Thursday, 11 April 2024

भिल्लांचे उठाव



०१. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी खानदेश ताब्यात घेतला. भिल्लांची वस्ती विशेषतः याच भागात असल्याने भिल्लांच्या मनात इंग्रजाबद्द्ल द्वेष निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्रिंबकजी डेंगळे, भिल्ल नाईक, दसरत व धानजी, हरिया (हिरा), निहाल, सेवाराम सोनार (घिसाडी), भागोजी नाईक, खर्जासिंग, भीमा नाईक, उचेतसिंग पवार यांनी या उठावाचे नेतृत्व केले.


०२. त्रिंबकजी ढेंगळे हा दुसऱ्या बाजीरावचा मित्र व मराठा सरदार होता. दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर डेंगळेला ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेथून तो पळाला व त्याने भिल्लांना इंग्रजांविरुद्ध बंड करण्यास चिथविले. त्याने उठावाची सूत्रे त्याचे पुतणे गोदाजी व महिपा डेंगळे यांच्यावर सोपविली. तत्कालीन कलेक्टर कॅप्टन ब्रिग्जने उठावाचा बंदोबस्त करण्यासाठी भिल्लांचे मुडदे पाडले व डोंगरातील वाटघाटांवर सैन्य ठेऊन त्यांची रसद बंद केली.


०३. पण याउलट मुंबईचा गवर्नर माउंट एल्फिन्सटन याने मात्र भिल्लांना पेन्शन व काम देऊन त्यांचा बंदोबस्त केला.त्यांची वेगळी तुकडी उभारून आडमाळावर त्यांना तैनात केले. नादीरसिंह या भिल्ल डाकुस त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीनेच पकडण्यात आले.


०४. नोकऱ्या देऊनही भिल्ल थंड झाले नाहीत. त्यांनी उठाव सुरूच ठेवला. इंग्रजांनी भिल्लांच्या बंदोबस्तासाठी त्यांना माफी देण्याची घोषणा केली. यावेळी भिल्लाचे नेतृत्व सातमाळ्याचा भिल्ल नाईक करत होता. कॅप्टन ब्रिग्ज ने भिल्ल नाईकास पकडून त्याला फाशी दिली यासोबत शेख सादुल्ला यास कठोर शिक्षा केली.


०५. डसरत व धानजी हे लासूरच्या भिल्लांचे प्रमुख होते. त्यांनी १८२० मध्ये विशेषतः सातपुडा प्रदेशात गावे व घरे बेचिराख करण्याचे सत्र चालविले. त्यांच्या टोळीत शेख दुल्ला हा पेंढारी सामील झाला. मेजर मोरीन याने १०० मैलांवरील महत्वाच्या जागा जिंकल्याने दक्षिण भिल्लांच्या प्रमुखाना शरणागती पत्करावी लागली.


०६. १८२२ मध्ये सातमाळ्याचा हरिया व सातपुड्याचा निहाल भिल्ल यांनी भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व केले. यांच्या काळात अंदाधुंदी, बलात्कार व शोषणास मर्यादा राहिल्या नाहीत. यावेळी कॅप्टन रॉबिन्सन याने भिल्लांना यशस्वीरित्या दडपले.


०७. १८२५ मध्ये सेवाराम सोनारच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. यावेळी राजकीय नेत्यांनीसुद्धा याला पाठींबा दिला. सेवारामने साताराच्या राजाच्या नावाने बनावट पत्रे तयार केली व ती राजाच्या आदेशानुसार बागलान तालुक्यातील भिल्लांना वाटली. ही पत्रे भिल्लांनी उठाव करण्यासंदर्भातील होती.


०८. त्यानुसार भिल्लांनी लुटालूट केली. त्यांनी उतारपूरवर हल्ला केला व तेथील लुट मुरली महाल या किल्ल्यात ठेवली. लेफ्टनंट औट्रम याने यातील काही लुट परत मिळविली व सेवाराम व त्याच्या सहकाऱ्यांना पकडले. सेवारामबाबत औट्रम ने मवाळ भूमिका घेतली व भिल्लांच्या जमिनी परत दिल्या.


०९. १८२८ पर्यंत भिल्लांचे उठाव कमी झाले पण संपले नव्हते. पानिपतच्या लढाईत मरण पावलेल्या पवारांचा पणतू उचेतसिंग पवार याने धारच्या पवारांकडून गादी मिळविण्यासाठी भिल्लांना सोबत घेऊन दोन वेळा हल्ला केला होता. दोन्ही वेळेस तो पराभूत झाला.


१०. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात भिल्ल लोकांनी कोनारराव याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध बंड केले. पण सुसूत्रता नसल्याने इंग्रजांना बंड दडपून टाकणे सोपे ठरले.


११. काजरसिंग नाईक याने १८७५ च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले. तो पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता. त्याने ब्रिटीशांचा ७ लाखाचा खजिना लुटला. १८५७ च्या अंबापाणी लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई झाली. यात स्रियांचाही सहभाग होता.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...