प्रवचने ऐकली होती. आध्यात्मिक साधनेतून घेतलेला साक्षात अनुभव हा त्यांच्या विचारांचा एकमेव आधार होता. सारे बोलणे प्रचीतीचे होते. त्यामुळे स्वामी दयानंद, बंकिमचंद्र चतर्जी, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर किंवा केशवचंद्र सेन अशा नामवंत व्यक्तीही त्यांच्या आध्यात्मिक धारणेच्या दर्शनाने प्रभावित झाल्या. बलराम बसू, डॉ. रामचंद्र दत्त, साधू नागमहाशय, महेंद्रनाथ गुप्त, गिरीशचंद्र घोष, सुरेंद्रनाथ मित्र हे त्यांचे प्रमुख गृहस्थाश्रमी शिष्य होते. काही स्त्रियाही त्यांच्या शिष्यवर्गात होत्या. दहा बारा तरुण अंतरंगशिष्य हे सारे संन्यासी होते. त्यांतील अग्रणी म्हणजे स्वामी  विवेकानंद. त्यांनी स्थापन केलेल्या  रामकृष्ण मिशन या संस्थेच्या देशविदेशांतील शंभरावरील शाखांच्या द्वारा रामकृष्णांचा आध्यात्मिक संदेश आज जगात सर्वदूर पसरलेला आहे. रामकृष्ण अखेरचे सात-आठ महिने घशाच्या कर्करोगाने आजारी होते. कलकत्त्यामधील काशीपूरच्या उद्यानगृहात त्यांनी महासमाधी घेतली.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी


डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी (६ जुलै १९०१–२३ जून १९५३). एक थोर राष्ट्रीय नेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षणतज्ञ. त्यांचा जन्म कलकत्त्यात प्रसिद्ध मुखर्जी घराण्यात झाला. त्यांचे वडील विख्यात न्यायाधीश आणि पुढे कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलगुरू सर आशुतोष मुखर्जी. त्यांच्या आईचे नाव श्रीमती जोगमायादेवी. हुशार विद्यार्थी म्हणून त्यांनी कीर्ती मिळविली आणि प्रत्येक परीक्षेत पहिल्या वर्गात पहिला क्रमांक मिळविण्याचा त्यांनी विक्रमच केला. कलकत्ता विद्यापीठातून ते बी. ए. झाले (१९२१). विद्यार्थिदशेतच त्यांचा विवाह श्रीमती सुधादेवी या मुलीशी झाला (१९२२). त्यांना दोन मुले व दोन मुली झाल्या. लग्नानंतर त्यांच्या वडिलांचे निधन पुढच्याच वर्षी झाले. तेव्हा त्यांची कलकत्ता विद्यापीठाच्या सीनेटवर निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी बी. एल्. (१९२४) ही पदवी घेऊन इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास केला व ते बॅरिस्टर झाले (१९२७). लंडनहून परत आल्यावर त्यांनी वकिली सुरू केली. ते बंगाल कायदेमंडळावर निवडून आले (१९२९); पण वर्षभराने गांधीजींच्या देशव्यापी कायदेभंग आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी त्यांनी कायदेमंडळाचा राजीनामा दिला. यावेळी काँग्रेसच्या एकूण धोरणाविषयी ते नाराज होते. परिणामतः ते हिंदुमहासभेकडे वळले. ते कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलगुरू झाले (१९३४). त्याच वर्षी त्यांच्या पत्नी सुधादेवी निवर्तल्या. त्यानंतर अखेरपर्यंत त्यांनी दुसरा विवाह केला नाही. हिंदुमहासभेतर्फे ते १९३७ मध्ये बंगालच्या कायदेमंडळावर पुन्हा निवडून आले. मुस्लिम लीगच्या १९४० च्या लाहोर ठरावानंतर त्यांनी फाळणीविरुद्ध देशभर प्रचार केला. त्या आधी काही काळ ते हिंदूमहासभेचे हंगामी अध्यक्षही होते. लीग मंत्रिमंडळाच्या पराभवानंतर ते बंगालच्या फझलुल हक मंत्रिमंडळात सामील झाले पण भारत छोडो आंदोलनाचे वेळी त्यांनी गांधीजी व इतर काँग्रेस नेत्यांची सुटका आणि संभाव्य जपानी आक्रमणाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षादलाच्या स्थापनेची मागणी केली. या प्रश्नांवर तड लावण्यासाठी नंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. १९४३ च्या बंगालच्या भीषण दुष्काळात श्यामा प्रसादांनी दुष्काळनिवारण्यासाठी खूप कष्ट घेतले. १९४७ च्या सुरुवातीस देशाची फाळणी होणार असे दिसू लागल्यावर त्यांनी बंगालच्याही फाळणीचा आग्रह धरला.
भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित नेहरुच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात ते उद्योग आणि पुरवठा मंत्री झाले. त्या आधीच हिंदुमहासभेमध्ये अहिंदूनांही प्रवेश द्यावा, या मुद्यावर त्यांनी त्या पक्षाचा राजीनामा दिला होता. मंत्री म्हणून त्यांनी फार अल्प काळ काम केले. नेहरू-लिकायत अलीखान कराराचे निषेधार्थ त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला (१९५०). तथापि त्यांच्या कारकीर्दीत चित्तरंजन चलनशील यंत्र कारखाना व सिंद्री खत कारखाना हे दोन भव्य प्रकल्प त्यांच्या प्रयत्नांनी सुरू होऊन भारताच्या औद्योगिक विकासात मोलाची भर पडली. काँग्रेसला शह देण्यासाठी त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली (१९५१). पक्षात पहिल्यापासूनच सर्वांना प्रवेश खुला ठेवण्यात आला होता. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत ते जनसंघातर्फे लोकसभेवर निवडून आले. संसदेत त्यांनी विरोधी पक्षांची एक राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन केली. त्याचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. ते महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष झाले आणि प्राचीन अवशेष घेऊन त्यांनी ब्रह्मदेश व कंबोडिया या देशांनी भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी जम्मू व काश्मीरच्या संपूर्ण विलीनीकरणासाठी अभियान सुरू केले. या आंदोलनानिमित्त प्रत्यक्ष काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करण्याचा त्यांनी निश्चय केला. जम्मू-काश्मीरचे तत्कालिन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्या शासनाने त्यांच्या राज्यप्रवेशावर बंदी घातली. बंदी मोडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना अटक झाली. तुरुंगवासातच त्यांचा अंत झाला. या प्रश्नावर शेख अब्दुल्ला यांच्याविरुद्ध त्यावेळी बरेच काहूर माजले होते.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्



सर्वपल्ली राधाकृष्णन् : (५ सप्टेंबर १८८८ – १६ एप्रिल १९७५). भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२ – ६७) आणि पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक. त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या द्विखंडात्मक ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान इंग्रजीत सुंदर शैलीत मांडले आहे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी या गावी झाला व उच्च शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले. नंतर मद्रासचे प्रेसिडेन्सी कॉलेज (१९०९ – १६). म्हैसूर विद्यापीठ (१९१६ –२१), ‘राजे पंचम जॉर्ज अध्यासन’, कलकत्ता विद्यापीठ (१९२९ ३१) या ठिकाणी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.त्याच वेळी ते ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचे प्राध्यापक (१९२९) व नंतर वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू (१९३१ –३५), लंडन येथे ‘पौरस्त्य धर्म आणि नीतिशास्त्र’ यांचे प्राध्यापक (स्फाल्डिंग प्रोफेसर). बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू (१९३९ ४८) होते. १९३१ ते ३९ पर्यंत ते राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते. १९४९ ते १९५२ पर्यंत भारताचे रशियातील राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या वेळी आपली नेहमीची प्रथा मोडून स्टालिनने त्यांना मुद्दाम बोलावून त्यांची भेट घेतली.
अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे (१९२७) आणि अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे (१९३०) अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ऑक्सफर्ड येथील ऑप्टन व्याख्यानमाला तसेच हिबर्ट व्याख्यानमाला गुंफण्याचा बहुमानही त्यांना लाभला. १९५४ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन गौरविले. १९५२ ते १९६७ पर्यंत प्रथम भारताचे उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती होऊन ते निवृत्त झाले. निवृत्तिकालात ते मद्रास येथे जाऊन राहिले.तेथेच थोड्या विमनस्क अवस्थेत त्यांचे निधन झाले.
त्यांनी तत्त्वचिंतनात स्वतःची अशी कोणतीच भर घातली नाही अशी टीका पुष्कळदा केली जाते. ती खरीही आहे आणि खोटीही आहे. खरी अशाकरता, की आपल्या लिखाणात शंकराचार्याच्या केवलाद्वैत मताचीच थोडी फेरमांडणी करून त्यांनी जी मांडणी केली ती आधुनिक काळाला साजेल अशी केली. नित्य परिवर्तनशील परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर शाश्वत मूल्यांचे पुनर्संस्करण केले. शांकर तत्त्वज्ञानाच्या आधारावर प्रवृत्तीपर जीवन जगता येईल असे त्यांनी दाखवून दिले. सगुण ब्रह्म अथवा ईश्वर हा निर्गुण परब्रह्माचा खालच्या पातळीवरील आविष्कार आहे असे न म्हणता, भक्ताशी असलेल्या त्याच्या संबंधाच्या अपेक्षेने ग्रहण केल्यावर जो ईश्वर म्हणून भासतो त्याचेच संबंध – निरपेक्ष रीतीने ग्रहण केल्यावर तो परब्रह्म म्हणून उरतो असे त्यांचे प्रतिपादन आहे. राधाकृष्णन् यांनी मायावाद स्वीकारला; जग ईश्वरावर अवलंबून आहे, स्वप्रतिष्ठित नाही आणि अशाश्वत आहे असा त्यांनी त्याचा अर्थ केला. हिंदू धर्मास काही अर्वाचीन रूप मिळाले आहे असे मानल्यास त्याचे श्रेय स्वामी विवेकानंद, डॉ. भगवानदास, म. गांधी इत्यादींच्या प्रमाणे राधाकृष्णन् यांनाही आहे.
सर्व धर्मांतील मूलभूत सत्य एकच आहे आणि ही वृत्ती हिंदू धर्माने विशेषकरून जोपासली आहे. असे राधाकृष्णन् यांनी सांगितले. कोणत्याही धर्माच्या शिकवणुकी या तत्त्वज्ञानाचा अभ्यासविषय आहेत; देवशास्त्राच्या (थिऑलॉजीच्या) नाहीत असे त्यांचे म्हणणे होते. असे ते म्हणू शकले याचे कारण ज्ञानमीमांसेत प्रत्यक्ष व अनुमान यांच्याप्रमाणेच अंतःप्रज्ञ (इंट्यूइशन) हेही सत्यज्ञान मिळविण्याचे एक साधन आहे असे त्यांनी मानलेले आहे. धर्मग्रंथांचे प्रामाण्य त्यांत ग्रथित असलेल्या ऋषींच्या गूढानुभूतींवर आहे, त्या ग्रंथाच्या ईश्वरकर्तृत्वावर नाही, अशी त्यांची भूमिका आहे. ही दृष्टी पतकरली म्हणजे धर्माची चिकित्सा करता येते आणि प्रस्थापित धर्ममतांचा समन्वयही करता येतो.
बुद्धाने अनात्मवाद सांगितला; पण राधाकृष्णन् यांच्या मताप्रमाणे तो अनात्मवाद आणि वेदान्ताचा आत्मवाद अथवा ब्रह्मवाद यांच्यात विरोध नाही.बुद्धाने नाकारला तो ‘मी’ आणि ‘माझे’ अशी वृत्ती निर्माण करणारा जीवात्मा होय. जीवात्मा हा अहंकाराचा परिणाम होय. अहंकाराचा लोप झाला म्हणजे निर्वाणरूपी परम शांतीचा अनुभव येतो. वेदान्तही अहंकाराचे विसर्जन करावयास सांगतो. अहंकार नष्ट झाल्यावर जो शुद्ध चैतन्याचा अनुभव येतो, त्यास वेदान्तात आत्म्याचा अनुभव म्हणतात.
