Saturday 14 November 2020

माण नदी :



 महाराष्ट्र राज्यातील भीमा नदीची उजव्या तीरावरील प्रमुख उपनदी. आंधळी धरणाच्या योजनेमुळे हिला महत्त्व प्राप्त झाले असून नदीची लांबी सु. १६० किमी., पैकी सोलापूर जिल्ह्यातील लांबी सु. ८० किमी. आहे. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यात, फलटणजवळच्या डोंगरात हिचा उगम होतो. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातून आग्नेय दिशेस वाहत जाऊन पुढे ती सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यात प्रवेश करते. सांगली जिल्हाच्या उत्तर भागातून आग्नेय दिशेने थोडे अंतर वहात गेल्यावर ती सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यात प्रवेशते. सांगोला तालुक्यातून प्रथम पूर्वेस व नंतर ईशान्येस वाहत जाते. पुढे काही अंतर पंढरपूर-मंगळवेढे तालुक्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन पंढरपूरच्या आग्नेयीस १७ किमी. वर असलेल्या सरकोलीजवळ भीमेला मिळते. नदीचे काठ सपाट व कृषियोग्य असून नदीपात्रात रेती आढळते. बेलवण, खुर्डू, सानगंगा व वांकडी हे प्रवाह माण नदीला मिळत असून ते कोरड्या ऋतूत पूर्ण आटतात. माण तालुक्यातील बोडके गावाजवळ या नदीवर आंधळी धरण बांधावयाची योजना आज अनेक वर्षे रेंगाळत आहे. दहिवडी, म्हसवड, दिघंची, सांगोला ही माण नदीकाठीवरील प्रमुख गावे आहेत.

No comments:

Post a Comment