औरंगाबाद, नागपूर, नंदुरबार ते कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा ठिकाणांच्या पर्यटनस्थळांची निवड करून तेथे अम्युझिंग पार्क, थीम पार्क, वॉटर स्पोर्टस, जंगल सफारी, आलिशान हॉटेल्स उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना आवाहन करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने सादरीकरण केले होते. मात्र या 20 पर्यटनस्थळांच्या विकासासाठी राज्यातच गुंतवणूकदारांचे स्वतंत्र अधिवेशन भरविण्याचा मानस महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आहे.
राज्यातील पर्यटन स्थळ प्रकल्पांची संख्या जास्त आहे. औरंगाबाद येथील फरादपूर परिसरासह तेथीव पर्यटन स्थळांचा विकास, चिखलदरा, नागपूर येथील नवेगाव खैरी, नंदुरबारमधील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे प्रकाशा, नंदुरबारचाच तोरणमाळ परिसर, लोणार येथील आजिसपूर, सिंधुदुर्ग येथील मिठबाव, निवतीचा किनारा, रत्नागिरी हरनई किल्ला, रायगड किल्ला आणि परिसराचा विकास, रायगडमध्येच काशीद समुद्रकिनारा आणि परिसर, सुरेखा परिसर, ठाण्यात वसईचा किल्ला, पालघर येथील शिरगाव, मुंबईत एरंगल येथील कलाग्राम नावाने प्रदर्शन, सभा-चर्चासत्रांसाठी मोठे सभागृह उभारणी आदी प्रकल्पांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पांच्या विकासासाठी लागणारी जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून उपलब्ध करण्यात येणार असून, राज्याच्या पर्यटन धोरणांनुसार त्यांचा विकास करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन विभागाच्या मुख्य सचिव वल्सा नायर यांनी दिली.
महाराष्ट्र हे विविधतेने नटलेले राज्य आहे. डोंगरदऱ्या, विस्तीर्ण समुद्रकिनारा, लेणी, किल्ले, अभयारण्य, मोठी वनराई...यादी खूपच मोठी आहे. विदर्भ, मराठवाडा असो, किंवा कोकण किनारपट्टी; राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सुंदर पर्यटनस्थळे दडलेली आहेत. फिरायचे म्हटले, तर अख्खे आयुष्यही कमी पडेल, इतकी ठिकाणे आपल्याच राज्यात आहेत. मग येताय ना...महाराष्ट्राच्या सफरीवर!
महाराष्ट्रातील लेणी
अजिंठा लेणी
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठ्याची लेणी इ.स.पूर्व शतकातील असल्याचे सांगितले जाते. औरंगाबाद विमानतळापासून 108 किलोमीटर अंतरावर या लेण्या आहेत. येथील 30 शिल्पे म्हणजे प्रत्येकाची स्वतंत्र खोली असल्यासारखे वाटते. येथे बुद्धाच्या जीवनावर विविध शिल्पे कोरलेली आहेत. जवळचे रेल्वे स्थानक जळगाव असून, तेथून 58 किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे. औरंगाबाद शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले वेरूळ जगातील ऐतिहासिक वारसास्थळ बनले आहे. येथील शिल्पांमध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन यांच्या शिल्पकलेचा संगम झालेला आहे. येथील धुमार लेणी, कैलासचे मंदिर प्रसिद्ध आहे.
घारापुरी लेणी
गेट वे ऑफ इंडियापासून 9 नॉटिकल मैल अंतरावर समुद्रातील बेटावर घारापुरी लेणी आहेत. त्यांचा समावेश रायगड जिल्ह्यात होतो. यालाच एलिफंटा लेणी असेही म्हणतात. येथे दगडामध्ये महादेवाचे मंदिर कोरलेले आहे. येथे महादेव मूर्तींचा निर्माता, संरक्षक आणि संहारक म्हणून दाखवला आहे; जे खरोखर प्रेक्षणीय आहे.
