Wednesday, 9 December 2020

राष्ट्रप्रेमी बाबासाहेब....

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही केवळ व्यक्ती नसून तो विचार आहे. हा विचार प्रेरणादायी आणि प्रवाही आहे. त्यांचे जीवन आणि कार्य हे तळागाळातील हजारो वर्षांच्या सामाजिक अन्याय आणि आर्थिक शोषणामुळे भरडलेल्या लोकांकरिता प्रेरणा आहे. ही प्रेरणा केवळ वैचारिक पातळीपुरती मर्यादित नाही, तर झोपलेल्या समाजाला जागृत करून त्यांच्यात स्वाभिमान, अस्मिता आणि आर्थिक सबळता निर्माण करण्याचा कृती कार्यक्रम आहे. जाज्वल्य-राष्ट्रनिष्ठा आणि देशप्रेम हे बाबासाहेबांच्या जीवन आणि कार्याचे अतूट अंग आहे. त्यांनी निर्माण केलेल्या आणि मूलभूत सिद्धान्त मांडणाऱ्या प्रचंड ग्रंथरचनेत, पत्रकारितेत, लिखाणात, भाषणात या देशाची भौगोलिक अखंडता आणि राष्ट्रीय एकता आणि अस्मिता याला छेद पडेल अथवा ती भंग पावेल असे कोणतेही वाक्य व वक्तव्य दिसून येत नाही. 'भारत' या शब्दाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष आकर्षण होते. त्यांनी स्थापन केलेल्या एका पाक्षिकाचे नाव 'बहिष्कृत भारत' आणि मुद्रणालयाचे नाव भारत भूषण प्रिंटिंग प्रेस' असे होते. परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांच्या राष्ट्रीय कार्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अजूनही संकुचित आणि पूर्वग्रहदूषित आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला नाही अथवा गांधीजींच्या राजकीय चळवळीत सहभागी झाले नाहीत. याचा अर्थ असा होत नाही की त्यांना भारताचे स्वातंत्र्य नको होते. त्यांना भारताचे नुसते स्वातंत्र्य नको होते, त्याचबरोबर दलित आणि अस्पृश्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उत्थानाचा संबंध स्वातंत्र्याशी जोडणे आवश्यक वाटत होते. देश स्वतंत्र झाला पण लोक स्वतंत्र झाले का ? हा प्रश्न ते सदैव विचारीत असत. डॉ. बाबासाहेबांबद्दल सर्वसामान्य जनतेची अजूनही समजूत ब्रिटिशधार्जिणा, काँग्रेस-गांधी विरोधक, हिंदूद्वेष्टा आणि विशिष्ट वर्गाच्या हिताकरिता चळवळ करणारा इत्यादीवर आधारित आहे. पण ही पूर्णतः गैरसमजूत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची साहित्य चळवळ, जीवन आणि कार्य यांचा अभ्यास केल्यास हे स्पष्ट दिसून येते की त्यांनी स्वराज्याला कधीही विरोध केलेला नाही. या उलट स्वतंत्र भारत हे मजबूत सबळ आणि प्रगत राष्ट्र झाले पाहिजे असे त्यांचे स्वप्न होते. बाबासाहेबांचा दृष्टिकोन, स्वराज्य हे केवळ मूठभर लोकांचे आणि सत्ताधीशांचे आहे, असा नव्हता; तर पीडित आणि उपेक्षितांसह सर्वांचे स्वातंत्र्य ही कल्पना बाबासाहेबांच्या मनात सतत होती. पण तसे स्वराज्य निर्माण होण्यास या देशातील समाजव्यवस्था अनुकूल नाही अशी शंका त्यांच्या मनात होती. गेली ७०० वर्षे राजकीय जमात म्हणून विशेषाधिकार भोगलेल्या बॅरिस्टर जिन्ना यांनी धर्माच्या नावाने भारताचे तुकडे पाडून पाकिस्तानची निर्मिती केली. पण व्यक्तिगत जीवनात अनेक अन्याय आणि अत्याचार भोगून हजारो वर्षांच्या सामाजिक गुलामगिरीची पूर्वपीठिका असताना सुद्धा त्यांनी या देशाची एकता आणि अखंडता एकात्मतेकरिता सदोदित प्रयत्न केले. बाबासाहेबांचे कार्य हे केवळ दलित उद्धारापुरते मर्यादित नव्हते, तर ते राष्ट्र उद्धाराचे कार्य होते.

