Thursday, 24 December 2020

‘एमपीएससी’ परीक्षार्थीना दिलासा

 राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा तब्बल चार वेळा स्थगित करून पुन्हा काही महिन्यांनी घेण्यात येणार असली तरी ‘चालू घडामोडी’ या महत्त्वाच्या विषयाच्या अभ्याक्रमात कुठलाही बदल होणार नसल्याची खात्रीशीर माहिती आयोगातील एका मोठय़ा अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे पुढे होणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मार्च २०२० पर्यंतच्या ‘चालू घडामोडीं’वरच प्रश्न येणार हे स्पष्ट झाले आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा अवांतर विषयांवर असला तरी आयोग विविध विषयांचा अभ्यासक्रम निश्चित करून देतो. यातील बहुतांश विषयांमध्ये फारसा बदल होत नसला तरी ‘चालू घडामोडी’ हा दैनंदिन विषय असल्याने त्यात बदल अपेक्षित असतो. त्यामुळे आयोग ‘चालू घडामोडीं’साठी परीक्षेच्या तारखेनुसार एक निश्चित कालमर्यादा ठरवून देत असते. त्यामुळे विद्यार्थी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यासही परीक्षेच्या तारेखा अंदाज घेऊन करीत असतात. मात्र, यंदा मार्च महिन्यापासून लागलेली टाळेबंदी व अन्य कारणांनी आयोगाने पूर्व परीक्षा तब्बल चारदा स्थगित केली. ११ ऑक्टोबरला होणारी परीक्षा अगदी तोंडावर आली आली असताना मुख्यमंत्र्यांनी ९ ऑक्टोबरला मराठा आंदोलनाचा धसका घेत परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. याला दोन महिने लोटूनही परीक्षेच्या नवीन तारखेबाबत अद्यापही निश्चिती नाही. परीक्षेची मूळ तारीख आणि आताच्या कालावधीमध्ये तब्बल दहा महिन्यांचा कालावधी लोटून गेल्याने पुढील काही महिन्यात होणाऱ्या परीक्षेमध्ये विशेषत: ‘चालू घडामोडी’ विषयाच्या अभ्यासक्रमात बदल होणार की जुन्याच तारखेच्या आधारावर अभ्यासक्रम राहणार, असा प्रश्न परीक्षार्थीसमोर होता. ‘चालू घडामोडी’ हा विषयच वारंवार बदलणारा असल्याने आयोग अभ्यासक्रम बदल करणार, अशीही चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होती. या सर्वाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही होत होता. मात्र, परीक्षांच्या तारखा बदलल्या तरी अभ्यासक्रमात कुठलाही बदल होणार नसून चालू घडामोडींसाठी मार्च २०२० पर्यंतचाच अभ्याक्रम दिला जाणार असल्याची माहिती आयोगातील एका अधिकाऱ्याने दिली. याशिवाय परीक्षेची तारीखही लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

नव्या प्रश्नपत्रिका काढणे कठीण

करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आयोगाने यंदा परीक्षा केंद्रांमध्ये वाढ केली. राज्यात तब्बल ७६१ केंद्रांवर परीक्षा होणार होती. सर्व जिल्हा केंद्रांवर प्रश्नपत्रिका आताही सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या प्रश्नपत्रिका आयोगाने अद्यापही परत बोलावल्या नसल्याने याच प्रश्नपत्रिकांवर परीक्षा होणार आहे. शिवाय नव्याने प्रश्नपत्रिका काढणे कठीण असल्याने अभ्यासक्रमात कुठलाही बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...