Monday, 7 December 2020

व्हाइट हाउस सोडण्यास डोनाल्ड ट्रम्प तयार, पण ठेवली ‘ही’ अट



अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर व्हाइट हाउस सोडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, यासाठी त्यांनी एक अट ठेवलीये. जर इलेक्टोरल कॉलेजकडून जो बायडन यांना अधिकृतपणे विजेता म्हणून घोषित करण्यात आलं तर मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे, असं महत्त्वाचं विधान ट्रम्प यांनी केलं आहे.


निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी पहिल्यांदाच माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांनी , जर इलेक्टोरल कॉलेजनी जो बायडन यांना निवडणुकीचा विजेता ठरवलं तर मी निश्चितपणे व्हाईट हाऊस सोडेन असं म्हटलं. या निवडणुकीत घोटाळा झालाय. हा एक उच्च स्तरीय घोटाळा आहे, असा पुनरुच्चार ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला. तसंच, जर इलेक्टोरल कॉलेजनी जो बायडन यांना विजेता म्हणून घोषित केलं तर ती त्यांची मोठी चूक ठरेल असंही ट्रम्प म्हणाले.


डोनाल्ड ट्रम्प यांचा अलिकडेच झालेल्या निवडणुकीत पराभव झाला आहे. पण, डोनाल्ड ट्रम्प आपला हा पराभव मान्य करायला तयार नव्हते. निवडणुकीत आपला पराभव होतोय, हे लक्षात येताच त्यांनी कांगावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता व्हाइट हाउस सोडण्याबाबत ट्रम्प यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.


दरम्यान, इलेक्टोरल कॉलेज मतांवर अखेरचा निर्णय घेण्यासाठी पुढील महिन्यात बैठक घेणार आहे. 14 डिसेंबर रोजी अमेरिकी इलेक्टोरल कॉलेज बायडन यांच्या विजयाची घोषणा करण्याची शक्यता असून त्यानंतर 20 जानेवारी रोजी जो बायडन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील अशी माहिती आहे. 

No comments:

Post a Comment