Saturday, 7 November 2020

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्


सर्वपल्ली राधाकृष्णन् : (५ सप्टेंबर १८८८ – १६ एप्रिल १९७५). भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२ – ६७) आणि पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक. त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या द्विखंडात्मक ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान इंग्रजीत सुंदर शैलीत मांडले आहे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी या गावी झाला व उच्च शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले. नंतर मद्रासचे प्रेसिडेन्सी कॉलेज (१९०९ – १६). म्हैसूर विद्यापीठ (१९१६ –२१), ‘राजे पंचम जॉर्ज अध्यासन’, कलकत्ता विद्यापीठ (१९२९ ३१) या ठिकाणी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.त्याच वेळी ते ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचे प्राध्यापक (१९२९) व नंतर वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू (१९३१ –३५), लंडन येथे ‘पौरस्त्य धर्म आणि नीतिशास्त्र’ यांचे प्राध्यापक (स्फाल्डिंग प्रोफेसर). बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू (१९३९ ४८) होते. १९३१ ते ३९ पर्यंत ते राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते. १९४९ ते १९५२ पर्यंत भारताचे रशियातील राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या वेळी आपली नेहमीची प्रथा मोडून स्टालिनने त्यांना मुद्दाम बोलावून त्यांची भेट घेतली.

अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे (१९२७) आणि अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे (१९३०) अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ऑक्सफर्ड येथील ऑप्टन व्याख्यानमाला तसेच हिबर्ट व्याख्यानमाला गुंफण्याचा बहुमानही त्यांना लाभला. १९५४ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन गौरविले. १९५२ ते १९६७ पर्यंत प्रथम भारताचे उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती होऊन ते निवृत्त झाले. निवृत्तिकालात ते मद्रास येथे जाऊन राहिले.तेथेच थोड्या विमनस्क अवस्थेत त्यांचे निधन झाले.

त्यांनी तत्त्वचिंतनात स्वतःची अशी कोणतीच भर घातली नाही अशी टीका पुष्कळदा केली जाते. ती खरीही आहे आणि खोटीही आहे. खरी अशाकरता, की आपल्या लिखाणात शंकराचार्याच्या केवलाद्वैत मताचीच थोडी फेरमांडणी करून त्यांनी जी मांडणी केली ती आधुनिक काळाला साजेल अशी केली. नित्य परिवर्तनशील परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर शाश्वत मूल्यांचे पुनर्संस्करण केले. शांकर तत्त्वज्ञानाच्या आधारावर प्रवृत्तीपर जीवन जगता येईल असे त्यांनी दाखवून दिले. सगुण ब्रह्म अथवा ईश्वर हा निर्गुण परब्रह्माचा खालच्या पातळीवरील आविष्कार आहे असे न म्हणता, भक्ताशी असलेल्या त्याच्या संबंधाच्या अपेक्षेने ग्रहण केल्यावर जो ईश्वर म्हणून भासतो त्याचेच संबंध – निरपेक्ष रीतीने ग्रहण केल्यावर तो परब्रह्म म्हणून उरतो असे त्यांचे प्रतिपादन आहे. राधाकृष्णन् यांनी मायावाद स्वीकारला; जग ईश्वरावर अवलंबून आहे, स्वप्रतिष्ठित नाही आणि अशाश्वत आहे असा त्यांनी त्याचा अर्थ केला. हिंदू धर्मास काही अर्वाचीन रूप मिळाले आहे असे मानल्यास त्याचे श्रेय स्वामी विवेकानंद, डॉ. भगवानदास, म. गांधी इत्यादींच्या प्रमाणे राधाकृष्णन् यांनाही आहे.

सर्व धर्मांतील मूलभूत सत्य एकच आहे आणि ही वृत्ती हिंदू धर्माने विशेषकरून जोपासली आहे. असे राधाकृष्णन् यांनी सांगितले. कोणत्याही धर्माच्या शिकवणुकी या तत्त्वज्ञानाचा अभ्यासविषय आहेत; देवशास्त्राच्या (थिऑलॉजीच्या) नाहीत असे त्यांचे म्हणणे होते. असे ते म्हणू शकले याचे कारण ज्ञानमीमांसेत प्रत्यक्ष व अनुमान यांच्याप्रमाणेच अंतःप्रज्ञ (इंट्यूइशन) हेही सत्यज्ञान मिळविण्याचे एक साधन आहे असे त्यांनी मानलेले आहे. धर्मग्रंथांचे प्रामाण्य त्यांत ग्रथित असलेल्या ऋषींच्या गूढानुभूतींवर आहे, त्या ग्रंथाच्या ईश्वरकर्तृत्वावर नाही, अशी त्यांची भूमिका आहे. ही दृष्टी पतकरली म्हणजे धर्माची चिकित्सा करता येते आणि प्रस्थापित धर्ममतांचा समन्वयही करता येतो.

