Friday, 9 October 2020

समार्ट मुंबईचे शिल्पकार!



नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ यांचा, ३१ जुलै हा स्मृतिदिन. संस्कृत विषयातील शिष्यवृत्ती देणारे समाजसेवक म्हणून नाना महाराष्ट्रास माहीत आहेत पण, ते भारतीय रेल्वेचे जनक व आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकारही होते. नानांनी स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह, सती बंदी व सोनापूर स्मशानभूमीस दिलेली जमीन तसेच आर्थिक सहकार्यातूनही समाजकार्य साधले. नानांच्या जीवनाचा बहुतांश हिस्सा या घडामोडींचा एक अविभाज्य घटक होता, हे अनेकांना माहीत नाही! नानांच्या सर्व कार्याचा विस्तृत वृत्तांत येथे मांडणे अशक्य आहे म्हणून, त्यांच्या १५१व्या स्मृतिदिनानिमित्त, त्यांच्या प्रेरणेतून घडलेल्या स्थापत्यविषयक कार्याचा हा आढावा.


मुंबईच्या आरंभापासून ते आजतागायत, 'व्यापार' हाच या शहराचा स्थायी स्वभाव बनून राहिला आहे. म्हणूनच मुंबईला 'सिटी ऑफ गोल्ड' किंवा देशाची 'आर्थिक राजधानी' असे म्हटले जाते. अठरा व एकोणिसाव्या शतकात मुंबईत झालेल्या घडामोडींना खूप महत्त्व आहे. त्या घडामोडीतूनच नानांच्या स्मृतीतील वैभवशाली चेहरा असलेली 'स्मार्ट मुंबई' निर्माण झाली.


१८व्या शतकाच्या पूर्वाधात, मुंबईसाठी सार्वजनिक सभागृहाची गरज ओळखून 'टाऊन हॉल' इमारतीचा प्रस्ताव राज्यपाल जोनाथन डंकनच्या राजवटीत मांडला गेला. या टाऊन हॉलचे बांधकाम सन १८२०मध्ये सुरू झाले व १८३३मध्ये पूर्ण झाले. ही भव्य इमारत इंग्रजांच्या सामर्थ्याचे पहिले प्रतीक म्हणून ओळखली जात असे. या इमारतीचा उपयोग त्या काळात अनेक कार्यासाठी केला गेला. यात कायदे मंडळाची बैठक, ‌मुंबई विद्यापीठाचा पदवीदान समारंभ एवढेच नव्हे तर १८६५ पासून १८७१ पर्यंत म्युनिसिपल कमिशनरला जागेच्या अडचणीमुळे जे. पी. मंडळाच्या सभादेखील याच हॉलमध्ये घ्याव्या लागत. या जागेतच एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई विद्यापीठ, विधिमंडळ व नगरपालिकेचा कारभार केला गेला. या सर्व घडामोडीत नानांचा प्रत्यक्ष सहभाग होता. सन १८३४ पासून एशियाटिक लायब्ररी येथे सुरू करण्यात आली. या लायब्ररीचा प्रथम सभासद होण्याचा मानही नानांनाच दिला गेला.


परदेशातील दळणवळण जहाजे व बोटीतून होत असे. पण देशांतर्गत दळणवळण सुलभ होऊन व्यापाराला गती यावी म्हणून मुंबईत १८४३ साली 'ग्रेट वेस्टर्न रेल्वे कंपनी' स्थापन केली. या समितीतील आद्य प्रवर्तकात नाना शंकरशेठ, जमशेठजी जीजीभाई व सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश अर्स्किन पेरी व इतर प्रवर्तक होते. या कंपनीच्या कार्यालयासाठी जागाही नानांनी त्यांच्या वाड्यात देऊ केली.


मुंबई-ठाणे रेल्वे लाइनचे काम सुरू असतानाच ब्रिटिश सत्तेचा उच्चांक दर्शवणारी दुसरी घटना म्हणजे आजची छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत होय. शे-सव्वाशे वर्षांपूर्वी, ज्या उद्देशाकरिता ही इमारत बनवली गेली तेच कार्य आजही चालते व जगातील सर्वोत्तम रेल्वे इमारत म्हणूनही तिची ओळख आहे. या इमारतीचे आराखडे फ्रेडिक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटिश आर्किटेक्टने, गॉथिक शैलीत बनवले होते. या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीत नानांचे स्मृतिशिल्प बसवण्यात आले आहे.


सन १८६४ मध्ये म्युनिसिपल अॅक्ट पास झाला. सुरुवातीस नगर शासनाचे काम गव्हर्नरच्यामार्फत चालत असे. मुंबई फोर्ट परिसरातील धनिकांनी मुंबई सेंट्रल, परळ व आजच्या सीएसटी स्टेशनच्या पुढे थेट भायखळ्यापर्यंत जागा घेऊन बंगले बांधण्यास सुरुवात केली. या दरम्यान फोर्ट परिसरात अनेक निवासी, नागरी व सरकारी इमारतींचे काम सुरू झाले.

