Thursday, 14 March 2024

सागरी प्रवाह



सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागरजलाची हालचाल. समुद्र व महासागरातील पाणी स्थिर नसून त्यात भरती-ओहोटी,सागरी लाटा व सागरी प्रवाह अशा तीन प्रकारच्या हालचाली होत असतात. त्यांपैकी सागरी प्रवाह ही प्रमुख हालचाल आहे. सागरी प्रवाह मार्गाने पाणी एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वाहत असते. तसेच सागरी प्रवाहांमुळे सागरपृष्ठापासून सागरतळापर्यंत अभिसरण चालू राहते. वाऱ्याची सागरजलाशी होणारी घर्षणक्रिया, वेगवेगळ्या जलस्तरांधील घर्षणक्रिया, पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणारी कोरिऑलिस प्रेरणा (भूवलनोत्पन्न प्रेरणा), सागरजलाचे तापमान, लवणता व घनतेतील तफावत इ. वेगवेगळ्या नैसर्गिक प्रेरणांवर सागरी प्रवाहांची निर्मिती, त्यांची दिशा व आकार अवलंबून असतो. खंडांचे आकार व त्यांची सापेक्ष स्थाने, प्रवाळशैलभित्ती व प्रवाळबेटे, स्थानिक वारे या घटकांचाही सागरी प्रवाहांवर प्रभाव पडत असतो. या वेगवेगळ्या घटकांमधील भिन्नतेमुळे काही प्रवाह मोठे, काही लहान, काही कायमस्वरूपी, काही हंगामी, काही अधिक गती असणारे तर काही मंद गतीने वाहणारे आढळतात.


वाऱ्याचे घर्षणकार्य व दाबातील फरकाद्वारे कार्य करणारी गुरुत्वीय प्रेरणा ही सागरी प्रवाह निर्मितीची मूळ कारणे आहेत. सागरपृष्ठाशी वाऱ्याकडून होणारे घर्षण आणि उभ्या व आडव्या दिशांत असणारा पाण्याच्या घनतेतील किंवा गुरुत्वातील फरक यांमुळे पाणी वाहण्यास सुरुवात होते. सागरी प्रवाहाचे पृष्ठीय प्रवाह, घनतेतील फरकाने निर्माण झालेले प्रवाह, खोल सागरातील प्रवाह असे प्रकार पाडता येतात. समुद्राच्या पृष्ठभागावरून मोठ्या प्रमाणात दीर्घकाळ व एकसारखा वारा वाहत असल्यास त्याच्या घर्षण कार्यामुळे काही ऊर्जा पाण्यात संक्रमित झाल्यामुळे सागरपृष्ठावरील पाणी प्रवाहित होते. यालाच ‘पृष्ठीय प्रवाह’ असे म्हणतात. वाऱ्याचा प्रभाव सामान्यपणे सागरातील १००–२०० मी. खोलीपर्यंतच्या पाण्यावर होतो. असे असले तरी वाऱ्याच्या घर्षण कार्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रवाहांचा विस्तार १,००० मी. किंवा त्यापेक्षाही अधिक खोलीपर्यंत आढळतो. स्थूलमानाने असे प्रवाह प्रचलित वाऱ्याच्या दिशेला अनुसरून वाहत असले, तरी ते अगदी बरोबर वाऱ्याच्या दिशेने वाहत नाहीत. पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात आपल्या मूळ दिशेच्या उजवीकडे, तर दक्षिण गोलार्धात मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. सागरी प्रवाहांचे हे विचलन वाऱ्याच्या दिशेपासून साधारणतः ४५० नी होते. कोरिऑलिस प्रेरणेमुळेच सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेला अनुसरून, तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्घ दिशेने वाहतात. याच प्रेरणेमुळे खंडांच्या पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या प्रवाहांच्या विरुद्घ दिशेने खंडांच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाह वाहतात. वाऱ्यापेक्षा प्रवाहांचे विचलन अधिक होत असले, तरी वाऱ्यापेक्षा त्यांचा वेग कमी असतो. वारे आणि कोरिऑलिस प्रेरणा यांमुळे नियमन होत असणाऱ्या अटलांटिक, पॅसिफिक व हिंदी महासागरातील प्रवाहांचा विस्तृत भोवऱ्यासारखा (गोलाकार) एक विशिष्ट आकृतिबंध तयार होतो. ध्रुवीय प्रदेश वगळता विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिण भागांत पृष्ठीय सागरी प्रवाह गोलाकार वाहतात.


