Wednesday 4 November 2020

सरोजिनी नायडू



🔰 तयांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी).


🔰 वडील निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य. ते शिक्षणतज्ज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली.


🔰 निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. 


🔰 द गोल्डन थ्रेशहोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले.


🔰 सरोजिनींनी द गोल्डन थ्रेशहोल्डनंतर द बर्ड ऑफ टाईम (१९१२) व द ब्रोकन विंग (१९१७) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोण, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इ. वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या. पाश्चात्त्य तसेच पौर्वात्य देशांत त्यांस कीर्ती लाभली आणि कवयित्री म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला.


🔰 ‘भारतीय कोकिळा’ म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला. मात्र त्यांच्या गीतरचनेचा सूर एलियटच्या नव्या काव्यप्रवाहाशी जुळला नाही व ती थांबली.


🔰 तयानंतर सरोजिनी नायडू देशसेवा, समाजसेवा इत्यादी गोष्टींकडे वळल्या. त्यांनी होमरूल लीगसाठी ॲनी बेझंट आणि सी. पी. रामस्वामी अय्यर यांच्या बरोबर हिंदुस्थानभर दौरा काढला. आपल्या भाषणांतून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्रीस्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला. 


🔰 सरोजिनी नायडूंनी गोखल्यांना गुरुस्थानी मानले आणि महात्मा गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्वीकारले. हैदराबाद येथील प्लेगच्या साथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. त्याबद्दल त्यांना कैसर– इ– हिंद हे सुवर्णपदक देण्यात आले; पण ते त्यांनी जालियनवाला बाग येथील हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केले. रौलट कायदा, माँटेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार वगैरे विविध चळवळींत त्यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांनुसार प्रसार आणि प्रचार केला, मोहिमा काढल्या आणि गांधींच्या असहकार चळवळीत हिरिरीने भाग घेतला. सरोजिनींनी हिंदु – मुसलमान ऐक्य, स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले.


🔰 टिळकांच्या मृत्यूनंतर सरोजिनी नायडू पूर्णतः गांधीवादी झाल्या आणि पेहराव व राहणीमान यांत त्यांनी आमूलाग्र बदल केले. त्यांनी आपले वास्तव्य हैदराबादमधून मुंबईत हलविले. त्या मुंबई महानगरपालिकेत सभासद म्हणून निवडून आल्या आणि पुढे प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या (१९२१). 


🔰 पढे कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या (१९२५) व काँग्रेस कार्यकारिणीच्या सभासद झाल्या. काँग्रेसच्या सर्व धोरणांत त्या हिरिरीने भाग घेत. कलकत्ता येथे भरलेल्या १९०७ च्या बंगालच्या फाळणी विरोधी सभेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. १९०८ मध्ये विधवाविवाह परिषदेत त्यांनी स्त्रियांच्या चळवळीचा पाया घातला आणि येथूनच त्यांच्या स्त्रीविषयक चळवळीस खरा प्रारंभ झाला.

No comments:

Post a Comment