Sunday, 11 December 2022

लुशाई टेकड्या.


🅾️लशाई टेकड्या ईशान्य भारताच्या पर्वतीय प्रदेशातील डोंगर टेकड्या. यांचा विस्तार प्रामुख्याने मिझोराम राज्यात असून त्यांना ‘मिझो टेकड्या’ असेही म्हणतात. आराकान योमा या पर्वतश्रेणीचा हा उत्तरेकडील भाग होय. उत्तर-दक्षिण दिशेत परस्परांना समांतर पसरलेल्या या टेकड्या मुख्यत: तृतीयक कालखंडातील वालुकाश्म व शेल खडकांपासून तयार झाल्या आहेत. या घडीच्या टेकड्यांच्या दक्षिणेस पातकई टेकड्या आहेत. लुशाईच्या पश्र्चिमेस त्रिपुरा सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत लहानलहान आठ रांगा व दऱ्या आहेत.


🅾️जलप्रवाहांच्या खनन कार्यामुळे या टेकड्यांमध्ये तीव्र उताराच्या खोल दऱ्या, घळ्या वव काही ठिकाणी लहान मैदानी द्रोणी प्रदेश तयार झालेले आहेत. या टेकड्यांचे पश्र्चिमेकडील उतार हे पूर्वेकडील उतारांपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आहेत. पश्चिमेकडे जलप्रवाहांची खोरी रुंद व पूर्वेस अरुंद आढळतात. या प्रदेशात १,३७१ मी. उंचीवर टेकड्यांनी वेढलेली सुपीक गाळाची मैदाने आहेत. मैदानामध्ये चांफाई हे मोठे मैदान (लांबी सु. ११ किमी. व रुंदी ५ किमी.) आहे. गाळाने भरून गेलेल्या पूर्वीच्या सरोवराच्या जागी हे मैदाने तयार झाली असावीत.


🅾️या टेकड्यांची सस.पासून सरासरी उंची पश्र्चिमेस ९१४ मी. पासून पूर्वेस १,२१८ मी. पर्यंत आढळते; परंतु काही ठिकाणी मात्र ती १,६७५ मी. पर्यंत वाढत जाते. दक्षिण भागात‘ब्लू मौंटन’ वा ‘फ्वंगपूरी’ (२,१६५ मी.) येथे सर्वाधिक उंची आढळते.


🅾️या प्रदेशातील जलप्रणाली गुंतागुंतीची आहे. उत्तरेस सुरमा नदीची उपनदी बराक, दक्षिणेस कलदन व पश्र्चिमेस कर्णफुली या नद्यांनी हा प्रदेश व्यापलेला आहे. उत्तर भागात ढालेश्र्वरी, सोनई व तुइव्हावल या बराक नदीच्या, तर दक्षिण भागात पूर्वेस मट, तुईचुंग, त्याओ, तुईपाई या कलदन नदीच्या आणि पश्र्चिमेकडील जलप्रणालीमध्ये चितगाँगजवळ तुईचंग, कओ, देह फायरंग व तुईलिपनुई या कर्णफुली नदीच्या मुखालगत येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत.


🅾️या टेकड्यांच्या प्रदेशातील हवामान मानवी जीवनास प्रतिकूल आहे. खोल दऱ्यांमधून रोगट हवामानामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. मार्च-एप्रिलमध्ये वायव्येकडून येणाऱ्याभयानक स्वरूपाच्या वादळी वाऱ्यांचा प्रादुर्भाव होतो. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कोरडा दुष्काळ पडत नाही. उतारावर घनदाट सदारहित जंगले, बांबूंची वने व इतर उपयुक्त वृक्ष आहेत. खोलगट भागात पाम व माथ्यावरील भागात ओक, फर, चेस्टनट इ. वृक्ष आढळतात. या प्रदेशात हत्ती, गेंडा, हरिण, वाघ, अस्वले इ. प्राणीही आढळतात. या प्रदेशात बहुतांश आदिवासी लोक रहात असून ते ‘झूम शेती’ करतात. शेतीतून भात, तीळ, ऊस, तंबाखू व संत्री इ. उत्पादने घेतली जातात.

No comments:

Post a Comment