Friday, 25 December 2020

मेघालयमध्ये ‘स्नेकहेड’ माशाची नवी प्रजाती



मेघालयच्या डोंगराळ भागात ‘स्नेकहेड’ या माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. चमकदार रंग आणि सापाप्रमाणे तोंड असणाऱ्या चन्ना कुळातील माशांची संख्या मेघालयात मोठय़ा प्रमाणात असून, या कुळातील नवीन प्रजाती नुकतीच समोर आली आहे.


भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संशोधक प्रवीणराज जयसिन्हा, अरुमुगम उमा, एन.मौलीथरन, गजेंद्र सिंह, बंकित के. मुखिम आणि तेजस ठाकरे यांच्या चमूने या प्रजातीवर संशोधन केले आहे. नुकतेच अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट आणि हर्पेटोलॉजिस्टच्या ‘कोपिया’ या नियतकालिकामध्ये यासंदर्भात शोधनिबंध प्रकाशित झाला.


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मेघालयमधील एरिस्टोन रेडॉन्ग्संगी यांनी या प्रजातीचे छायाचित्र जयसिन्हा यांना पाठवले. त्यानंतर त्यांनी आपल्या चमूसह मेघालयाचा दौरा करून या प्रजातीचा अभ्यास केला. गुणसूत्रे, आकारशास्त्राच्या अभ्यासाद्वारे जयसिन्हा यांनी त्यावर जानेवारीमध्ये शोधनिबंध लिहिला. त्यानंतर एक वर्षांने कोपियाने त्यावर शिक्कामोर्तब केले.


एरिस्टोन यांनी ही प्रजाती सर्वप्रथम आमच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे या प्रजातीचे नामकरण ‘चन्ना एरिस्टोनी’ असे करण्यात आल्याचे जयसिन्हा यांनी सांगितले. डोंगराळ भागातील वाहत्या पाण्याच्या प्रवाहांमध्ये हा मासा हमखास सापडतो. 


तसेच पाण्यात दगडांच्या सांद्रीमधून त्याचा अधिवास असतो असे त्यांनी नमूद केले. तसेच या माशास वर्षभर थंड पाणी आणि भरपूर ऑक्सिजनची गरज असते. 


या माशास चांगली मागणी असते.

महाराष्ट्रात चन्ना कुळातील प्रजाती ‘डाकू’ या नावाने ओळखली जाते, असे जयसिन्हा यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत राज्यातून या प्रजातीचे अस्तित्व जवळपास नामशेष झाले असून, गेल्या वर्षी रत्नागिरीजवळ नोंद झाली होती.

No comments:

Post a Comment