Saturday, 7 November 2020

राशबिहारी बोस:

 (२५ मे १८८६ — २१ जानेवारी १९४५). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक देशभक्त. फ्रेंच चंद्रनगरच्या परंतु सिमल्याला एकटे राहून सरकारी छापखान्यात नोकरी करणाऱ्या विनोदबिहारींचा हा मुलगा. त्यांच्या जन्मतिथीविषयी तसेच जन्म स्थानाविषयी एकवाक्यता नाही. बहुतेक तज्ञांच्या मते त्यांचा जन्म आजोळी सुबलदाह (बरद्वान) येथे झाला; पण आई लगेच गेली.  सावत्र आई व आजोबा कालिचरण यांनी संगोपन केले. चंद्रनगरला किंवा आजोळी कोणत्याच शाळेत हा आडदंड मुलगा स्थिर झाला नाही. उलट विद्यार्थिदशेतच चंद्रनगरच्या तरुण क्रांतिकारी गटाशी त्याने सूत जमविले होते. श्रीष घोष व अमरेंद्र चतर्जी यांनी त्याला क्रांतिदीक्षा दिली होती. मुलगा शिकत नाही म्हणून वडिलांनी त्याला पुढे सिमल्याला आणले. घरीच इंग्रजी व टंकलेखन शिकविले. दोन्हीत चांगली प्रगती झाल्यावर आपल्याच छापखान्यात चिकटवून दिले. स्वतंत्र वृत्ती व क्रांतीकडे ओढा असल्यामुळे घर सोडून दूर डेहराडूनला जंगल खात्यात राशबिहारींनी नोकरी धरली. १९०८ पासून १९१३ पर्यंत वारंवार रजा घेत असूनसुद्धा कशीबशी नोकरी टिकली. त्या वेळी बंगालच्या अनेक शहरांतून त्याचप्रमाणे बनारस, दिल्ली, लाहोर इ. शहरांतून क्रांतिगट कार्यरत होते.

प्रत्येक गटात एक तरी बंगाली असायचाच. त्यामुळे राशबिहारींना या सर्वांशी संबंध ठेवणे सुलभ गेले. १९१२ च्या मध्यास त्यांनी बंगाल-चंद्रनगरला जाऊन बाँब व बाँब साहित्य आणि अनेक तरुण क्रांतिकारक जमविले. बसंतकुमारला आपल्या घरी बरेच महिने ठेवून पूर्ण संधा दिली. बंगाली व पंजाबी क्रांतिकारी नेत्यांच्या सल्ल्याने व्हाइसरॉयवर बाँब टाकण्याची योजना आखली. बंसतकुमार तयार झाल्यावर त्यास लाहोरला धाडले. २२ डिसेंबरला लॉर्ड चार्ल्स हार्डिंग मोठ्या मिरवणुकीने दिल्ली येथे प्रवेश करून तेथे भारताची राजधानी सुरू करणार होते. आदल्या दिवशी राशबिहारी डेहराडूनहून व बसंतकुमार लाहोरहून दिल्लीला आले. एका क्रांतिकारक मित्राकडे दोघेही उतरले. दुसऱ्या दिवशी हत्तीच्या अंबारीत दिमाखाने बसलेल्या व्हाइसरॉयसाहेबांवर बसंतने बाँब फेकला. हार्डिंगना गंभीर इजा झाली. शरीररक्षक ठार झाला. राशबिहारी बरोबर होतेच. दोघेही नंतर लाहोर-डेहराडूनला परतले. पुढे राशबिहारींनी पुरविलेल्या बाँबच्या साहाय्याने व बसंतकुमारच्या मदतीने लाहोर गटाने धमाल उडवून दिली; पण शेवटी बिंग फुटले. दिल्ली कटाच्या खटल्यात बसंतकुमारसह चौघांना फाशी देण्यात आले. राशबिहारींवर वॉरंट होते; पण ते बनारसला गेले. तेथल्या अनुशीलन गटाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपविण्यात आले.