पालिकेतील वाढलेल्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन तीन म्युनिसिपल कमिशनर नेमण्यात आले. त्यानुसार मुंबई नगरपालिकेचे पहिले कार्यालय गिरगावातील एका वाड्यात सुरू केले होते. त्यानंतर ऱ्हिदम हाऊस या इमारतीत हलवले. मंडळाच्या सभेसाठी जागा अपुरी पडत असल्याकारणाने हे कार्यालय १८६६-१८९२ पर्यंत आर्मी-नेव्ही या इमारतीत नेण्यात आले. पालिकेच्या वाढत्या कामाचा व्याप व भविष्यातील हालचालीचा वेध लक्षात घेऊन नाना व जमशेठजी जीजीभाईंनी पालिकेसाठी जागेचा शोध सुरू केला. मुंबईतील नागरिकांना पालिकेत येणे सोयीचे जावे म्हणून सर्वानुमते सीएसटी (VT) समोरील मोकळ्या जागेची निवड केली. ही जागा निवडण्यामागचे कारणही केवढे सयुक्तिक होते हे आजच्या परिस्थितीवरून समजून येते. यानंतर आराखडा बनवण्यासाठी योग्य वास्तुरचनाकाराचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. नियोजित पालिकेच्या आराखड्याचे काम, रेल्वे स्थानक व परिसरातील इमारतींच्या बाह्य सौंदर्याशी साधर्म्य साधू शकेल, अशा वास्तुरचनाकारासच देण्यात यावे असा ठराव पालिकेतील नगरसेवकांनी पास केला. सरतेशेवटी हे काम स्टीव्हन्सलाच करावे लागले! १८८३-९३ या दरम्यान आर्किटेक्ट स्टीव्हन्स सरकारी नोकरीत नसल्याने इंग्लंडमध्येच आराखडे बनवून पाठवले होते. स्टीव्हन्सने पालिकेची इमारत पूर्णतः इटालियन गॉथिक शैलीत न बनवता त्यात भारतीय इस्लामी शैलीतील घुमट व मनोऱ्यांचाही वापर खुबीने केला आहे. या सर्व घडामोडींतून त्या काळातील नगरसेवकांकडे दूरदृष्टी व वास्तुसौंदर्यशास्त्राबद्दल असलेल्या जाणिवेची प्रचिती येते!

मुंबईच्या जडणघडणीत फक्त ब्रिटिश राज्यकर्तेच नव्हे तर, अनेक भारतीय समाजसुधारकांनी योगदान दिले आहे. अनेक धनिक, समाजकल्याणाच्या हेतूने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, स्थापत्य व इतर माध्यमातून, सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत असत. या सामाजिक बांधिलकीतून समाजसेवेच्या विविध प्रथा निर्माण झाल्या.


नानांचा प्रत्यक्ष संबंध आलेल्या स्थापत्यविषयक नामावलीत ग्रँट मेडिकल कॉलेज, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, डॉ. भाई दाजी लाड संग्रहालय, जिजामाता उद्यान, मुंबई विद्यापीठ, एल्फिन्स्टन कॉलेज, नाना चौकातील भवानीशंकर देऊळ, जे. जे. हॉस्पिटलसारख्या सार्वजनिक हिताच्या इमारतींचा समावेश आहे. नानांनी एकनिष्ठेने देशबांधवांसाठी केलेल्या सेवेचे प्रतीक म्हणून ते हयात असतानाच पुतळ्याच्या रूपाने त्यांचे स्मारक उभारण्यात यावे अशा अर्थाचा ठराव प्रो. दादाभाई नवरोजी यांनी मांडला व तो सभेत पासही करून घेतला. दुर्दैवाने पुतळ्याचे काम नानांच्या हयातीत पूर्ण होऊ न शकल्यामुळे हा पूर्णाकृती पुतळा, नानांच्या समकालीनांचे पुतळे व तसबिरी ठेवण्यात आल्या आहेत, त्या टाऊन हॉल इमारतीच्या तळमजल्यावर बसवण्यात आला. म्हणूनच, नाना हेच खरे 'मुंबईचे अनभिषिक्त' सम्राट होते असा उल्लेख आचार्य प्र. के. अत्रेंनी केला होता, हे पटण्यासारखे आहे.


नानांनी समाजहिताच्या भावनेतून मुंबईसाठी केलेले कार्य स्मारकरूपातून सदैव स्मरणात रहावे असे मुंबईकरांना वाटणे साहजिक आहे. स्मारकाच्या जागेसाठी अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेने पुढाकार घेऊन व स्मारक समितीच्या सन्माननीय सदस्यांनी सुरेंद्रभाऊ वि. शंकरशेठ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. अॅड. मनमोहन चोणकर हे समितीचे सरचिटणीस आहेत. अॅड. चोणकरांनी नगरसेवक असताना स्मारकासाठी भूखंडाची मागणी महानगरपालिकेत मांडली. शहर प्रशासनाने, दि. २५ ऑगस्ट २०१४ रोजी सभागृहातील सर्व नगरसेवकांनी नाममात्र प्रतिवर्ष १ रु. भाड्याने, नाना शंकरशेठ स्मारक प्रतिष्ठान समितीस, वडाळा येथे १५०० चौ. मी. चा भूखंड देण्याचा ठराव मंजूर केला. सेना पक्षप्रमुख, महापौर, महानगरपालिका आयुक्त व सुधार ‌समिती सदस्यांनी सहकार्य केले. मुंबई महानगरपालिकेने, या स्मारकास नाममात्र दरात भूखंड देऊन सहकार्य केले. महाराष्ट्र सरकारनेही स्मारकाच्या यापुढील कार्यसिद्धीसाठी मोठ्या रकमेची आर्थिक मदत देऊन आपले कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन मुंबईतील नागरिकांच्या वतीने या लेखाच्या माध्यमातून मी करू इच्छितो. आज घडत असलेल्या मुंबईचा चेहरा व वास्तुसौंदर्यशास्त्रीय ओळख पुढील पिढ्यांकरिता कशी राहील, हे सांगणे कठीण आहे. मुंबईचे आद्य शिल्पकार म्हणून गौरवलेल्या नानांच्या नियोजित इमारतीच्या अंतर्बाह्य आराखड्यातून त्यांच्या स्मृतीतील मुंबईचे प्रतिकात्मक साधर्म्य साधणारी वैशिष्ट्ये जर का अंतर्भूत करू शकलो तर ती खऱ्या अर्थाने वाहिलेली श्रद्धांजली ठरेल!

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...