Sunday 27 December 2020

केरळमध्ये २१ वर्षीय युवतीचा महापौरपदाचा मार्ग मोकळा




तिरुअनंतपुरम : केरळमध्ये तिरुअनंतपुरम महापालिकेच्या महापौरपदी आर्या राजेंद्रन या २१ वर्षीय युवतीची निवड झाल्यात जमा आहे, कारण नगरसेवकांच्या बैठकीत तिचे नाव मंजूर करण्यात आले असून आता केवळ माकपच्या राज्य शाखेचे शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.


आर्या यांनी सहा दिवसांपूर्वी माकपच्या नगरसेविका म्हणून शपथ घेतली. सर्व काही सुरळीत पार पडले तर त्या महापौर होणार आहेत. अजूनही त्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असून आता त्या तिरुअनंतपुरमच्या सर्वात तरुण महापौर ठरतील.


पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिरुअनंतपुरम महापालिकेत माकपची सत्ता स्थापन झाली असून पक्षाची पहिली बैठक शुक्रवारी झाली. त्यात आर्या राजेंद्रन यांचे नाव महापौर पदासाठी सुचवण्यात आले.


महाराष्ट्रात भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर झाले होते.


आर्या राजेंद्रन यांना अभिनंदनाचे अनेक संदेश आले असून त्या मुदावनमुक्कल या भागात भाडय़ाच्या घरात राहतात. त्यांनी सांगितले, की परिपक्वता व नेतृत्व गुण हे कुणाच्या वयावरून ठरवले जात नसतात. राजकारण पुढे नेणे व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणे ही आपली दोन उद्दिष्टे राहतील.


आर्या या माकप कार्यकर्ते के. राजेंद्रन यांच्या कन्या असून ते तारतंत्री आहेत. आई श्रीलता या एलआयसी प्रतिनिधी आहेत. आर्या या गणितात बीएस्सी करीत असून ऑल इंडिया सेंट्स महाविद्यालयात दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेत आहेत. कचरामुक्त शहरावर त्यांनी भर दिला आहे.

No comments:

Post a Comment