Saturday, 5 December 2020

सोलापूर जि. प. शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार'


सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे. डिसले यांच्या रुपाने भारताला पहिल्यादाचं हा सन्मान मिळाला आहे.


युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी शाळेचे शिक्षक रंजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. तब्बल सात कोटी रक्कमेचा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरल्याने, त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारासोबतच त्यांना जगातील सर्वोत्तम शिक्षक असा बहुमान प्राप्त झाला आहे. पुरस्काराची रक्कम आपण विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करणार असल्याचे डिसले गुरुंजीनी मटाला सांगितले.

लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. डिसले यांची अंतिम दहा स्पर्धकांमध्ये निवड झाल्यावर, त्यांचे कौतुक थेट बॉलिवूडमधूनही करण्यात आले होते. क्युआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रतच नव्हे, तर देशातील शिक्षण क्षेत्रांत डिसले यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी डिसले यांनी निवड करण्यात आली आहे.असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे डिसले यांनी जाहीर केले आहे. त्या माध्यमातून ९ देशांतील शेकडो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ३० टक्के रक्कम डिसले ते टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार आहे. त्यामुळे देशातील शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे डिसले यांनी सांगितले.तर, उर्वरित २० टक्के रक्कम विविध देशातील विद्यार्थ्यांच्या 'पीस आर्मी'साठी वापरणार येणार असल्याचे डिसले यांनी सांगितले.

मी सोलापूर जिल्ह्यात असतांना, पुरस्कारांची घोषणा झाली. आपल्याला पुरस्कार जाहीर झाल्याचे कळाल्यावर खूप आनंद झाला आणि समाधान वाटले. या पुरस्कारासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी, वार्की फाउंडेशन आणि शालेय शिक्षण विभागाचे आभार मानतो. हा पुरस्कार मी राज्य व देशातील माझ्या शिक्षक बांधवांना समर्पित करतो. पुरस्काराची निम्मी रक्कम ९ शिक्षकांना त्यांच्या देशातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी देण्यात येईल. तर, शिक्षकांना टेक्नोसॅव्ही बनवण्यासाठी ३० टक्के रक्कम वापरण्यात येईल. उर्वरित रक्कमेतून २०३० पर्यत विविध देशातील ५० हजार विद्यार्थ्यांची पीस आर्मी तयार करण्यात येईल.

रणजितसिंह डिसले, ग्लोबल टीचर प्राइज विजेते


कोण आहे डिसले गुरुजी?

सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.

No comments:

Post a Comment