Saturday, 7 November 2020

रामकृष्ण परमहंस

 

(१८ फेब्रुवारी १८३६–१५ ऑगस्ट १८८६). एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगविख्यात सत्पुरुष. मूळ नाव गदाधर, वडील क्षुदिराम चतर्जी, आई चंद्रामणीदेवी. गदाधरांचा जन्म कलकत्त्यापासून सु. १०० किमी. दूर असलेल्या कामारपुकुर या खेड्यात व शालेय शिक्षण गावातील धर्मदास लाहा यांच्या शाळेत केवळ एकदोन इयत्ता इतकेच झाले. अगदी लहानपणापासून ईश्वरभक्ती व साधुबैरागी यांकडे त्यांची ओढ होती.काळ्याभोर ढगांच्या पृष्ठभूमीवरून आकाशातून उडत चाललेली पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची रांग पाहून गदाधरांचे भान नष्ट झाले. भक्तिपर गाणी ऐकताना, शिवाची भूमिका नाटकात करीत असतानाही तसाच भावावेश होई. ईश्वराशी मन असे तन्मय होण्याची जन्मसिद्ध प्रवृत्ती त्यांच्या ठायी होती व ती सतत टिकून राहिली. १८४३ मध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

गदाधरांची नवव्या वर्षी मुंज झाली. आधी शब्द दिला होता म्हणून मुंजीच्या वेळी पहिली भिक्षा त्यांनी धानी लोहारणीकडून घेतली. हे परंपरेहून वेगळे पाऊल होते.उदरनिर्वाहासाठी पाठशाळा चालवणारा थोरला भाऊ राजकुमार याने १८५२ मध्ये गदाधरांना कलकत्त्यास आणले. शाळेत शिकण्याचा विषय काढला, तर गदाधरांनी म्हटले, ‘मला भातभाकरीची विद्या नको, ईश्वरदर्शन होईल अशी विद्या हवी’. कलकत्त्यापासून सु. ६ किमी. वरील दक्षिणेश्वर या खेड्यात गंगेच्या तीरावर १८५५ मध्ये राणी रासमणीने उभारलेल्या कालीमातेच्या मंदिरात रामकुमार पुजारी झाला. शुद्राची सेवा ब्राह्मणाने करू नये, या कारणासाठी प्रथम नकार दिलेल्या गदाधरांनी राणी रासमणीचे जावई व मंदिराचे व्यवस्थापक मथुरानाश विश्वास यांच्या आग्रहावरून वर्षभराने ते पुजारीपण स्वीकारले. १८५६ मध्ये रामकुमारचा मृत्यु झाला.

यानंतर गदाधरांची ईश्वरभक्ती उत्कट होत चालली. मंदिराजवळच्या पंचवटीतील वडाच्या झाडाखाली ते रात्री जात. धोतर सोडून ठेवीत, ब्राह्मणत्त्वाचे चिन्ह असे यज्ञोपवीत काढून ठेवीत आणि ध्यानधारणा करीत. उत्कटता वाढत चालली. रात्र व दिवस यांचे भान नष्ट होत गेले. ‘आई, दर्शन दे’ असा आक्रोश सुरू झाला. अशा वेळी तहानभुकेची वा अंगावरच्या वस्त्राचीही शुद्ध त्यांना राहत नसे.भाचा हृदय हा दोन घास गदाधरांना भरवी. अखेर एके दिवशी आवेगाच्या भरात गाभाऱ्यातील कालीमातेचे खड्‌ग घेतले व ते मानेवर चालवणार, एवढ्यात जगन्मातेचे दर्शन त्यांना झाले. या वेळी त्यांचे वय पंचवीस होते. यानंतरचे त्यांचे सारे दैनंदिन जीवन ईश्वरानुभवाच्या प्रकाशात उजळून निघाले. गदाधरांस रामकृष्ण हे नाव कोणी व केव्हा दिले हे ठरवता येत नाही. रामकृष्ण विवाहित होते. १८५९ मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी जयरामवाटी येथील रामचंद्र मुखोपाध्याय यांची सहा वर्षांची कन्या सारदामणी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. पण लौकिक अर्थाने त्यांनी वैवाहिक जीवन स्वीकारले नाही. वयाच्या अठराव्या वर्षी दक्षिणेश्वरला आलेल्या सारदादेवींची त्यांनी जगन्माता या नात्याने केलेली षोडशी पूजा, हा रामकृष्णांच्या आध्यात्मिक साधनेतील अखेरचा टप्पा. सारदादेवींना रामकृष्णांनी आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णपणे सहभागी करून घेतले आणि त्याही सर्वार्थांनी त्यांच्या सहधर्मिणी झाल्या. रामकृष्णांच्या खालोखाल त्यांच्या अनुयायीवर्गात सारदामाता यांचे स्थान मान्यता पावले आहे.