खरे म्हटले तर धर्म एकच असतो. संप्रदाय अनेक असतात. याचा अर्थ असा नव्हे, की कोणताही संप्रदाय व त्याच्या विशिष्ट परंपरा नाहीशा केल्या पाहिजेत. इतकेच केले पाहिजे, की संप्रदायांनी आपापली आग्रही वृत्ती सोडली पाहिजे.
द रेन ऑफ रिलिजन इन कंटेंपररी फिलॉसॉफी या १९२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात त्यांच्या मनाचा कल रामानुजांच्या विशिष्टाद्वैत मताकडे– म्हणजे सगुणोपासनेकडे- झुकलेला दिसतो. पुढे १९२३ (पहिला भाग) व १९२७ (दुसरा भाग) या साली प्रसिद्ध झालेल्या इंडियन फिलॉसॉफी या ग्रंथात शंकराचार्याचे केवलाद्वैत मत त्यांनी शिरोधार्य मानलेले दिसते. पण १९२९ साली प्रसिद्ध झालेल्या अॅन आयडियालिस्ट व्ह्यू ऑफ लाइफ या ग्रंथात त्यांचे जीवनविषयक समग्र तत्त्वज्ञान साररूपाने आले आहे असे म्हणता येईल. यात असे म्हटले आहे, की देहपातापूर्वीही व्यक्तीला ईश्वराशी सायुज्यता मिळू शकेल; पण अंतिम मोक्ष अथवा ब्रह्म-निर्वाण हे सर्व जीव मुक्त झाल्याशिवाय एका व्यक्तिला प्राप्त होणार नाही. म्हणून सायुज्य मुक्ती प्राप्त झालेले महामानव हे इतर जीवांच्या उद्धारासाठी प्रयत्नशील राहतात. हे मत महायान पंथातील बौद्ध मतासारखे बोधिसत्व संकल्पनेसारखे आहे. त्यांनी उपनिषदे वप्रिन्सिपल उपनिषद्स (१९५३), ब्रह्मसूत्रे (द ब्रह्मसूत्राज – १९६०) व भगवद्‌गीता (द भगवद्‌गीता – १९४८) या वेदान्ताच्या ⇨ प्रस्थानत्रयीवर भाष्यस्वरूप ग्रंथ लिहिल्यामुळे प्राचीन अर्थाने त्यांना ‘आचार्य’ ही उपाधी लावता येईल. यांशिवाय द फिलॉसॉफी ऑफ रविंद्रनाथ टागोर (१९१८), द हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ (१९२६), ईस्ट अँड वेस्ट इन रिलिजन (१९३३), ईस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट (१९३९), द धम्मपद (१९५०), द रिकव्हरी ऑफ फेथ (१९५५) इ. त्यांची ग्रंथरचना आहे.
धर्म व तत्त्वज्ञान यांप्रमाणे शिक्षण हाही त्यांच्या परिशीलनाचा विषय होता. शिक्षणाने व्यक्तीला आत्मभान झाले पाहिजे आणि आपल्या विचाराची दिशा ठरविता आली पाहिजे, असे त्यांचे मत होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे (१९४८) ते अध्यक्ष होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी व ह्या आदर्श शिक्षकाच्या सन्मानार्थ भारतात सर्वत्र त्यांचा जन्मदिन (५ सप्टेंबर) हा ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा केला जाते.
आज ज्याला विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान म्हणतात त्याच्याशी आपल्या विचारांचा सांधा जमवून घेण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. त्याचप्रमाणे आजच्या अस्तित्ववादाविषयीही त्यांनी फारसा आदर दाखविला नाही. त्यांच्या मते, उपनिषदांतील तत्त्वज्ञान हेच खरे अस्तित्ववादी आहे. कारण, त्याची सुरूवात आत्म्याच्या अस्तित्वापासून होते. जडवादात अंतःप्रज्ञेला अथवा गूढानुभूतीला स्थान नसल्यामुळे आध्यात्मिक मर्मदृष्टीला तो पारखा होतो.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...