व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावामुळे अटलांटिक, पॅसिफिक व हिंदी महासागरांच्या विषुववृत्तीय भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे उत्तर विषुववृत्तीय (उत्तर गोलार्ध) व दक्षिण विषुववृत्तीय (दक्षिण गोलार्ध) असे दोन सागरपृष्ठीय प्रवाह आहेत. सागरजलात समपातळी राखण्याच्या गुरुत्वाकर्षणीय प्रेरणेमुळे या दोन मोठ्या प्रवाहांच्या दरम्यान त्यांच्या विरुद्घ दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे विषुववृत्तीय प्रतिप्रवाह आढळतात. या प्रवाहांची व्याप्ती कमी आहे. उत्तर हिंदी महासागर वगळता अटलांटिक व पॅसिफिकमधील दोन्ही विषुववृत्तीय प्रवाह महासागरांच्या पश्चिम भागातून खंडांच्या किनाऱ्याजवळून ध्रुवीय प्रदेशाकडे वाहू लागतात. उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळील या प्रवाहाला गल्फ प्रवाह, दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाहाला ब्राझील,आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाहाला मोझँबीक व अगुल्हास, ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाहाला पूर्व ऑस्ट्रेलिया तर आशियाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाहाला कुरोसिवो या नावाने संबोधले जाते.


खंडांच्या पूर्व किनाऱ्याजवळून वाहणारे हे प्रवाह मध्य कटिबंधात आल्यावर पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे दिशा बदलून पूर्वेकडे खुल्या महासागराकडे वाहू लागतात. या ठिकाणी त्यांचा वेग मंदावलेला असतो; त्यामुळे त्यांना सामान्यपणे प्रवाहांऐवजी ड्रिफ्ट्स असे संबोधले जाते. उत्तर गोलार्धात अशा मंद गतीने वाहणाऱ्या प्रवाहांमध्ये उत्तर अटलांटिक, उत्तर पॅसिफिक या मुख्य प्रवाहांचा आणि त्यांच्या नॉर्वेजियन व अलास्का या शाखांचा समावेश होतो. गल्फ प्रवाह उत्तर अटलांटिक प्रवाहात, तर कुरोसिवो प्रवाह उत्तर पॅसिफिक प्रवाहात मिसळतो. कुरोसिवो, उत्तर पॅसिफिक, गल्फ, उत्तर अटलांटिक व नॉर्वेजियन प्रवाह उबदार पाणी आर्क्टिक महासागराकडे वाहून नेतात. हे सागरी प्रवाह पुन्हा आपली दिशा बदलून खंडांच्या पश्चिम किनाऱ्याने विषुववृत्ताकडे वाहू लागतात. अटलांटिकमध्ये त्यांना कानेरी (उत्तर गोलार्ध) व बेंग्वेला (दक्षिण गोलार्ध) या नावांनी, पॅसिफिकमध्ये कॅलिफोर्निया (उत्तर गोलार्ध) व पेरू किंवा हंबोल्ट (दक्षिण गोलार्ध) ह्या नावांनी, तर हिंदी महासागरात पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाह या नावाने ते ओळखले जातात. हे सर्व सागरी प्रवाह पुन्हा तीनही महासागरांमधील उत्तर किंवा दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहांना मिळतात. अशा प्रकारे हे प्रवाह गोलाकार चक्र पूर्ण करतात. गोलाकार फिरणाऱ्या या प्रवाहांच्या केंद्रस्थानी तुलनेने शांत सागरी भाग आढळतात. उदा.,उत्तर अटलांटिकमध्ये गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे (पूर्वेस) व दक्षिणेस असलेला सारगॅसो समुद्र. या समुद्राचे पाणी उच्च क्षारतेचे व उबदार असते.


