Thursday, 2 January 2020

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान

🖌दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

🖌परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

🖌सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

🖌प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

🖌परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

🖌मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

🖌सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

📚प्रार्थना समाजाचे कार्य📚

🖌प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.

🖌न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.

🖌ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.

🖌देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🖌अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🖌प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.

🖌मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.

🖌४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.

🖌मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.

🖌इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.

🖌इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.

🖌प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.

📚प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन📚

🖌प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.

Flashback 2019 : ‘या’ आहेत वर्षातील सर्वात मोठ्या घटना

📌सुधारित नागरिकत्व कायदा :

👉धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद सुधारिक नागरिकत्व कायद्यात करण्यात आली आहे. श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही. ही दुरुस्ती घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी भागांना, तसेच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन, १८७३ मध्ये अधिसूचित केलेल्या भागांना लागू असणार नाही. या कायद्याला देशभरातून विरोध करण्यात येत आहे.

📌कर्नाटकातील राजकीय नाट्य :

👉कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये १५ मधून १२ जागांवर विजय मिळवत येडीयुरप्पा सरकारनं पूर्ण बहुमत मिळवलं. गेल्या वर्षी १५ मे रोजी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपानं १०४, काँग्रेसनं ७८ तर जेडीएसनं ३७ जागांवर विजय मिळवला होता. सुरूवातील येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारली होती. परंतु त्यांना बहुमत सिद्ध करता न आल्यानं त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसनं जेडीएसची साथ देत सरकार स्थापन केलं होतं. परंतु वर्षभरातचे ते सरकार कोसळलं. काँग्रेसच्या काही आमदारांनी बंडखोरी केली. परंतु काही दिवसांनी त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यांनंतर राज्यात पोटनिवडणुका झाल्या आणि १५ पैकी १२ जागांवर भाजपाला यश मिळालं.

📌महाराष्ट्रातील राजकीय नाट्य :

👉राज्यातल्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना २३ नोव्हेंबर रोजी घडली होती. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मदतीनं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु दोनच दिवसात त्यांनी राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आलं आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. सत्ता स्थापनेत उशीर होत असल्याचं कारण पुढे करत अजित पवार यांनी भाजपाची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. तर सत्तेत समसमान वाटप आणि अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर ठाम असलेल्या शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची साथ देत महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये ३६ मंत्र्यांना स्थान देण्यात आलं आहे. शिवसेनेसाठीही ही निवडणुक महत्त्वाची ठरली. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि वरळी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले.

📌अयोध्या प्रकरणाचा निकाल :

👉गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमीचा निकालही नोव्हेंबर महिन्यात लागला. सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालिन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने यासंदर्भातील निकाल दिला. ३ महिन्याच्या कालावधीत एका ट्रस्टची स्थापना करून राम मंदिर बांधण्यात यावे, असाही निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला. अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयानं दिला. सर्व वादी प्रतिवादी अग्राह्य ठरवत केवळ रामलल्ला व सुन्नी वक्फ बोर्ड या दोघांचाच खटला लढवण्याचा हक्क सुप्रीम कोर्टानं मान्य केला होता. यामुळे सर्व वादग्रस्त जागेवर रामलल्लाचा हक्क असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं.

📌चांद्रयान २ :

👉९ जुलै रोजी चांद्रयान २ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. ही भारताच्या या महत्त्वाकांशी मोहिम होती. ७ सप्टेंबर रोजी चांद्रयान २ चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण भागावर लँड करणार होतं. परंतु काही तांत्रिक बाबींमुळे ते शक्य होऊ शकलं नाही. अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा इस्रोशी संपर्क तुटला होता. परंतु चांद्रयान २ चे ऑर्बिटर आपलं काम करत राहणार आहे. या मोहिमेनंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचं देशभरातून कौतुक करण्यात आलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर देत त्यांच्या कार्याला सलाम केला होता.

📌जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवलं :

👉कलम ३७० च्या माध्यमातून जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने


- गुगामल (1975): 361.28 चौकिमी
- ताडोबा (1955): 116.55 चौकिमी
- नवेगाव (1975): 133.88 चौकिमी
- पेंच (1975): 257.26 चौकिमी
- संजय गांधी (1983): 86.96 चौकिमी
- चांदोली (2004): 317 चौकिमी

पंतप्रधान 5 डीआरडीओ युवा शास्त्रज्ञ प्रयोगशाळा राष्ट्राला समर्पित करणार

🔰संरक्षण क्षेत्रात स्वदेशी संशोधन क्षमतांना चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार 2 जानेवारी 2020 रोजी पाच डीआरडीओ युवा शास्त्रज्ञ प्रयोगशाळा राष्ट्राला समर्पित करतील.