पितळखोरे लेणी
औरंगाबाद जिल्ह्यातील पितळखोरे लेण्यांमध्ये शिलालेख, कोरीव घोडे, हत्ती मोठ्या प्रमाणात आहेत. तेथील दगडामध्ये बुद्धाची राजा असतानाची प्रतिमा कोरलेली आहे. हे बुद्धाचे राजा असतानाचे एकमेव शिल्प आहे. येथील लेण्यांची शिल्पे पाण्याच्या घर्षणाने नष्ट झालेली आहेत. पितळखोरे अजिंठ्याहून 78 किलोमीटर अंतरावर आहे. ही लेणी अजिंठ्यापेक्षा 2200 वर्षे जुनी आहे.
कार्ले-भाजे लेणी
कार्ले-भाजे लेणी या इ.स.पूर्व शतकातील बौद्ध धर्माच्या हिनयान पंथीय लेणी असल्याचे सांगितले जाते. म्हणून या लेण्यांत बुद्धमूर्ती आढळत नाहीत. कार्ले हे पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथून 11 किलोमीटर अंतरावर आहे. कार्ले येथील महाचैत्याचे शिल्प भाजे लेण्याच्या साडेतीनपट मोठे आहे.
माहूरची लेणी
नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या जुन्या बस स्थानकाजवळील टेकडीत या लेण्या कोरलेल्या आहेत. या लेण्या राष्ट्रकुल काळातील असल्याचे मानले जाते. येथे अनेक खांब असलेले 15 मीटर उंचीचे मोठे दालन आहे. त्यालाच जोडून गर्भगृह कोरलेले आहे.
महाराष्ट्रातील किल्ले
रायगड किल्ला
हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. उंच आणि वरील बाजूस निमुळत्या होत गेलेल्या डोंगरावर हा किल्ला बांधलेला होता. याच्या तिन्ही बाजूंनी असलेले खोरे याला सह्याद्री पर्वतापासून वेगळे करते. तिन्ही बाजूंनी येथे जाणे अशक्य होते. मुंबईच्या दक्षिणेस 210 किलोमीटर अंतरावर व महाडच्या उत्तरेस 27 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्यापासून 5 किलोमीटर उंचीवर पश्चिमेस हिरकणी, उत्तरेस टकमक, पूर्वेस भवानी अशी तीन टोके आहेत. येथे जाण्यास केवळ एकच मार्ग ठेवलेला आहे. तोही डावपेचाचा मार्ग आहे. त्याशिवाय शिवाजी महाराजांची समाधी, बाजार, जगदीश्वराचे मंदिर या गोष्टीही पाहण्यासारख्या आहेत.
राजगड
राजगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. या किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी केली. या किल्ल्याला त्या वेळी राजधानी समजले जात असे. हा किल्ला अतिशय दुर्गम आहे. येथील सुवेळा माचीवरील हत्ती प्रस्तर पाहण्यासारखे आहे. उत्कृष्ट डोंगरी किल्ला म्हणून जागतिक पातळीवर राजगडचा गौरव केला जातो.
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणपासून जवळच खडकाळ बेटावर हा किल्ला उभारला आहे. या किल्ल्याच्या बांधकामासाठी गोव्याहून खास 100 पेक्षा अधिक तज्ज्ञ पोर्तुगीजांना बोलावले होते; तसेच या बांधकामासाठी 3000 कामगार तीन वर्षे झटत होते.
48 एकराचा हा किल्ला असून, किल्ल्याला 4 कि.मी. लांबीचा 9 मीटर उंच, 3 मीटर रुंद असा तट आहे, 42 बुरुज आहेत. मोठे दगड व 72576 किलोग्रॅम लोखंड वापरून याच्या भिंती बांधल्या आहेत. किल्ल्याचे वेगळेपण म्हणजे याचा पाया शिसे ओतून उभारला आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या शिवाजी मंदिरात शिवाजी महाराजांचा देशातील एकमेव दाढीविरहित पुतळा आहे.