गल्फ-उत्तर अटलांटिक प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनाऱ्याजवळ आल्यावर तेथे त्याच्या कानेरी व नॉर्वेजियन अशा दोन शाखा होतात. दक्षिणेकडे जाणारी शाखा कानेरी या नावाने ओळखली जाते. उत्तरेकडे जाणारी नॉर्वेजियन शाखा ब्रिटिश बेटे, नॉर्वे यांच्या किनाऱ्याजवळून वाहत जाऊन आर्क्टिक महासागरात विलीन होते. आर्क्टिक महासागराकडून उत्तर अटलांटिकमध्ये येणाऱ्या पूर्व ग्रीनलंड व लॅब्रॅडॉर या थंड प्रवाहांचा न्यू फाउंडलंड बेटाजवळ गल्फ या उष्ण प्रवाहाशी, तर आर्क्टिक महासागराकडूनच उत्तर पॅसिफिकमध्ये येणाऱ्या ओयाशियो (ओखोट्स्क किंवा कॅमचॅटका) या थंड प्रवाहाचा जपानच्या किनाऱ्याजवळ कुरोसिवो या उष्ण प्रवाहाशी संयोग होतो. दक्षिण गोलार्धात साधारण याच अक्षांशाच्या दरम्यान बहुतेक सर्वत्र महासागरी भाग असून तेथे या विषुववृत्तीय प्रवाहांचा संयोग ‘वेस्ट विंड ड्रिफ्ट’ या विस्तृत प्रवाहाशी होतो. तेथे या प्रवाहांना वैयक्तिक नावे नाहीत. पृष्ठीय प्रवाहांपैकी गल्फ, कुरोसिवो व अगुल्हास हे तीनही प्रवाह अधिक वेगवान व प्रभावी आहेत. त्यांचा वेग दर ताशी ६ किमी. असतो. ब्राझील व पूर्व ऑस्ट्रेलियन प्रवाह त्यामानाने संथ आहेत. हिंदी महासागराच्या उत्तर भागात ऋतुमानानुसार वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यांमुळे तेथील सागरी प्रवाहांत बदल घडून येतात. पृष्ठीय प्रवाहांच्याखालून वेगवेगळ्या खोलीवर विरुद्घ दिशेने वाहणारे वेगवेगळे उपपृष्ठीय प्रवाह आढळतात. उदा., पॅसिफिकमधील क्रॉमवेल, अटलांटिकमधील गल्फप्रतिप्रवाह.


सागरजलाच्या लवणतेतील भिन्नतेनुसार घनतेतही भिन्नता निर्माण होते. अधिक लवणता असलेल्या पाण्याची घनता अधिक असते. पाण्याचे भिन्नघनतेचे थर एकमेकांजवळ आल्याने किंवा सागरपृष्ठावर उतार निर्माण झाल्याने अथवा या दोन्हींमुळे क्षितिजसमांतर दिशेत दाबामध्ये फरक निर्माण होऊनगुरुत्वप्रचलित प्रवाह निर्माण होतात. जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीत या दोन्ही प्रकारच्या प्रेरणा कार्य करतात. भूमध्य समुद्राचे जड पाणी पूर्वेकडील भागातखाली दाबले जाऊन निर्माण झालेला खोल सागरी प्रवाह खालच्या थरातून पश्चिमेस अटलांटिक महासागराकडे जातो. याउलट अटलांटिकमहासागरातील कमी क्षारतेचे हलके पाणी पृष्ठभागावरून पूर्वेस भूमध्य समुद्राकडे येते. तांबडा समुद्र, इराणचे आखात आणि हिंदी महासागर यांदरम्यानतसेच बाल्टिक समुद्रात असेच सागरी प्रवाह आढळतात. बाल्टिक समुद्रातील प्रवाहाच्या बाबतीत मात्र आत येणारे पाणी जड म्हणून खालच्या थरातून येतेव हलके पाणी वरच्या थरातून बाहेर जाते.


