(माही नदी). मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात या तीन राज्यांतून वाहणारी नदी. मही नदीची लांबी ५३३ किमी. असून मध्य प्रदेश राज्याच्या धार जिल्ह्यात विंध्य पर्वतात ६१७ मी. उंचीवर ती उगम पावते. या राज्यातून वायव्य दिशेने ती १६० किमी. अंतर वाहत जाते. पुढे राजस्थान राज्यातील डूंगरपूर या जिल्ह्याच्या उत्तरेकडील मेवाड टेकड्यांमुळे ती नैर्ऋत्यवाहिनी होऊन डूंगरपूर व बांसवाडा या जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहत जाऊन गुजरात राज्याच्या गोध्रा जिल्ह्यात प्रवेशते व पुढे खंबायतच्या आखाताला मिळते. या नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र ३४,८४२ चौ. किमी. आहे. डाव्या तीरावरील अनास व पानम आणि उजव्या तीरावरील सोम या तिच्या प्रमुख उपनद्या होत. उधानाच्या भरतीच्या वेळी मही नदीमुखातून आत सु. ३२ किमी. पर्यंत पाणी येते.
पूर्वीपासून महापूर, खोल दऱ्या व उंच काठ यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मही नदीवरील जलसिंचन प्रकल्पांमुळे तिला महत्त्व प्राप्त झाले असून राजस्थान व गुजरात राज्यांतील शेतीच्या दृष्टीने ती जास्त उपयुक्त ठरली आहे. गुजरात राज्यात या नदीवर ‘मही प्रकल्प’ ही दोन टप्प्यांची योजना असून पहिल्या टप्प्यात वनकबोरी गावजवळ ७९६ मी. लांब व २०·६ मी. उंचीचा चिरेबंदी बंधारा बांधण्याची योजना आहे. याच्या उजव्या कालव्यामुळे (७४ किमी. लांब) सु. १·८६ लक्ष हे. जमिनीस पाणीपुरवठा होईल. दुसऱ्या टप्यात कडाणाजवळ १,४३० मी. लांब व ५८ मी. उंचीचे माती-काँक्रीटचे संयुक्त धरण बांधलेले असून त्यामुळे ८९,००० हे. क्षेत्रास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. यांशिवाय राजस्थान राज्यातील या नदीवरील प्रकल्पांमुळेही त्या राज्याला जलसिंचनाचा लाभ मिळाला आहे.
मही नदीचा उल्लेख महाभारतात व पुराणांतही आढळतो. पुराणांत तिला ‘मनोरमा’ असे म्हटले आहे. गुजरात राज्यात मही नदीच्या काठावर नवनाथ, ८४ सिद्ध व इतर देवता यांची मंदिरे आहेत. मिंग्रड, फाझिलपूर, अंगद, मसपूर ही कोळी लोकांची पवित्र स्थळे मही नदीच्या काठावरच आहेत. ‘महिसागर संगम’ या नावाने ओळखले जाणारे खंबायतच्या आखातातील या नदीचे मुख हे पवित्र तीर्थक्षेत्र मानेल जाते.
No comments:
Post a Comment