🔰अलीकडे आपण नो युवर कस्टमर (केवायसी) हा शब्द सातत्याने ऐकतो. याचा अर्थ ‘ग्राहकाला जाणून घ्या’ असा होतो. आता त्याचा अर्थ ‘नो युवर कॉन्स्टिटय़ुशन’ म्हणजे आपले संविधान समजून घ्या असा घेता येईल. देशातील नागरिकांना संविधानाची माहिती असली पाहिजे, त्याची जाण व्यापक झाली पाहिजे. त्यासाठी लोकांना संविधान समजावून सांगणेही गरजेचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८० व्या परिषदेत व्यक्त केले.
🔰नव्या पिढीला संविधानामध्ये नेमके काय आहे हे समजले पाहिजे, त्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये सातत्याने जागरूकता मोहीम राबवली पाहिजे. संविधान लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, ते तरुण पिढीत अधिक लोकप्रिय केले पाहिजे, त्यासाठी अभिनव मोहीम राबवण्याचा सल्ला मोदींनी पीठासीन अधिकाऱ्यांना दिला.
🔰आपल्या संविधानामध्ये नागरिकांच्या कर्तव्याला महत्त्व दिले गेले आहे. महात्मा गांधीही त्याबद्दल आग्रही असत. नागरिकांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्य हे एकमेकांशी जोडलेले असतात. नागरिक आपले कर्तव्य पार पाडतात तेव्हा त्यांच्या हक्कांचेही रक्षण होते यावर गांधीजींचा विश्वास होता. नागरिकांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढेल अशी अपेक्षा संविधानातही व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी सर्वानी आपल्या संविधानाने दिलेल्या कर्तव्याचे पालन करणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले. गेल्या पाच वर्षांपासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभरा साजरा केला जातो.
No comments:
Post a Comment