Friday, 15 March 2024

वारणा नदी



सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो. प्रथम वारणा नदी वायव्येकडून आग्नेयीकडे व नंतर पूर्वेकडे वाहते.

ती  कृष्णा नदीस सांगली शहराच्या नैर्ऋत्येस सु. दीड किमी. अंतरावर सस. पासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे मिळते. संगमाजवळ वारणा नदीचे पात्र ७० मी. रुंद आहे.

काडवी व मोरणा या वारणेच्या प्रमुख उपनद्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ सु. ७०० मी. उंचीच्या प्रदेशात होतो.

सुमारे ३५.४ किमी. वाहून काडवी नदी सागाव जवळ वारणा नदीस मिळते. काडवी नदी मिळाल्यावर तिचा प्रवाह बराच विस्तारित होतो. काडवी नदी वारणा नदीस जवळजवळ समांतर वाहते. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे काडवी नदीस मिळतात.

सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. ही नदी दक्षिणेस व आग्नेयीस वाहते. या नदीची लांबी सु. २७.३५ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विस्तृत पानमळे आढळतात. शिराळा तालुक्यातील मांगळे गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते. उजव्या बाजूने कानसा नदी उदगिरीपासून २० किमी. वाहत जाऊन पन्हाळा तालुक्यात माळेवाडी-जवळ वारणेस मिळते. शाली व अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या होत.

वारणा खोऱ्याचा विस्तार सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांत झाला असून त्याचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १६०४७' उ. ते १७०१५' उ. आणि ७३०३०' १५" पू. ते ७४०३०' पू. यांदरम्यान आहे. या खोऱ्याची लांबी १४९ किमी., सरासरी रुंदी २१ किमी. व एकूण क्षेत्र २,०९५ चौ. किमी. आहे. वारणा खोऱ्यात शिराळा, वाळवा, मिरज (जि. सांगली), शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ (जि. कोल्हापूर), पाटण (जि.सातारा) या आठ तालुक्यांचा समावेश होतो.

भूवैज्ञानिक दृष्ट्या वारणा खोरे दख्खन ढाली प्रदेशात वायव्य भागात येते. वारणा नदीच्या खोऱ्यात विविध प्रकारची भूरूपे असल्याने येथील स्थलाकृती अत्यंत गुंतागुंतीची आहे. पश्चिमेकडे कोकण व पूर्वेकडे दख्खन पठार यांदरम्यानच्या संक्रमण पट्ट्यात वारणा खोरे असल्याने दोन्ही प्राकृतिक विभागांतील गुणधर्म वारणेच्या खोऱ्यात आढळतात. खोऱ्यातील पश्चिमेकडील प्रदेश पूर्वेकडील प्रदेशापेक्षा जास्त उंचसखल  आहे.

वारणेचे खोरे पश्चिम घाटामुळे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, त्यामुळे पाऊस कमी पडतो. मॉन्सून काळात पाऊस पडतो, परंतु इतर कालावधी कोरडा असल्याने वारणेच्या खोऱ्यातील नद्यांना पावसाळा वगळता इतर काळात पाणी फारच कमी असते.

वारणा नदीचे खोरे सुपीक आहे. भात, ज्वारी, ऊस, भुईमूग ही महत्त्वाची पिके या खोऱ्यात होतात. शाहूवाडी तालुक्यात आंबोळी येथे वारणा नदीवर एक मोठा प्रकल्प आणि सांगली जिल्ह्यात चांदोली व शिराळा तालुक्यात वारणा पाटबंधारे हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोरणा नदीवर शिराळा तालुक्यातील प्रकल्प, तर शाहूवाडी तालुक्यात पोटफुगी नदीवर काडवी प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे.

यांशिवाय वारणेच्या खोऱ्यात अनेक कोल्हापूरी बंधारे व काही लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, तसेच वारणानगर (कोडोली) सारखी गावे उद्योगधंद्यांमुळे विकास पावली आहेत. या खोऱ्यातील खेड्यांना जोडणारे अनेक पक्के रस्ते, जिल्हा प्रमुख रस्ते व ग्रामीण रस्ते आहेत. परंतु या खोऱ्यात लोहमार्ग व हवाई वाहतूक यांची सोय नाही. कोल्हापूर, मिरज, सांगली ही या खोऱ्यातील लोकांना जवळची रेल्वेस्थानके आहेत.

No comments:

Post a Comment