कालीमातेची रीतसर पूजा करू लागण्याच्या आधीचा एक धार्मिक विधी म्हणून रामकृष्णांनी कलकत्त्यातील केनाराम भट्टाचार्य यांच्याकडून दीक्षा घेतली होती. ते साधनाकालापूर्वीचे त्यांचे दीक्षागुरू. त्यानंतरचे त्यांचे गुरू दोन. १८६१ मध्ये दक्षिणेश्वरला आलेल्या भैरवी ब्राह्मणी या चाळिशीतील संन्यासिनीने दोन अडीच वर्षांच्या अवधीत रामकृष्णांकडून तंत्रमार्गानुसार सर्व प्रकारच्या साधना करून घेतल्या. रामकृष्ण हे ईश्वराचा अवतार आहेत, असे शास्त्रीपंडितांच्या सभेत भैरवी ब्राह्मणीने प्रथम म्हटले. सुमारे सहा वर्षे रामकृष्णांच्या सहवासात राहून ती काशीला गेली. १८६४ मध्ये तोतापुरी हा संन्यासी दक्षिणेश्वरला आला. त्याने रामकृष्णांकडून वेदान्ताची साधना करून घेतली. त्या आधी त्यांना संन्यास दीक्षा दिली. तीन दिवसांनी समाधी लागली. ती तीन दिवस राहिली. हा निराकाराचा साक्षात्कार. दहा महिने राहून तोतापुरी गेल्यावर रामकृष्ण अद्वैतानुभवाच्या अवस्थेत सतत सहा महिने होते. त्यानंतर त्यांना आदेश मिळाला. ‘भावमुखी राहा’. १८६६ मध्ये गोविंद राय यांच्यामुळे इस्लाम धर्मानुसार त्यांची साधना झाली, तर शंभुचरण मल्लिक यांच्यामुळे बायबलचा परिचय झाला. येशू ख्रिस्तीने दर्शन दिले आणि आपल्या शरीरात प्रवेश केला, असे रामकृष्णांनी म्हटले आहे. या सर्व अनुभवांतून, सारे धर्म हे एका परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग आहेत, हे रामकृष्णांचे मत बनले. १८६८ मध्ये त्यांनी मधुरबाबूंबरोबर काशीवृंदावनची यात्रा केली.

कलकत्त्यातील सुशिक्षितांना रामकृष्णांची माहिती ब्राह्मो समाजाचे नेते  केशवचंद्र सेन यांनी रामकृष्णांवर लिहिलेल्या लेखामुळे प्रथम झाली. दक्षिणेश्वरला दर्शनासाठी लोक येऊ लागले. रामकृष्णांचे भक्तगणांशी तासनतास चालणारे संवाद  महेंद्रनाथ गुप्त यांनी ‘एम्.’ या टोपणनावाने श्रीरामकृष्ण कथामृत – ५ खंड, १८९७ – १९३२ (म. भा. श्री रामकृष्ण वचनामृत – १९५१) या ग्रंथात संकलित केले. अखेरच्या चार वर्षातील हे संवाद आहेत. त्यांवरून त्यांची शिकवणूक कळते. या ग्रंथाचे इंग्रजी रूपांतर स्वामी निखिलानंदांनी द गॉस्पेल ऑफ श्रीरामकृष्ण (१९४४) या नावाने केले. या ग्रंथाची तुलना बायबलशी केली गेली. रामकृष्णांचा उपदेश अधिकारानुसार असे.कामिनीकांचनाच्या मोहात मर्यादेबाहेर गुंतू नये, आपली किमान कौटुंबिक कर्तव्ये पार पाडावीत, ईश्वरदर्शन हे जीवनाचे ध्येय मानावे व त्यासाठी पतिपत्नींनी मिळून प्रयत्न करावा, असा उपदेश ते प्रापंचिकांना करीत. कामिनीकांचनाचा सर्वथा त्याग, संन्यासव्रताचा स्वीकार व आध्यात्मिक जीवनाचा आदर्श हा उपदेश त्यांनी अगदी निवडक करूण शिष्यांना केला. कलियुगात सत्यपालन हीच तपश्चर्या, माया टाळावी पण दया टाकू नये, शिवभावाने जीवांची सेवा करावी, निर्विकल्प समाधीपेक्षा सारे विश्व हे परमेश्वराचे रूप हा अनुभाव श्रेष्ठ होय, ज्ञान वा भक्ती किंवा साकार वा निराकार यांतील आपल्याला रुचेल व पचेल ते घ्यावे, अशी त्यांची काही प्रमुख विचारसूत्रे आहेत.

रामकृष्णांनी एकही ग्रंथ वाचला नव्हात, काही पुराणे-प्रवचने ऐकली होती. आध्यात्मिक साधनेतून घेतलेला साक्षात अनुभव हा त्यांच्या विचारांचा एकमेव आधार होता. सारे बोलणे प्रचीतीचे होते. त्यामुळे स्वामी दयानंद, बंकिमचंद्र चतर्जी, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर किंवा केशवचंद्र सेन अशा नामवंत व्यक्तीही त्यांच्या आध्यात्मिक धारणेच्या दर्शनाने प्रभावित झाल्या. बलराम बसू, डॉ. रामचंद्र दत्त, साधू नागमहाशय, महेंद्रनाथ गुप्त, गिरीशचंद्र घोष, सुरेंद्रनाथ मित्र हे त्यांचे प्रमुख गृहस्थाश्रमी शिष्य होते. काही स्त्रियाही त्यांच्या शिष्यवर्गात होत्या. दहा बारा तरुण अंतरंगशिष्य हे सारे संन्यासी होते. त्यांतील अग्रणी म्हणजे स्वामी  विवेकानंद. त्यांनी स्थापन केलेल्या  रामकृष्ण मिशन या संस्थेच्या देशविदेशांतील शंभरावरील शाखांच्या द्वारा रामकृष्णांचा आध्यात्मिक संदेश आज जगात सर्वदूर पसरलेला आहे. रामकृष्ण अखेरचे सात-आठ महिने घशाच्या कर्करोगाने आजारी होते. कलकत्त्यामधील काशीपूरच्या उद्यानगृहात त्यांनी महासमाधी घेतली.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...