सागरी प्रवाह निर्मितीवर लवणतेबरोबरच तापमानाचाही परिणाम होतो. कमी अक्षवृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे सामान्यपणे पाण्याची पातळीकिंचित अधिक राहते. त्यामुळे कमी अक्षवृत्तीय (विषुववृत्तीय) प्रदेशाकडून उच्च अक्षवृत्तीय प्रदेशाकडे पाण्याचे प्रवाह वाहत जातात. हवेचा दाब जास्तअसलेल्या भागात पाण्याची पातळी कमी राहते, तर हवेचा दाब कमी असल्यास पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे जास्त पातळीच्या प्रदेशाकडून कमीपातळी असलेल्या जलभागाकडे सागरी प्रवाह वाहू लागतात.

मोठ्या महासागरी गोलाकार प्रवाहांशिवाय लहानलहान विस्ताराचे अनेक प्रवाह काही समुद्र किंवा महासागराच्या बंदिस्त भागांत आढळतात.त्यांच्या अभिसरण प्रक्रियेवर कोरिऑलिस प्रेरणेपेक्षा सागरी भागाकडे वाहत येणाऱ्या पाण्याच्या दिशेचा परिणाम होतो. असे सागरी प्रवाह टास्मानियासमुद्रात आढळतात.


खोल सागरी भागातील अभिसरण प्रामुख्याने तापमान व लवणता यांच्यातील फरकावर अवलंबून असते.ही परिस्थिती प्रामुख्याने थंड प्रदेशात आढळते. सागरी पाण्याच्या तापण्यातील असमानता ही विशेषतः खोल सागरी भागातील पाण्याच्या हालचालीचे प्रमुख कारण आहे. ध्रुवीय प्रदेशात मुख्यतःहिवाळ्यात अतिथंड, अधिक लवणता व घनता असलेले पाणी पृष्ठभागापासून खूप खाली दाबले जाते. जादा घनतेमुळे पृष्ठभागावरील पाणी ज्या ठिकाणीखाली जाऊ लागते, तेथून उभ्या दिशेतील अभिसरणाला सुरुवात होते. महासागरातील उभी अभिसरण क्रिया विशेष जोरदार नसली, तरी महत्त्वाचीअसते; कारण त्यामुळे खोल सागरी पाणी पृष्ठभागावर येते व पृष्ठभागावरील पाणी खाली जाते. खाली दाबले गेलेले जड पाणी खालच्या थरातून अतिशय मंद गतीने विषुववृत्तीय प्रदेशाकडे वाहू लागते. त्याच वेळी उष्णकटिबंधातील उबदार व कमी घनतेचे पाणी सागरपृष्ठावरून ध्रुवीय प्रदेशाकडे वाहू लागते. अशा अभिसरणाची प्रमुख दोन उगमस्थाने आहेत :


वेडेल समुद्र हे पहिले उगमस्थान. वेडेल समुद्रात सर्वमहासागरांमधील जड पाणी खाली जाऊन ‘अंटार्क्टिका तळ जलराशी’ बनते. हिमाच्छादित अंटार्क्टिकाच्या किनाऱ्याजवळ या प्रवाहाचे पाणी ‘वेस्ट विंड ड्रिफ्ट्’ या नावाने अटलांटिक, हिंदी व पॅसिफिक महासागरांच्या तळावरून विषुववृत्ताच्या बरेच उत्तरेला वाहत जाते. हा जगातील सर्वांत मोठा तसेच संपूर्ण पृथ्वीला वळसा घालणारा प्रवाह आहे. दक्षिण गोलार्धातील इतर प्रवाहांवर या प्रवाहाचा विशेष प्रभाव पडतो. हा सागरी प्रवाह अतिखोल, थंड व तुलनेने मंद गतीचा परंतु प्रचंड प्रमाणात (गल्फ प्रवाहाच्या सु.दुप्पट) पाणी वाहून नेणारा आहे. पेरू,बेंग्वेला प्रवाह याच अंटार्क्टिक प्रवाहाचे पाणी वाहून आणत असल्याने ते थंड प्रवाह आहेत.


