Tuesday, 28 May 2024

रामोशांचा उठाव



०१. सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साताऱ्याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते होते. पुण्याच्या आग्नेय भागात रामोशांची जास्त दहशत होती.


०२. सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्याचा भाऊ अमृता नाईक यांनी पुण्याजवळ भांबूर्ड्याचा लष्करी खजिना १९२४-२५ साली लुटला. पुण्यातून रामोशांच्या हकालपट्टीसाठी ब्रिटिशांनी जवाहरसिंग रामोशी यास सासवडचा अंमलदार बनविले. पण उमाजी व सत्तू नाईकाने जवाहरसिंग व त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्याने त्याने इंग्रजांची नोकरी सोडून दिली.


०३. सत्तू नाईकनंतर रामोशांचे नेतृत्व उमाजी नाईककडे आले. भूजाजी, येसाजी, कृष्णाजी व अमृता हे उमाजीचे विश्वासू साथीदार होते. उमाजी स्वतःला राजे म्हणवून घेत असे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावी १७९१ साली उमाजीचा जन्म झाला होता.


०४. ब्रिटीश काळात रामोशांची संख्या १८००० होती. दरम्यानच्या काळात उमाजीने एका यात्रेत तलवारीने कोतवालाचे तुकडे करून पोलिसांत दहशत पसरविली. उमाजीला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी १८२६ साली पहिला जाहीरनामा काढला. यानुसार उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यांना पकडून देणाऱ्यास १०० रु. इनाम जाहीर केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.


०५. सरकारने पुन्हा जाहीरनामा काढून इनामाची रक्कम १२०० रु केली. आणि जाहीरनाम्यात असे म्हटले कि, सरकारला मदत नाही केलीत तर बंडवाल्यात सामील झालात असे समजण्यात येईल. यावेळी उमाजीस पकडून देण्याचा विडा उचलणाऱ्या शिवनाक महारास रामोशांनी ठार केले.


०६. त्यावेळी उमाजीचा धाक पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जेजुरी, सासवड व मराठवाड्याच्या काही भागात होता. यावेळी पुण्याचा कलेक्टर एच.डी. रॉबर्टसन याने वेळोवेळी जाहीरनामा काढून उमाजीला पकडण्याचे ठरविले. कोणीच गद्दारी न केल्यामुळे त्यांच्या हाती काहीच आले नाही.


०७. रॉबर्टसनने दरम्यान कोकणावर वचक बसविण्यासाठी बंडखोरांची माहिती देणाऱ्यासाठी खास बक्षीस जाहीर केले. या काळात उमाजीने ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांनी ब्रिटीशांकडे महसूल न भरता उमाजींकडे द्यावा असे जाहीर केले. याच्या परिणामस्वरूप भोर संस्थानातील १३ गावांनी उमाजीकडे महसूल भरला.


०८. शेवटी ब्रिटिशांनी उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना अटक केली. त्यामुळे कुटुंबाखातर उमाजी ब्रिटिशांना शरण आला. ब्रिटिशांनी त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्याला सरकारी नोकरी दिली. पुणे व सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम उमाजीकडे देण्यात आले. पण पुढे नंतर १३ गावांच्या महसुलावरून उमाजी व ब्रिटीश यांच्यात वाद सुरु झाला.


०९. १८३१ साली ब्रिटिशांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश यांच्याकडे सोपविली.उमाजी, येसाजी, मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्यास ५००० रुपये व २ बिघा जमीन बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी एकट्या उमाजीस पकडून देणाऱ्यास २५०० रुपये व १ बिघा जमीन जाहीर करण्यात आली.


१०. बक्षिसाच्या आमिषाला बळी पडून एकेकाळचे त्याचे जवळचे साथीदार काळू रामोशी व नाना रामोशी यांनी गद्दारी केली. उमाजीचा जुना शत्रू बापूसिंग यानेही त्यांना मदत केली. १५ डिसेंबर १८३१ रोजी कॅप्टन मैकिन्तोशने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अवळस येथे उमाजीला अटक केली. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी उमाजीला फाशी देण्यात आली.


११. उमाजी नाईकनंतर रामोशांनी दौलतराव नाईक याच्या नेतृत्वाखाली लढा सुरु ठेवला. सह्याद्रीच्या खोऱ्यात येसूबाईच्या डोंगरात दौलतराव नाईक व मेजर डैनियल यांच्यात चकमक झाली त्यात नाईक व त्याचे सहकारी मारले गेले. मारताना नाईकांनी फडकेंना विनंती केली कि, रामवंशी (रामोशी) पुढे स्वार्थासाठी दरोडे घालणार नाहीत याची दक्षता घ्या.


१२. त्यानंतर नाशिक व अहमदनगर भागात राघू भांगरे याने ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला. २० सप्टेंबर १८४४ रोजी राघू भांगरेनी एका पोलिस अधिकाऱ्यासह ७ पोलिसांना ठार केले. ब्रिटिशांना सहाय्य करणाऱ्या पाटलांची नाके त्याने कापली. त्याच्या बंदोबस्तासाठी ब्रिटिशांनी ५००० रुपयाचे बक्षीस जाहीर केले. त्याला पकडण्याची जबादारी पाटील व कुलकर्ण्यावर सोपविली.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...