हवा प्रदूषणाशी आपल्या विविध आरोग्य समस्या जोडलेल्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने श्वासोच्छ्वासाशी निगडित जास्त आहेत. कार्बन मोनॉक्साइडसारखी अनेक घातक प्रदूषके श्वासामधून फुप्फुसात जातात व तेथून सरळ रक्तामध्ये प्रवेश करतात ती बाहेर न येण्यासाठीच. आपल्या देशात हवा प्रदूषणाची समस्या सर्वात जास्त गंभीर आहे.
🔰 ‘ग्लोबल अलायन्स ऑन हेल्थ अॅण्ड पोल्यूशन’ या संस्थेने डिसेंबर २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या पाहणीनुसार प्रदूषणामुळे अकाली मरण पावणाऱ्या एकूण संख्येच्या १५ टक्के मृत्यू हे भारतात होत आहेत. (दुसरीकडे, कोविड-१९ सारख्या विषाणूंचा प्रभाव अतिशय घातकरीत्या प्रदूषित झालेल्या हवेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर सर्वाधिक असल्याचेही २०२० मध्ये निदर्शनास आले आहे.)
🔰शहरांत होत असलेली लाखो वाहनांची गर्दी आणि कोंडी, त्यातून बाहेर पडणारा खनिज तेल ज्वलनाचा धूर, सतत सुरू असलेल्या बांधकामांमुळे सूक्ष्म धूलिकणांचे वाढलेले प्रमाण, त्यात भर म्हणजे नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड हे सर्व हवा प्रदूषित करत आहेत. पावसाळा आणि उन्हाळा यांच्या तुलनेत हिवाळ्यात सर्वात जास्त हवा प्रदूषण पाहावयास मिळते ते केवळ धुरक्यामुळेच. हिवाळ्यामध्ये सर्वत्र पेटलेल्या शेकोटय़ा, शेतामधील पिकांचे अवशेष जाळणे यामुळे हवेचे प्रदूषण वाढतच जाते. अस्वच्छ हवा म्हणजे रोग पसरविणाऱ्या बुरशी आणि विषाणूंचे माहेरघरच.
🔰 ‘जगातील सर्वाधिक क्षयरोग्यांचा देश’ ही आपल्या देशाची ओळख ही हवा प्रदूषणामुळेच आहे. कारण हवेद्वारेच या जिवाणूंचा प्रसार होतो. हवा प्रदूषण आणि त्यामधील विविध प्रदूषके यामुळे सर्दी, खोकला, शिंका, ताप ही क्षयरोगाची प्रारंभिक लक्षणे सर्वत्र आढळतात. ही शरीराची प्रतिकारशक्ती असते. जवळ स्वच्छ रुमाल ठेवणे ही साधी गोष्टसुद्धा अनेक वेळा टाळली जाते. प्रदूषित हवेमुळे त्वचेवर परिणाम होतात, त्याचबरोबर मेंदूवरही- ‘अल्झायमरसारखा आजार याच प्रदूषणामुळे होतो,’ असे श्वसनविकारतज्ज्ञ म्हणतात. हवा प्रदूषण केवळ शरीरावरच नाही तर व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरसुद्धा परिणाम करत असते. प्रदूषित हवा असणाऱ्या भागात राहणाऱ्या मुलांमध्ये वाढत्या स्किझोफ्रेनियाचे प्रमाण याचमुळे चिंतेचे कारण आहे. हवा प्रदूषणाचे परिणाम गरोदर स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर त्वरित दिसून येतात. वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की, हवा प्रदूषणाचा परिणाम एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज जाऊ शकतो. म्हणूनच हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सर्वानीच एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा