Thursday, 31 December 2020

मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये विदर्भातील १० जिल्ह्य़ांकडे पाठ.


🔰‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये विदर्भातील जिल्ह्य़ांकडे पाठ फिरवण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत तिसऱ्या टप्प्यात अमरावती वगळता इतर १० जिल्ह्य़ांमध्ये उद्योग उभारण्याच्या दृष्टीने एकही करार करण्यात आलेला नाही. विदर्भात गुंतवणूक करण्यात मोठे उद्योजक अनुत्सुक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव व राजकीय उदासीनतेमुळे विदर्भात नवीन उद्योग येत नसल्याचे चित्र आहे.


🔰राज्यात गुंतवणूक वाढून उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०’ उपक्रम राबविण्यात येत आहे. रोजगारनिर्मिती होण्यासोबतच अर्थव्यवस्थेला चालना देणे हा त्यामागचा उद्देश. या माध्यमातून औद्योगिकदृष्टय़ा मागास व अप्रगत भागात नवे उद्योग येणे अपेक्षित असताना समृद्ध भागातच नव्या उद्योगांसाठी करार करण्यात आले आहेत.


🔰वर्षभरात परदेशी कंपन्या आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक केली. गेल्या आठवडय़ात तिसऱ्या टप्प्यामध्ये २५ भारतीय कंपन्यांशी ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले. त्यातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होईल. यामध्ये पुणे, ठाणे आदी भागांमध्येच गुंतवणूक करण्यात उद्योजकांचा कल आहे. विदर्भ, मराठवाडय़ात गुंतवणूक करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.


🔰विदर्भातील ११ जिल्ह्य़ांपैकी केवळ अमरावती जिल्ह्य़ात २ उद्योगांचे करार झाले. उर्वरित १० जिल्ह्य़ांची पाटी कोरीच राहिली. अमरावती जिल्ह्य़ात वस्त्रोद्योग व रसायने उद्योगाचे करार झाले. त्यातून सुमारे ९०० कोटींची गुंतवणूक होऊन दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

No comments:

Post a Comment