Monday, 26 October 2020

कदा नदी :



निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्यातील नदी. लांबी सु. ११९ किमी. ऊटकमंडच्या आग्नेयीस सु. २४ किमी. वर देवबेट्टा, कौलिनबेट्टा, करायकुडी, पोर्थिमुंड इ. शिखरांच्या १,७०० मी. पेक्षा अधिक उंचीच्या पर्वतप्रदेशात उगम पावणाऱ्या अ‍ॅवलांच व एमेरल्ड या प्रवाहांनी मिळून कुंदा नदी झालेली आहे. तिच्या व दक्षिणेकडील अपर भवानीच्या


कुंदा नदीप्रकल्प


खोऱ्यादरम्यान निलगिरी पठाराच्या नैर्ऋत्येस कुंदा पर्वतरांग आहे. तिच्यात अ‍ॅवलांच, बेअरहिल, माकुर्ती ही २,५०० मी. हून अधिक उंचीची शिखरे असून, त्या भागात नैर्ऋत्य व ईशान्य मान्सूनचा पाऊस दरवर्षी सु. ४०० सेंमी. पडतो. ते पाणी भवानीला आणि कुंदेला मिळते. सिल्लाहल्ला, कनारहल्ला, पेंगुबहल्ला इ. उपनद्यांचे पाणी घेऊन कुंदा अपर भवानीला मिळते. या दोन्ही नद्या मग भवानी या नावाने कावेरीला मिळतात. निलगिरीच्या उभ्या उतारांवरून कुंदा वेगाने खाली येते. मंडनायूजवळ तिला सु. ६६ मी. उंचीचा एक धबधबा आहे. कुंदेच्या परिसरातील वनश्री अत्यंत नयनरम्य आहे.


कुंदेचे पाणी आणि तिचा वेग व शक्ती यांचा उपयोग करून कुंदा योजना किंवा लोअर भवानी योजना १९५६ मध्ये सुरू झाली. या योजनेत लहानमोठी बारा धरणे, यांना जोडणारे सु. ४० किमी. लांबीचे बोगदे, विद्युत्‌गृहे, कालवे इ. असून, चौथ्या पंचवार्षिक योजनेअखेर ११० मेगॅवॉट वीज उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. पूरनियंत्रण, ७९,००० हे. शेतीला पाणीपुरवठा तसेच अ‍ॅल्युमिनियम, कॉस्टिक सोडा, सिमेंट, कागद इ. उद्योगांना आणि शेकडो खेड्यांना घरगुती वापरासाठी व छोट्या उद्योगधंद्यांसाठी वीजपुरवठा, हे या योजनेचे उद्देश असून, कोलंबो योजनेनुसार या प्रकल्पासाठी कॅनडाचे मोठे साहाय्य झालेले आहे.

No comments:

Post a Comment