बुद्धाने अनात्मवाद सांगितला; पण राधाकृष्णन् यांच्या मताप्रमाणे तो अनात्मवाद आणि वेदान्ताचा आत्मवाद अथवा ब्रह्मवाद यांच्यात विरोध नाही.बुद्धाने नाकारला तो ‘मी’ आणि ‘माझे’ अशी वृत्ती निर्माण करणारा जीवात्मा होय. जीवात्मा हा अहंकाराचा परिणाम होय. अहंकाराचा लोप झाला म्हणजे निर्वाणरूपी परम शांतीचा अनुभव येतो. वेदान्तही अहंकाराचे विसर्जन करावयास सांगतो. अहंकार नष्ट झाल्यावर जो शुद्ध चैतन्याचा अनुभव येतो, त्यास वेदान्तात आत्म्याचा अनुभव म्हणतात.

खरे म्हटले तर धर्म एकच असतो. संप्रदाय अनेक असतात. याचा अर्थ असा नव्हे, की कोणताही संप्रदाय व त्याच्या विशिष्ट परंपरा नाहीशा केल्या पाहिजेत. इतकेच केले पाहिजे, की संप्रदायांनी आपापली आग्रही वृत्ती सोडली पाहिजे.

द रेन ऑफ रिलिजन इन कंटेंपररी फिलॉसॉफी या १९२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात त्यांच्या मनाचा कल रामानुजांच्या विशिष्टाद्वैत मताकडे– म्हणजे सगुणोपासनेकडे- झुकलेला दिसतो. पुढे १९२३ (पहिला भाग) व १९२७ (दुसरा भाग) या साली प्रसिद्ध झालेल्या इंडियन फिलॉसॉफी या ग्रंथात शंकराचार्याचे केवलाद्वैत मत त्यांनी शिरोधार्य मानलेले दिसते. पण १९२९ साली प्रसिद्ध झालेल्या अॅन आयडियालिस्ट व्ह्यू ऑफ लाइफ या ग्रंथात त्यांचे जीवनविषयक समग्र तत्त्वज्ञान साररूपाने आले आहे असे म्हणता येईल. यात असे म्हटले आहे, की देहपातापूर्वीही व्यक्तीला ईश्वराशी सायुज्यता मिळू शकेल; पण अंतिम मोक्ष अथवा ब्रह्म-निर्वाण हे सर्व जीव मुक्त झाल्याशिवाय एका व्यक्तिला प्राप्त होणार नाही. म्हणून सायुज्य मुक्ती प्राप्त झालेले महामानव हे इतर जीवांच्या उद्धारासाठी प्रयत्नशील राहतात. हे मत महायान पंथातील बौद्ध मतासारखे बोधिसत्व संकल्पनेसारखे आहे. त्यांनी उपनिषदे वप्रिन्सिपल उपनिषद्स (१९५३), ब्रह्मसूत्रे (द ब्रह्मसूत्राज – १९६०) व भगवद्‌गीता (द भगवद्‌गीता – १९४८) या वेदान्ताच्या ⇨ प्रस्थानत्रयीवर भाष्यस्वरूप ग्रंथ लिहिल्यामुळे प्राचीन अर्थाने त्यांना ‘आचार्य’ ही उपाधी लावता येईल. यांशिवाय द फिलॉसॉफी ऑफ रविंद्रनाथ टागोर (१९१८), द हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ (१९२६), ईस्ट अँड वेस्ट इन रिलिजन (१९३३), ईस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट (१९३९), द धम्मपद (१९५०), द रिकव्हरी ऑफ फेथ (१९५५) इ. त्यांची ग्रंथरचना आहे.

धर्म व तत्त्वज्ञान यांप्रमाणे शिक्षण हाही त्यांच्या परिशीलनाचा विषय होता. शिक्षणाने व्यक्तीला आत्मभान झाले पाहिजे आणि आपल्या विचाराची दिशा ठरविता आली पाहिजे, असे त्यांचे मत होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे (१९४८) ते अध्यक्ष होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी व ह्या आदर्श शिक्षकाच्या सन्मानार्थ भारतात सर्वत्र त्यांचा जन्मदिन (५ सप्टेंबर) हा ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा केला जाते.

आज ज्याला विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान म्हणतात त्याच्याशी आपल्या विचारांचा सांधा जमवून घेण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. त्याचप्रमाणे आजच्या अस्तित्ववादाविषयीही त्यांनी फारसा आदर दाखविला नाही. त्यांच्या मते, उपनिषदांतील तत्त्वज्ञान हेच खरे अस्तित्ववादी आहे. कारण, त्याची सुरूवात आत्म्याच्या अस्तित्वापासून होते. जडवादात अंतःप्रज्ञेला अथवा गूढानुभूतीला स्थान नसल्यामुळे आध्यात्मिक मर्मदृष्टीला तो पारखा होतो.

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...