🔰बंगळुरुच्या डीआरडीओस्थित ॲरोनॉटिकल विकास संस्थेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान या प्रयोगशाळांच्या समर्पणाचे प्रतिक म्हणून एका पट्टीकेचे अनावरण करतील आणि शास्त्रज्ञांना संबोधित करतील.

🔰यावेळी आयोजित प्रदर्शनात डीआरडीओ पंतप्रधानांना काही नाविन्यपूर्ण उत्पादनांची ओळख करुन देतील.

🔰मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

🔰2014 मध्ये संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था पुरस्कार प्रदान केल्यानंतर वरिष्ठ आणि प्रसिद्ध संरक्षण वैज्ञानिक तसेच सशस्त्र दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करतांना पंतप्रधानांनी नाविन्यपूर्ण संशोधनासाठी 35 वर्षांपर्यंतच्या तरुण वैज्ञानिकांसाठी किमान 5 डीआरडीओ प्रयोगशाळा उभारण्याची सूचना केली होती

क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे

     जन्म : 2 जानेवारी 1888
(तळेगाव(ढमढेरे) महाराष्ट्र, भारत)

   फाशी : 16 नोव्हेंबर 1915
    (लाहोर कारागृह, पाकीस्तान)

स्वा. सावरकरांच्या ‘अभिनव भारत’ या संघटनेद्वारा पसरलेली क्रांतीची ज्वाळा ते काळ्या पाण्यावर गेले तरी विझली नाही. त्यांच्या पासून स्फूर्ती घेतलेले हिंदुस्थानचे युवक चारी खंडात पसरले आणि पहिलं महायुद्ध सुरु होताच त्यांनी सशस्त्र क्रांतीनं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी निकराचा प्रयत्न केला तो गदर उत्थान म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाला. गदर चळवळीतील एक महत्वाचं नाव म्हणजे क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे !

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या गावच्या गरीब घरात २ जानेवारी १८८८ मध्ये विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म झाला. तीन भाऊ आणि चार बहिणींनंतरचं हे शेंडेफळ. चाकोरीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याच्या स्वभावामुळे ते कोल्हापूरच्या ‘समर्थ विद्यालयात’ दाखल झाले. नंतर ते विद्यालय तळेगाव दाभाडे इथं सुरु झालं, तिथं ते आले. राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणारं हे विद्यालय ब्रिटीशांच्या रोषाला बळी पडून १९१० मध्ये बंद झालं. मग त्यांनी काही काळ मुंबईत नोकरी केली, नंतर स्वदेशी चळवळीला हातभार लावण्यासाठी त्यांनी लातूर जवळ हातमाग टाकले. मग मेकॅनीकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून, घरी काहीही न सांगता ते १९११ मध्ये थेट अमेरिकेत पोहोचले.  शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी तिथे त्यांनी अपार कष्ट केले. ते अमेरिकेत असल्याची वार्ता कित्येक महिन्यांनी त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचली. सावरकरांचे अभिनव भारत मधील निकटचे सहकारी लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत गदर चळवळ सुरु केली होती. १९१४ ला महायुद्ध सुरु होताच, हिंदुस्तानात जाऊन क्रांती करण्याची हीच योग्य संधी आहे असा प्रचार त्यांनी गदर पत्रातून सुरु केला आणि विष्णु गणेश पिंगळे आपल्या कष्टसाध्य सुंदर भविष्यावर अक्षरश: लाथ मारून गदर मध्ये सामिल झाले आणि हिंदी सैन्य स्वातंत्र्यासाठी क्रांतिकार्याकडे वळवण्याच्या विभागाचे प्रमुख झाले.