पन्हाळा
कोल्हापूर शहराच्या वायव्य दिशेस 19 किलोमीटर अंतरावर पन्हाळगड हा किल्ला आहे. त्रिकोणी आकाराचा पन्हाळा डोंगराळ भागात असून, त्याची उंची 850 मीटर आहे व परीघ 7.25 किलोमीटर आहे. अर्ध्या भागात नैसर्गिक भिंत आहे. उर्वरित भाग मजबूत दगड भिंतींच्या बुरुजाने संरक्षित आहे. किल्ल्याच्या दुहेरी भिंतीला तीन दरवाजे आहेत. त्यांपैकी दोन सुरक्षित आहेत. येथे मोठमोठी धान्याची कोठारे आहेत. आजही पन्हाळा पर्यटनस्थळ म्हणून महत्त्वपूर्ण आहे. तेथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कवी मोरोपंतांचा जन्म येथेच झाला; तसेच आज्ञापत्राचे लेखक रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी येथेच आहे.
प्रतापगड
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून 24 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. 1656 मध्ये हा किल्ला बांधला असून, अत्यंत कठीण आणि डोंगराळ भागात हा किल्ला आहे. येथे विजापूरचा सरदार अफजलखान याचा शिवाजी महाराजांनी वध केला होता. प्रतापगडाच्या माथ्यावर चिन्नमनस, धोबी, लिंगमळा धबधबा अशी ठिकाणे आहेत. तिथून दूरपर्यंत निसर्गसौंदर्य न्याहाळता येते; तसेच विल्सन पॉइंट, कारनॅक पॉइंट, हेन पॉइंट, एल्फिन्स्टन, बॉबिग्टन, फलचंद केंद्र येथून निसर्गन्याहाळता येतो.
हरिश्चंद्रगड
अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड म्हणजे ऐतिहासिक पुरावे असणारा किल्ला होय. चांगदेवांच्या अस्तित्वाचा शिलालेख, प्राचीन लेणी व गुहा मंदिरे, श्रीहरिश्चंद्रेश्वराचे शिल्पसमृद्ध मंदिर व अनेक जुनी हत्यारे या किल्ल्यावर पाहायला मिळतात. या किल्ल्यासंदर्भात अनेक शौर्यगाथा, कथा प्रचलित आहेत. किल्ल्यावरून कोकणकड्याचे अप्रतिम दृश्य दिसते.
नळदुर्ग
उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग हा किल्ला बोरी नदीच्या शेजारी आहे. या भुईकोट किल्ल्याच्या संरक्षणासाठी जलमहाल उभारलेला आहे. येथील गंडभेरुंडाचे शिल्प आठवणीत राहण्यासारखे आहे. उपळ्या बुरूज आणि तेथील खंडोबाचे स्थान ही पर्यटकांसाठी आकर्षण स्थळे आहेत.
महाराष्ट्रातील अभयारण्य
पेंच : पेंच हे वाघांसाठी आरक्षित राष्ट्रीय उद्यान आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिण भागात व नागपूर जिल्ह्याचा उत्तरेस हे वन आहे.
पेंच उद्यानाचे 4 विभाग पडतात. येथे विविध प्रकारची झाडे-झुडपे, गवत, वेली, रानगवत औषधी वनस्पती आहेत.
चिखलदरा : चिखलदरा पर्यटनस्थळ हे अमरावती जिल्ह्यात आहे. चिखलदरा 118 मीटर उंच टेकडीवर वसले असून, हे विदर्भातील सर्वांत उंच ठिकाण आहे. या भागात बिबट्या, वाघ, अस्वल, सांबर, डुक्कर आदी प्राणी आणि काही प्रमाणात रान कुत्रे पाहावयास मिळतात. चिखलदऱ्यापासून जवळच मेळघाट आहे. मेळघाटात व्याघ्रप्रकल्प राबवला जातो.
बोरडॅम : बोरडॅम हे महाराष्ट्राच्या पर्यटनस्थळातील महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. येथे अनेक प्रकारचे वन्यप्राणी पाहावयास मिळतात. बोर नदीवरील हा प्रकल्प वर्धा जिल्ह्यात आहे. एप्रिल-मे हा काळ पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. तेथे जाण्यासाठी विमानाने पर्यटनस्थळापासून 80 किलोमीटर अंतरावर नागपूर, 35 किलोमीटर अंतरावर "वर्धा' स्थानक, तर 5 किलोमीटर अंतरावर "हिंगली' हे बस स्थानक आहे.
महाराष्ट्रातील उद्याने
ताडोबा राष्ट्रीय उद्यान : ताडोबा हे जुने आणि 625 किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेले उद्यान आहे. विस्ताराच्या दृष्टीने महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे उद्यान आहे. नागपूर शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे.