         राष्ट्रीय एकात्मकतेच्या संदर्भात डॉ. बाबासाहेबांचे राष्ट्रप्रेम आणि निष्ठा ही वादातीत आहे. ब्रिटिश राजवटीच्या अनेक गोष्टींचे बाबासाहेबांनी गुणगान व समर्थन केले असले तरी त्यांनी त्यांच्या दोषांचा, अन्याय आणि अत्याचारांचाही प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. मुंबई विधान परिषदेत ते ब्रिटिश सरकारचे नामनिर्देशित सदस्य (१९२७-१९३९) होते. तरीपण त्यांनी ब्रिटिशांचे कायदे आणि धोरण यावर एक खरा राष्ट्रभक्त

आणि देशप्रेमी या नात्याने प्रखर टीका केलेली आहे. ‘आम्ही सर्व एक आहोत, ही भावना म्हणजेच राष्ट्र' भारतातील फार मोठा जनसमूह हा जातीच्या आणि अस्पृश्यतेच्या नावाखाली जर वेगळा पडलेला असेल तर तो समूह देशाच्या प्रमुख प्रवाहात कसा येईल ? म्हणजेच खऱ्या अर्थाने राष्ट्र म्हणता येणार नाही आणि राष्ट्रीय भावना निर्माण होणार नाही. आमची 'विविधतेतील एकता' केवळ घोषणा होईल. या वंचित जनसमूहाला, बाबासाहेबांनी आपल्या कार्याने आणि चळवळीने, प्रमुख प्रवाहात सहभागी करून घेण्याचे मोठे कार्य केले. राष्ट्रवाद ही खऱ्या अर्थाने लोकांची सांस्कृतिक आणि एकात्मिकतेची भावना आहे. ती मनुष्याच्या विचारांची उपज आहे. म्हणून त्याचा जीवन व कृती यांच्याशी सरळ संबंध आहे. वंचित वर्ग हा बहुधा आपल्या हक्काकरिता सशस्त्र क्रांतीकडे वळत असतो. परंतु बाबासाहेबांनी या वंचित वर्गाला कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन करण्याचे बाळकडू पाजले आहे. बाबासाहेब म्हणतात, “राष्ट्रवाद ही अशी सत्य स्थिती आहे की त्याला विसरता येत नाही किंवा नाकारता येत नाही." इतर संस्कृती आणि देशांचे उदाहरण देऊन बाबासाहेबांनी आक्रमक राष्ट्रवादाला नाकारले आहे. राष्ट्रीय सन्मान आणि सामाजिक एकता हे त्यांच्या राष्ट्रवादाचे मूलाधार होते. शोषित आणि वंचित वर्गाच्या हिताकरिता चळवळ करणे हा त्यांच्या राष्ट्रीय कार्याचाच भाग होय. 

त्यांच्या राष्ट्रीय भावनेत दोन गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात- 

१. ब्रिटिश सत्तेचा अंत, स्वकीयांचे राज्य.

 २. जातिविहीन आणि समताधिष्ठित समाजाची निर्मिती.

त्यांची विचारधारा ही मानवतावादी आणि लोकशाहीवादी असली तरी ती प्रखर राष्ट्रभक्तीने ओतप्रोत होती. कारण वर्ण, जात, वंश आणि सांप्रदायिकता यांना बाबासाहेबांनी आपल्या राष्ट्रवादाचा आधार कधीही मानलेला नाही. सर्व भारतीय लोकांत एकात्मतेची भावना निर्माण व्हावी आणि आम्ही सर्व भारतीय आहोत म्हणून जगावे हे त्यांचे स्वप्न होते. दलित वर्गाचे स्वार्थ आणि देशाप्रति कर्तव्य, यात त्यांनी देशाला प्रथम स्थान दिलेले आहे.


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...