सप्टेंबर १९१४ मध्ये ‘कोमा गाटा मारू’ हे जहाज शेकडो शिख क्रांतिकारकांना घेऊन हिंदुस्थानात पोहोचलं. त्यानंतर अनेक शीख वेगवेगळ्या जहाजातून परतत राहिले. नोव्हेंबर मध्ये पिंगळे गुप्तपणे हिंदुस्तानात परतले ते ही शांघाय सारख्या काही ठिकाणी जहाल भाषणं करतच. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, बंगाली, पंजाबी भाषेवर प्रभुत्व असलेले पिंगळे पंजाब, बंगाल मध्ये वेश, नावं बदलून क्रांतिकारकांच्या  भेटी घेत, गदरचा प्रचार करीत राहिले. हिंदू, शीख, मुसलमान एकत्र आले. रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ यांच्या सहाय्यानं पिंगळे यांनी उठावाची योजना आखली होती. सबंध पंजाब, बंगालपासून ते सिंगापूरपर्यंत क्रांतीची बीजं पेरली गेली होती. शस्त्र, बॉंबगोळे जमवले गेले होते. गनिमी काव्यानं ब्रिटीश सरकारला नामोहरम करण्याची ती  योजना प्रत्यक्षात आली असती तर लाहोरपासून सिंगापूरपर्यंत १८५७ सारखी पण एक यशस्वी उठावणी झाली असती. पण याही वेळी फितुरी झाली आणि बाजी पलटली. मीरत इथल्या लष्करी छावणीत फितुरीनं विष्णु गणेश पिंगळे पकडले गेले, कट उधळला गेला. त्यावेळी त्यांच्याकडे बॉम्ब आणि काही ज्वालाग्राही पदार्थ सापडले. या चळवळीतील ८१ आरोपींपैकी ७ जणांची फाशीची शिक्षा कायम झाली. ते होते विष्णु गणेश पिंगळे, कर्तारसिंग सराबा, सरदार बक्षिससिंग, सरदार जगनसिंग, सरदार सुरायणसिंग, सरदार ईश्वरसिंग आणि सरदार हरनामसिंग. त्यांना १६ नोव्हेंबर १९१५ ला फाशी देण्यात आलं. ( Who’s who of Indian Martyrs या शासकीय ग्रंथानुसार हा दिनांक दिला आहे) हे सर्वजण खरोखरच हसत हसत, वंदे मातरम् च्या जयघोषात फासावर गेले. फाशीची शिक्षा ऐकल्यावरचे विष्णु गणेश पिंगळे यांचे शब्द होते ‘so that’s’ all’. त्यांना शेवटची इच्छा विचारली असता त्यांनी, हातकड्या काढून, दोन्ही हात जोडून प्रार्थना करू देण्यास सांगितले. प्रत्यक्ष मृत्यू समोर उभा ठाकला असता पिंगळे यांचे शब्द होते, “हे परमेश्वरा, ज्या पवित्र कार्यासाठी आम्ही प्राणांचे बलिदान देत आहोत ते कार्य तू पूर्ण कर”. विष्णू गणेश पिंगळे यांचं धैर्य, मोडेन पण वाकणार नाही ही त्यांची वृत्ती याचं क्लिव्हलंड या अधिकाऱ्यालाही कौतुक वाटलं होतं. या सर्वच  क्रांतिकारकांच्या कुटुंबियाचं आयुष्यही त्यांच्याबरोबरच पणाला लागत असे. विष्णू गणेश पिंगळे यांच्या नातेवाईकांचे भोगही चुकले नाहीत. वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या विष्णू गणेश पिंगळे, त्यांचे सहकारी आणि त्यांचे कुटुंबिय या साऱ्यांचं हे स्मरण !!

        

खालसा पंथाचे संस्थापक: गुरु गोविंद सिंह

▪ श्री गुरु गोविंद सिंह हे शीख धर्माचे दहावे गुरू होय. त्यांचा जन्म 1666 मध्ये पाटना येथे गुजरीजी व श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या गरीब कुटुंबात झाला. त्यावेळी गुरु तेगबहादुरजी बंगालमध्ये होते.

▪ त्यांच्या म्हणण्यानुसार गुरुजी यांचे नाम गोविंद राय असे ठेवण्यात आले होते. नंतर 1699मध्ये बैसाखीच्या दिनी गुरु गोविंद राय हे गुरु गोविंद सिंह बनले होते. त्यांचे बालपणाचे पाच वर्ष पाटना येथेच गेले.

▪ 1675 मध्ये कश्मीरच्या ब्राम्हणांच्या विनंतीला मान देऊन श्री गुरु तेगबहादुरजींनी दिल्ली येथील चांदणी चौकात देहत्याग केला होता. श्री गुरु गोविंद सिंहजी 11 नोव्हेंबर 1675 रोजी गुरु गादीवर विराजमान झाले.

▪ धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंहजी यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करून समानता प्रस्तापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावली.

▪ गुरु गोविंद सिंह यांना तीन पत्नी होत्या. माता जीतोजी, माता सुंदरीजी व माता साहिबकौरजी अशी त्यांची नावे होती. बाबा अजित सिंह, बाबा जुझार सिंह ही त्यांची मुले होती. ती चमकौरच्या युद्धात शौर्यमरण प्राप्त झाले होते. तर बाबा जोरावर सिंह व फतेह सिंह या लहान मुलांना सरहंदच्या नवाबने जिवंत भिंतींत पुरले होते.

▪ केसगड, फतेहगड, होलगड, आनंदगड व लोहगड हे किल्ले त्यांनी युद्धात जिंकले होते. गुरुजी दररोज गुरूवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना त्याचा सविस्तर अर्थही सांगत असत. तेव्हा त्यांचे लहान भाऊ मनी सिंहजी ते लिहीत असत. सलग पाच महिने लिहून गुरुवाणी पूर्ण झाली होती.

▪ गुरु गोविंद सिंहजी यांनी 42 वर्षापर्यंत शत्रूविरुद्ध सामना केला होता. 1708 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथील सचखंडमध्ये आपला देह त्यागला होता.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...