नवेगाव राष्ट्रीय उद्यान : नागपूर जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान 1359 चौ.मी. भूभागावर विस्तारलेले आहे. येथे डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य आणि हरणांचे उद्यान आहे. उद्यानामध्ये उंच मनोरा उभारलेला आहे. नागपूर विमानतळापासून 100 किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान : या उद्यानास बोरिवली राष्ट्रीय उद्यान असेही म्हटले जाते. मुंबईतील बोरिवलीच्या डोंगराळ भागात हे उद्यान आहे. शहरास लागून 104 चौ.कि.मी. क्षेत्रावर हे उद्यान विस्तारलेले आहे. सांताक्रूझ विमानतळापासून 20 किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे.
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
महाबळेश्वर : साताराजिल्ह्यात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. उंच शिखरे, खोल दऱ्या, हिरवागार निसर्ग, थंड उत्साहवर्धक असे हे ठिकाण होय. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसांत येथील पर्यटन पूर्णतः बंद असते आणि वाहनांच्या वापरास बंदी असते.
माथेरान : माथेरान रायगड जिल्ह्यात वसलेले आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये 800 मीटर उंचीवर माथेरान वसलेल्या माथेरानचा शोध 1850 मध्ये मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टननी घेतला असे सांगितले जाते. नेरळहून मीटर गेजची छोटीशी ट्रेन येथे जाते.
अंबोली : सह्याद्रीच्या दक्षिण डोंगररांगांमध्ये 690 मीटर उंचीवर अंबोली हे ठिकाण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेले हे अंबोली थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथून 10 किलोमीटर अंतरावर बॉक्साइटच्या खाणी आहेत.
भंडारदरा : भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण नगर जिल्ह्यात आहे. येथील ऑर्थर तलावावर विल्सन धरण आहे. येथून प्रवरा नदीचा उगम होतो. अगस्ती ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवाने त्यांना आशीर्वाद दिला, तेव्हापासून ही नदी वाहत असल्याची आख्यायिका आहे.
विल्सन धरण, अम्ब्रेला धबधबा, ऑर्थर तलाव, कळसूबाई शिखर, अगस्ती ऋषींचा आश्रम ही ठिकाणे पर्यटकांची प्रमुख आकर्षणस्थळे आहेत. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर आहे. विल्सन धरण 1910 मध्ये बांधले गेले. याची उंची 150 मीटर आहे. येथील हवा थंड व आल्हाददायक आहे.
पर्यटनस्थळे
कोका अभयारण्य: नैसर्गिक सौंदर्यासोबत नैसर्गिक साधन संपत्तीने भंडारा हा समृद्ध जिल्हा आहे. भौगोलिक क्षेत्रापैकी 1/3 क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. या जिल्ह्यात न्यू नागझिरा, उमरेड कऱ्हांडला आणि कोका अशी तीन अभयारण्ये नव्याने घोषित झाली आहेत.
अभयारण्याला कसे जाल : नागपूर-भंडारा हे 65 कि.मी. अंतर असून, भंडाऱ्याहून चंद्रपूरच्या प्रवेशद्वारापर्यंत 19 कि.मी. आहे. चंद्रपूर प्रवेशद्वारापासून 3 जिप्सींची व्यवस्था आहे. तसेच स्वत:चे वाहनही जंगल सफारीसाठी वापरता येते.
पेंच अभयारण्य, गोरेवाडा प्राणिसंग्रहालय : विदर्भात ताडोबा, पेंच, उमरेड करांडलासारखी अभायारण्ये आहेत. या अभयारण्यांना भेट देण्यासाठी देश-विदेशांतून हजारो पर्यटक नागपूरला येतात. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय लवकर झाले, तर विदर्भाच्या विकासात मोठी भर पडणार आहे. राजकीय इच्छाशक्ती दाखविली तर हा प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण होईल.
