Saturday, 18 March 2023

सह्याद्रि



पश्र्चिम घाट, सह्य पर्वत. 

भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे.

उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली  आहे. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण लांबी सु. १,६०० किमी. असून सस. पासून सरासरी उंची सु. १,२०० मी. आहे. पर्वताचा पश्र्चिम उतार तीव्र तर पूर्वेकडे पठारी भागाकडील उतार तुलनेने मंद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांतील सु. ६०,००० चौ. किमी. क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेण्यांनी व्यापले आहे. पर्वताचा सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यात आहे.


💠💠भवैज्ञानिक इतिहास.💠💠


🅾️सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. 


🅾️स. १५० द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्यावेळी दख्खनच्या पठाराचेही विभाजन झाले असावे. त्यामुळे आजच्या पश्र्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंगरेषा निर्माण झाली असावी. या विभंगरेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे पठाराच्या पश्र्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी. भारतीय व्दिपकल्प पठाराची ही पश्र्चिम कडा म्हणजेच पश्र्चिम घाट होय.


🅾️ही क्रिया अचानक घडली नसून मंद गतीने घडली असावी. मिआमी विदयापीठातील भूभौतिकीविज्ञ बॅरन व हॅरिसन यांच्या सिद्धांतानुसार सु. १०० ते ८० द.ल. वर्षांपूर्वीच्या दरम्यान मादागास्करपासून विभंगून भारताचा पश्र्चिम किनारा अस्तित्वात आला असावा. 


🅾️या पश्र्चिम किनाऱ्याचे विभंजन होऊन पश्चिम घाट ह्या १,००० मी. उंचीच्या उभ्या कडयाची आकस्मिक निर्मिती झाली असावी. सुमारे ६५ द.ल. वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात भेगी प्रकारचे ज्वालामुखी उद्रेक होऊन दक्षिण ट्रॅप (डेक्कन ट्रॅप) ची निर्मिती झाली असावी. लाव्हारसापासून निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकाचे विस्तृत व जाड थर असलेल्या या प्रदेशाने मध्य भारताचा फार मोठा भाग व्यापला आहे.


अशा ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेल्या संचयनातून पश्र्चिम घाट प्रदेशाची ही भूरचना बनलेली आहे.


🅾️ पश्र्चिम घाटातील अशा बेसाल्ट खडकाच्या खालील खडकांचे थर सु. २०० द.ल. वर्षांपूर्वीचे जुने असावेत. पश्र्चिम घाटाचा उत्तरेकडील गोव्यापर्यंतचा भाग प्रामुख्याने बेसाल्ट खडकांपासून तर त्याच्या दक्षिणेकडील विभाग गॅनाइट व पट्टिताश्म खडकांपासून बनलेला आहे.


🅾️ भकवचात बेसाल्ट खडकाचे थर साधारण ३ किमी. खोलीपर्यंत आढळतात. चर्नोकाइट, खोंडेलाइट, लेप्टिनाइट, रूपांतरित पट्टिताश्म, स्फटिकमय चुनखडक, लोहखनिज, डोलेराइट व अ‍ॅनॉर्थाइट हे खडकही या भागात आढळतात. दक्षिणेकडील टेकडयांमध्ये अवशिष्ट जांभा खडक व बॉक्साइट खनिज आढळते.


🧩विशेष....


🅾️सह्याद्रीचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग पडतात. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस निलगिरी पर्वत पुंजापर्यंतची श्रेणी उत्तर सह्याद्री व तेथून प्रामुख्याने पालघाट खिंडीपासूनची (खंड) दक्षिणेकडील पर्वतश्रेणी दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखली जाते. 


🅾️पालघाट खिंडीमुळे सह्यादीची सलगता खंडित झाली आहे. उत्तर सह्याद्रीचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो. महाराष्ट्रातील या पर्वतश्रेणीमुळे कोकण व देश (पश्र्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग अलग झाले आहेत.


🅾️पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असून तेथे लाव्हा खडकाच्या थरांचे काळे व उघडे कडे सर्वत्र दिसतात. पश्चिम उतारावर नदयांनी खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. याच उताराच्या पायथ्यालगत कोकणची किनारपट्टी आहे.


🅾️ पर्वेकडील उतार मात्र बराच मंद असून तो पूर्वेकडील पठारात विलीन झालेला दिसतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्व किंवा आग्नेय दिशेकडे अनेक फाटे गेलेले आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट व महादेव डोंगररांगा हे प्रमुख फाटे आहेत. पठारावरील नदयांचे हे दुय्यम जलविभाजक आहेत.


 🅾️महाराष्ट्रातील सह्याद्रीची उंची सामान्यपणे ९१५ ते १,२२० मी. असून उत्तरेकडे ती अधिक तर दक्षिणेकडे कमी आढळते.

सह्याद्रीत काही ठिकाणी सपाट माथ्याचे, पठारासारखे भाग आढळतात, त्यांना घाटमाथा असे म्हणतात. येथपासून कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट सुरू होत असल्याने त्यांना ‘ घाटमाथा ’ असे संबोधले जात असावे. 


🅾️थळ घाट, अणेमाळशेज, बोर घाट, वरंधा, आंबेनळी (पार), कुंभार्ली, आंबा, फोंडा, बावडा, आंबोली इ. घाटांना देश व कोकण यांदरम्यानच्या वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने पूर्वीपासून विशेष महत्त्व आहे. सह्याद्री पर्वतश्रेणी बरीचशी सलग असली, तरी तिच्यात अधूनमधून अशा खिंडी व घाट आहेत.


🦋🦋🦋🦋🦋

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...