देवनागरी लिपीमध्ये मुद्रित झालेला जगातील पहिला ग्रंथ आणि जगातील पहिली मुद्रित भगवद्गीता मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात समाविष्ट झाली आहे.
इसवीसन १८०५ मध्ये छपाई झालेल्या या भगवद्गीतेनंतरच देवनागरीमध्ये ग्रंथ छपाईची परंपरा सुरू झाली. इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांच्या संग्रहात असलेल्या या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील संशोधक मिरजेस भेट देत आहेत.
कुरूक्षेत्रावर झालेल्या कौरव-पांडव युद्धावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले तत्त्वज्ञान म्हणजे गीता हा ग्रंथ. श्रीकृष्णाने गीतेतून अर्जुनाला केलेले हे उपदेश आजच्या जगालाही तेवढेच लागू आहेत, असे मानले जाते. त्यामुळेच शेकडो वर्षांनंतरही भगवद्गीता या ग्रंथाचा प्रभाव भारतीय समाजावर तर दिसतोच, पण या ग्रंथातील या तत्त्वज्ञानाचा शोध घेत अनेक परदेशी अभ्यासकही भारताकडे आकर्षित होत असतात.
यातील अनेकजण या महाकाव्याचा आणि त्यानिमित्ताने त्याच्या पहिल्या मुद्रित प्रतीचा शोध घेत अगदी मिरजेतही दाखल होतात. आज, २५डिसेंबरच्या गीता जयंतीनिमित्त हा ग्रंथ पाहण्यास खुला ठेवला आहे.
देवनागरीमध्ये छपाई सुरू होण्यापूर्वी गीतेच्या हस्तलिखित प्रती काढण्यात येत होत्या. परंतु या पद्धतीत प्रती तयार करण्यावर मर्यादा होत्या.
त्यामुळे हा ग्रंथ सामान्यांना सहजप्राप्त होत नव्हता. ब्रिटिशांच्या आगमनानंतर मुद्रणकलेला प्रारंभ झाला. मात्र सुरुवातीस देवनागरीतील ही छपाई रोमन लिपीमध्ये केली जात होती.
इसवीसन १८०५ मध्ये बंगालमध्ये श्रीरामपूर येथे विल्यम कॅरे याने देवनागरी लिपीमध्ये ‘ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज’ प्रसिद्ध केले होते.
याच वर्षी पुणे येथे सवाई माधवरावांच्या दरबारात असलेला इंग्रज वकील चार्लस् मॅलेट याने येथील एका तांबट कारागिराला तांब्याच्या पत्र्यावर मुद्रण करण्यास शिकविले. त्याच्याकडून त्याचवर्षी देवनागरी लिपीतून छपाईस प्रारंभ होणार होता.
हे समजल्यावर या कारागिराला मिरजेचे तत्कालीन संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन उर्फ पहिले बाळासाहेब यांनी मिरजेत बोलावून घेतले. त्याच्याकडून देवनागरीतील पहिला मुद्रित ग्रंथ म्हणून भगवद्गीतेची छपाई करवून घेतली. एकप्रकारे १८०५ मध्येच छपाई झालेला हा ग्रंथही देवनागरीतील पहिला मुद्रित ग्रंथ ठरला.
१६६ पृष्ठांची गीता
या ग्रंथासाठी प्रथम तांब्याच्या पत्र्यावर भगवद्गीता कोरण्यात आली. या ठशांच्या आधारे पुढे छपाई करत या भगवद्गीतेच्या काही प्रती मुद्रित करून घेण्यात आल्या. या प्रथम मुद्रित प्रतीमधील एक प्रत मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात आहे.
१६६ पृष्ठांच्या या भगवद्गीता ग्रंथाच्या शेवटी मुद्रणस्थळ, काळाचा उल्लेख केला आहे. यामध्ये मिरजेचा उल्लेख ‘मरकडेय मुनीक्षेत्रे’ असा तर काळाचा उल्लेख ‘शके १७२७, क्रोधननाम संवत्सरे’ असा आलेला आहे.
No comments:
Post a Comment