दाजीपूर अभयारण्य : कोल्हापूरपासून 80 कि.मी. अंतरावर असलेले दाजीपूर अभयारण्य, की जे जैव विविधतेचे हॉट स्पॉट किंवा रानगव्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. हे अभयारण्य रानगव्यांच्या भूमीबरोबरच विविध पक्षी आणि दुर्मिळ प्राण्यांच्या अधिवासाचे मूळ आहे. या अभयारण्यात 400 ते 500 गवे असून चित्ता, सांबर, मुंगूस, विविध सापांच्या जाती या ठिकाणी घर करून आहेत. जंगलामध्ये प्लॅस्टिक पिशव्या, खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसल्याने जंगलात जाण्यास मनाई आहे.
विसापूर किल्ला : हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. पुण्याकडे जाताना लोणावळा सोडले, की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड, मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवनामावळात मोडणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण हा विसापूर किल्ला करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.
मोराची चिंचोली : गर्द झाडीने वेढलेले आणि भरपूर मोर असलेले असे एक गाव आहे. या ठिकाणी एका दिवसाची छान सहल होऊ शकते. हे गाव पुणे-नगर रस्त्यावर शिरूर, शिक्रापूर जवळ आहे. अष्टविनायकांपैकी रांजणगाव गणपतीपासून साधारण हे जवळ आहे.
कास पठार : सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट केले आहे. आज साताऱ्याच्या पर्यटनाची ओळख खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार झाली आहे. सातारा शहरापासून अवघ्या 23 कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरत असून, पर्यटकांची रीघ कास पठाराच्या दिशेने सुरू झाली आहे. या पठाराची माहिती देणारे www.kas.ind.in हे संकेतस्थळ आहे.
चौल- अलिबाग : अलिबागमधील रेवदंडा-नागाव याप्रमाणेच चौल-रेवदंडा अशी जोडगोळी पर्यटनासाठी प्रसिद्ध ! चौल हे एक आतिशय प्राचीन बंदर आहे. या बंदराला अनेक नावे आहेत. चेमुल, तिमुल, सिमुल, सेमुल, सेमुल्ल, सिबोर, चिमोली, सैमुर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. दोन हजार वर्षांपूर्वीचे हे एक बंदर ! त्या काळी इजिप्त, ग्रीस, आखातातील काही देश, चीनदेखील आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होता.
दूरशेत रायगड पावसाळी पर्यटन
आंबा नदीच्या काठावर आणि सह्याद्री पर्वताच्या अंतर्गत असलेले रायगड जिल्ह्यातील दूरशेत (ता. खालापूर) हे गाव. हे गाव मोठमोठ्या डोंगर व दऱ्यांमुळे पर्यटनस्थळ म्हणूनही ओळखले जाते. तसेच महाराष्ट्रातील अनेक ट्रेकिंग ठिकाणांमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीपासून दूर जाऊन निसर्गाला जवळून पाहण्याचे हे एक सुंदर ठिकाण आहे. दूरशेत हे गाव पाली आणि महाडच्या दोन गणेश मंदिरांदरम्यान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्तलाब खान यांच्यामध्ये उंबरखिंडसाठी लढाई झाली होती. त्यामुळे हे एक ऐतिहासिक स्थळ म्हणूनही ओळखले जाते.
नाना फडणवीस वाडा, वाई : नाना फडणवीसांचा 245 वर्षांचा मेणवलीचा वाडा भारावून टाकणारा आहे. वाईपासूनच 10 कि.मी. अंतरावर मेणवली हे ठिकाण आहे. या ठिकाणचा घाट आणि नाना फडणवीस यांचा वाडा पेशवेकालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आजच्या काळातही स्थापत्य कलेला प्रेरणा देणारा हा वाडा असल्याचे जाणवते.
ताम्हणी घाट : सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. मुळशी धरणाचा नयनरम्य देखावाही बघायला मिळतो आणि या छोट्याशा वर्षासहलीला नदीतील साहसी खेळांची (रिव्हर राफ्टिंग) जोडही देता येते. ताम्हिणी घाटात जाण्यासाठी मुंबई- गोवा महामार्गाने कोलाडपर्यंत जावे लागते. कुंडलिका नदीवरील पूल ओलांडला, की डाव्या बाजूला मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाणारा रस्ता लागतो. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा ताम्हिणी घाट आहे.