गदर चळवळ १९१४ च्या महायुद्धानंतर सुरू झाली. गदर क्रांतिकारकांच्या हालचाली सॅन फ्रॅन्सिस्कोपासून पंजाबपर्यंत पसरल्या होत्या. विष्णुपंत पिंगळे बनारस गटाचे साह्य घेण्यासाठी राशबिहारींना बनारसलाच भेटले. ज्या पंजाबमध्ये मुख्य उठाव योजिला होता, तेथेच समर्थ नेतृत्वाची उणीव होती. पिंगळ्यांच्या विनंतीवरून राशबिहारींनी पंजाबच्या गदर उठावाची योजना तयार करण्याचे मान्य केले. थोड्याच अवधीत त्यांनी सुसूत्रता आणली. क्रांतिकारकांचा विश्वास संपादन केला; पण एका घरभेद्यानेच संकल्पित उठावाची खडान् खडा माहिती पुरविल्यामुळे आदल्या दिवशीच धरपकडी झाल्या. या वेळीही राशबिहारी पोलिसांचे हाती लागले नाहीत. निरनिराळ्या खटल्यांतून ते फरारी आरोपी म्हणून जाहीर करण्यात आले होते. हजारो रुपयांची इनामे घोषित झाली होती.

अनेक भाषांवर प्रभुत्व, गुप्ततेच्या नियमांचे काटेकोर पालन, चाणाक्षपणा, हजरबाबीपणा आणि बेमालूम वेषांतरे करण्याची हातोटी, यांमुळे ते पुढे काही महिने पंजाब, बनारस, चंद्रनगर येथे राहू शकले. शेवटी जून १९१५ मध्ये ते जपानला पवननाथ टागोरांच्या पारपत्राच्या मदतीने निसटले. तेथेही युद्ध संपेपर्यंत त्यांनी क्रांतिकार्य चालू ठेवले होते. जपानी सरकारने त्यांना पकडण्याचे व ब्रिटिशांच्या हवाली करण्याचे हुकूम काढले. तेव्हा ते तेथेही अज्ञातवासात गेले. पुढे शोभा व जपानी युवतीशी विवाह केल्यामुळे काही वर्षांनी म्हणजे १९२३ साली त्यांना जपानी नागरिकत्व मिळाले. पुढील १८-१९ वर्षे त्यांनी लेखन-भाषणाद्वारे हिंदी स्वांतत्र्याच्या प्रश्नावर जपानी जनतेमध्ये जाणीव निर्माण करण्याचा अखंड प्रयत्न केला. जपानी जीवनाशीही ते समरस झाले होते.

पूर्व आशियातील हिंदी लोकांची १९४२ च्या मार्चमध्ये भव्य परिषद घेऊन त्यांनी हिंद स्वराज्य लीग स्थापन केली. हिंदी युद्धकैदी व इतर नागरिकांमधून आझाद हिंद फौज उभी करण्याचे कामीही त्यांनी हातभार लावला. जुलैमध्ये लीगचे दुसरे अधिवेशन बँकॉकला भरले. त्यात आझाद हिंद सेनेला जपानी सेनेच्या समान दर्जा मिळावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच राशबिहारींच्या नेतृत्वाखालच्या अस्थायी सरकारचे व आझाद हिंद फौजेचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी जपानला यावे असे जाहीर आवाहन नेताजी सुभाषचंद्र बोस यांना करण्यात आले. वर्षभराने नेताजींकडे दोन्ही संघटना सुपूर्द करून मोठ्या आनंदाने राशबिहारींनी प्रमुख सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांचा तरुण मुलगा महासिदे जपानी फौजेत होता. त्याला ब्रिटिश सेनेशी झालेल्या लढाईत वीरमरण आले. दुसरे महायुद्ध चालू असतानाच त्यांनी देह ठेवला. त्यांची पत्नी शोभा व मुलगी टेटूकी पुढे जपानमध्येच स्थायिक झाल्या.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...