आइसलँड व ग्रीनलंड यांच्या मधील इर्मिंजर समुद्र आणि ग्रीनलंड व लॅब्रॅडॉर यांच्यामधील सागरी प्रदेश हे अभिसरणाचे दुसरे उगमस्थान आहे. हिवाळ्यात या भागातील थंड व जड पाणी खाली दाबले जाऊन ‘अटलांटिक गभीर जलराशी’ बनते. आर्क्टिक महासागरात यातील पाणी गोलाकार फिरते. सायबीरियन किनारा पार करून पुढे आल्यानंतर उत्तर अटलांटिकमध्ये ते पाणी ग्रीनलंड बेटाभोवती गोलाकार फिरते. आर्क्टिकभोवती सलग खुला महासागर नसल्याने तेथे प्रभावी परिध्रुवीय प्रवाह आढळत नाहीत. तेथे दक्षिणेकडे वाहणारे कमी व्याप्तीचे थंड प्रवाह आहेत. उदा., रशियाच्या पूर्व किनाऱ्याजवळून वाहणारा ओयाशियो प्रवाह, उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणारा कॅलिफोर्निया प्रवाह, ग्रीनलंड बेटाभोवती वाहणारे लॅब्रॅडॉर व पूर्व ग्रीनलंड प्रवाह.


▪️सागरी प्रवाहाची वैशिष्ट्ये

सागरी प्रवाहांची वैशिष्ट्ये अतिशय गुंतागुंतीची व सातत्याने बदलणारी आढळतात. काही प्रमुख व सर्वसाधारण वैशिष्ट्ये याप्रमाणे सांगता येतील : 


१) सागरी प्रवाह किनाऱ्याच्या अगदी जवळून वाहत नाहीत. त्यांचा विस्तार सामान्यपणे सागरमग्न खंडभूमीच्या सीमेपर्यंत आढळतो. 

२) उत्तर गोलार्धातील उत्तर पॅसिफिक व उत्तर अटलांटिकमध्ये मुख्य प्रवाह घड्याळकाट्याच्या दिशेला अनुसरून गोलाकार वाहतात. महासागरांच्या पश्चिम भागात ते उत्तरेकडे, तर पूर्व भागात ते दक्षिणेकडे वाहतात. दक्षिण गोलार्धात याच्या उलट परिस्थिती असते. 

३) दोन्ही गोलार्धातील गोलाकार भोवरे (जायरेट) एकसारख्या आकाराचे नाहीत. 

४) दोन गोलाकार भोवऱ्यांच्या मध्ये विषुववृत्तीय प्रतिप्रवाह आढळतात.

५)खंडांच्या दक्षिण भागांत प्रवाह पश्चिम-पूर्व दिशेत वाहतात. 

६) सागरी प्रवाहांचा सर्वाधिक वेग महासागरांच्या पश्चिम भागात आढळतो. उदा., गल्फआणि कुरोसिवो प्रवाहांचा वेग दरताशी ६ किमी. असतो.

७) सागरी प्रवाहांचा वेग जरी कमी असला, तरी त्यांबरोबर वाहून नेले जाणारे पाणी प्रचंडप्रमाणात असते. उदा., फ्लॉरिडा सामुद्रधुनीतून प्रतिसेकंद सु. २५ द. ल. टन पाणी वाहत असते. न्यूयॉर्कच्या अपतट भागातून वाहणाऱ्या गल्फ प्रवाहातूनयाच्या जवळजवळ दुप्पट पाणी वाहत असते.

८) जगातील सर्वांत मोठा प्रवाह अंटार्क्टिका खंडाभोवतीचा असून त्यातून प्रतिसेकंद सु. १०० द. ल. टनपाणी वाहत असते.