प्रबळगड : महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये चढण्याच्या दृष्टीने असे अनेक किल्ले धोकादायक आहेत. यातलाच एक किल्ला म्हणजे प्रबळगड. पनवेलजवळ असलेला हा किल्ला तब्बल 2300 फूट उंच आहे. प्रबळगड हा भारतातला सगळ्यात धोकादायक किल्ला मानला जातो. या किल्ल्यावर जायचा रस्ता प्रचंड धोकादायक आहे.
ट्रेकिंग स्थळे
माथेरानच्या कुशीत वसलेले भिवपुरी, दहीसरजवळील चिंचोटी, मुंबईपासून 2 तासांच्या अंतरावर असणारे तुंगारेश्वर, सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सनडॅमपासून तयार झालेला इगतपुरीजवळील रांधा फॉल, खारघर परिसरातील पांडवकडा, खोपोली येथील झेनिथ धबधबा, मुंबई- पुणे महामार्गावरील पळसदरी, पनवेल परिसरातील गाढेश्वर धबधबा, फणसाड धबधबा, मुरुड-जंजिरा येथील सवतकडा, नवी मुंबई घणसोली गावाजवळील गवळीदेव धबधबा, बदलापूर जवळील कोंडेश्वर धबधबा, वांगणीजवळील भगीरथ धबधबा, नेरळजवळील टपालवाडी, भिवपुरीजवळील आषाणे धबधबा, माळशेज घाटाजवळील भिदबीचा धबधबा, निवळी घाटाजवळील निवळी धबधबा, कर्जतजवळील मोहिली धबधबा, मुरबाडजवळील पळुया धबधबा या ठिकाणी तुम्ही ट्रेकसुद्धा करू शकता. ठाणे जिल्ह्यातील जव्हार डोंगरदऱ्यांमधील दाभोसा धबधबा, नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात असणारे कावनई. गडगडा, त्रिंगलवाडी, हरिहर, बसगड, अंजनेरी इत्यादींसारख्या बऱ्याच किल्ल्यांची सैर पावसात करता येते. धुळे, नंदुरबारजवळील तोरणमाळ हे ठिकाण पावसाळ्यात पाहण्यासारखे आहे. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वाटेवर वरंधाघाट लागतो. वरंधाघाटालगतच कावळ्या या किल्ल्यावर जाता येते. डोंगरातून वाहणारे छोटे-छोटे झरे, धबधबे, बाजूला खोल दरी आणि त्या दरीत दिसणारे छोटेसे गाव आणि त्या गावालगत वाहणारी नदी, असे वेड लावणारे सौंदर्य वरंधघाटात आहे. वरंधघाटात उतरल्यावर शिवथरघळ येथील गुहा आणि गुहेबाहेर पडणारा पाऊस आणि धबधबा पाहण्यासारखा आहे.
माळशेज घाट :
अवघ्या महाराष्ट्राला आठवण होते ती माळशेज घाटाची. आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळाळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकरणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल, तर अहमदनगर-कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे.
कणेरी मठ, कोल्हापूर :
कोल्हापूरपासून दहा-बारा कि.मी.वर असलेल कणेरीमठ या ठिकाणाची सहल ग्रामीण जीवनशैलीची सुंदर ओळख करून देते. कणेरीमठ येथील सिद्धगिरी म्युझियमप्रेक्षणीय आहे. ही सहल मोकळी हवा, हिरवागार परिसर आणि शहरातील दैनंदिन जीवनापेक्षा खूप वेगळा अनुभव देणारी अशीच ठरेल. सिद्धगिरी म्युझियम हे ठिकाण पुणे-बंगळूर महामार्गावर आहे.
टिपेश्वर वाघोबा :
यवतमाळ जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अवघे ------ किलोमीटर अंतर असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात वाघांचे मनसोक्त दर्शन गेल्या काही दिवसांपासून होत आहे. दुर्मिळ प्राणी समजल्या जाणाऱ्या आणि सर्वांचे आकर्षण असलेल्या वाघांचे सहज दर्शन होऊ लागल्याने अभयारण्यात पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.
टिपेश्वर येथे वाघोबाचे दर्शन घेण्यासाठी जावयाचे असल्यास पांढरकवडा येथून राष्ट्रीय महामार्ग 7 अदिलाबादकडे जाताना डाव्या बाजूस सुन्ना गावाजवळून अभयारण्यात प्रवेश करता येतो.