▪️सागरी प्रवाहांचे परिणाम


अठराव्या शतकापासून मार्गनिर्देशनासाठी सागरी सफरी निघू लागल्या. तेव्हापासून सागरी सफरींच्या दृष्टीने सागरीप्रवाहांचा अभ्यास होऊ लागला. त्यानंतर हवा व हवामानावर होणाऱ्या परिणामांच्या दृष्टीने सागरी प्रवाहांचा अभ्यास केला जाऊ लागला. सागरी प्रवाहांच्याअभ्यासावरून त्यांच्या वेगवेगळ्या परिणामांची माहिती उपलब्ध झाली. शुष्कता, भारी वर्षण, दाट धुकेयुक्त हवा हे अपतट सागरी प्रवाहाचे काही परिणामदिसून येतात. ज्या भागातून उष्ण किंवा थंड प्रवाह सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहत असतात, तेथील किनारी प्रदेशाच्या हवामानावर त्या प्रवाहाचापरिणाम होतो. पश्चिम यूरोप, दक्षिण अलास्का व जपानच्या किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या उष्ण प्रवाहांमुळे तेथील थंडीची तीव्रता कमी होऊन हवामानउबदार बनले; अन्यथा तेथील हवामान तीव्र व असह्य स्वरूपाचे राहिले असते. गल्फ प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क, ग्रेट ब्रिटन वनॉर्वेमधील बंदरे हिवाळ्यात न गोठता सागरी वाहतुकीसाठी खुली राहतात. अशाच प्रकारे जपान व उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याचे हवामानहिवाळ्यात उबदार राखले जाते. उबदार पाणी व उबदार हवामानामुळे बाष्पीभवन अधिक होऊन लगतच्या किनारी प्रदेशातील वृष्टिमान वाढते. याउलटदक्षिण गोलार्धात पेरू व बेंग्वेला हे थंड सागरी प्रवाह दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा व आफ्रिकेच्या नैर्ऋत्य किनाऱ्याजवळून वाहत असल्याने तेथे दाटधुके निर्माण होते व हवामान थंड राहते; परंतु वृष्टी होत नाही. परिणामतः पेरू, चिली व नैर्ऋत्य आफ्रिका (नामिबिया) येथे ओसाड वाळवंटी प्रदेशांचीनिर्मिती झाली आहे.


सागरी प्रवाह व वातावरणीय अभिसरण क्रिया यांचा परस्परांवर परिणाम होत असतो. उदा., पश्चिम पॅसिफिकवरील आवर्ती उबदार व आर्द्र वाऱ्यांचेअभिसारी प्रवाह पूर्वेकडे स्थलांतरित होतात, तेव्हा पूर्व पॅसिफिकमधील पाणी उबदार बनून एल् निनो परिणाम जाणवू लागतात. त्याचे तेथील हवा वहवामानावर गंभीर परिणाम दिसून येतात. ऑस्ट्रेलियात अवर्षण, कॅलिफोर्नियात वादळ तर उत्तर अमेरिकेच्या मध्यवर्ती भागातील हिवाळे उबदारराहतात. पेरू व चिलीच्या मत्स्योद्योगावरही त्याचा विपरीत परिणाम होतो.


सागरी प्रवाहांबरोबर ध्रुवीय प्रदेशाकडून हिमनग वाहत येतात. असे हिमनग सागरी वाहतूक मार्गावर आले, तर जहाजांना ते फार धोकादायकठरतात. सागरी प्रवाह सागरी जीवांना पोषक ठरतात. उष्ण व थंड प्रवाह जेथे एकत्र येतात, तेथे प्लवक या माशांच्या मूलभूत खाद्याची विपुल प्रमाणात वाढहोते. त्यांवर माशांची चांगली पैदास होऊन असे प्रदेश प्रसिद्घ मत्स्यक्षेत्रे बनली आहेत. उदा., अटलांटिक व पॅसिफिक महासागरांचे वायव्य व ईशान्य भाग,दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा. ह्या समृद्घ मत्स्यक्षेत्रांच्या निर्मितीमागील वेगवेगळ्या कारणांपैकी उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संयोग हे एक महत्त्वाचेकारण आहे. सागरी प्रवाह नसते, तर समुद्र व महासागरांतील पाणी संचित राहिले असते. अशा पाण्यात सजीवांना आवश्यक खाद्याचा पुरवठा झालानसता. परिणामतः सागरी जीवसृष्टी व तेथील परिसंस्था मर्यादित राहिल्या असत्या.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...