कुडा लेणी :
मुरुड-जंजिऱ्यापासून जवळच असणाऱ्या कुडा येथील लेणी आसपासच्या निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीमुळे प्राचीन इतिहासाच्या अभ्यासकांना आकर्षित करतात. मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून माणगावच्या आग्नेयला कुडा हे रायगड जिल्ह्यातील एक शांत खेडेगाव आहे.
मालवण देवबाग :
देवबागच्या समुद्र किनाऱ्यावरील "सुनामी आयलंड' बघण्याची उत्सुकता होती..
"सुनामी आयलंड' हा एक निसर्गाचा चमत्कार आहे. या आयलंडला देवबागच्या किनाऱ्यावरून बोटीने जावे लागते. या सोयी उत्तम व किफायतशीरही आहेत. हा आयलंड तसा फार पूर्वीपासून या ठिकाणी आहे.
गोनी किल्ला :
जांभीवलीहून या किल्ल्याला जावे लागते. हा प्रवास लोणावळ्याहून सुरू होतो. बरोबर मार्गदर्शक हवा. लोणावळा-भीमाशंकर ही वाट उजव्या हाताला जंगलातून ही वाट जाते. उजवीकडे प्रचंड कातळ आणि डावीकडे खोल दरी. अरुंद वाट पार करताना कमालीच एकाग्रतेची आवश्कता आहे. येथे बहिरीदेवाची, श्रीगणेशाची आणि भवानीदेवीची मूर्ती आहे.
समुद्रकिनारा
श्रीवर्धन, हरिहरेश्वर :
रायगड जिल्ह्यातील ही पर्यटनस्थळे आहेत. येथील सुखद हवेची झुळूक, मऊ वाळू आणि समुद्राचे पाणी पर्यटकांना आकर्षून घेते. समुद्री अन्न, मासे, झिंगे, बोंबील यांची दुर्मिळता जाणवत नाही. श्रीवर्धन येथे पेशव्यांचे स्मारक आहे. पेशवे मूळचे श्रीवर्धन येथील होते. हरिहरेश्वर शहर हे शांत आणि आकर्षक म्हणून प्रसिद्ध आहे. येथील पुळण व हरिहरेश्वरचे मंदिर प्रसिद्ध आहे.
वेंगुर्ले-मालवण :
लांबवर विस्तारलेली पांढरी शुभ्र वाळू, चिकू, नारळ, आंबा अशा फळझाडांनी सजलेल्या टेकड्या यांनी वेंगुर्ले पर्यटनस्थळ म्हणून पर्यटकांची मान्यता मिळाली आहे. ही दोन्ही पर्यटनस्थळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. वेंगुर्ल्याच्या पूर्व-पश्चिम आणि उत्तरेस खडकाळ प्रदेश आहे, तर माडांच्या झाडांमध्ये लपलेले मालवण शहरही खडकाळ क्षेत्रांनी वेढलेले आहे. मालवणचे खाद्यपदार्थही लोकप्रिय आहेत.
गणपतीपुळे :
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेले गणपतीपुळे या ठिकाणास नेत्रदीपक समुद्रकिनारा लाभला आहे. येथील स्वयंभू गणेशाचे मंदिर कित्येकांचे श्रद्धास्थान आहे. स्वच्छ समुद्र किनारा, स्वच्छ पाणी, महत्त्वपूर्ण वनस्पती, माड आणि पाणथळ झाडे यांनी गणपतीपुळे समृद्ध बनले आहे. येथून 25 किलोमीटर अंतरावर रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण आहे.
डहाणू- बोर्डी :
ठाणे जिल्ह्यातील डहाणू हे समुद्रकिनाऱ्याला लागूनच विस्तारलेले शहर आहे. डहाणू ते बोर्डी असा 17 किलोमीटरचा किनारा विस्तारला आहे. डहाणू फळझाडांच्या रांगांनी सजलेले आहे. चिकूसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पर्शियनांचे धर्मस्थळ उद्वाडा हे येथून जवळच आहे.
No comments:
Post a Comment