🔰29 जुलै 2020 रोजी आयोजित जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर भारतातल्या व्याघ्र गणनेनी केलेला नवीन गिनीज विक्रम भारतीय नागरिकांना समर्पित करणार आहेत.
🔰भारतात दर चार वर्षांनी होणाऱ्या ‘राष्ट्रीय व्याघ्र गणना 2018’ याच्या अहवालानुसार कॅमेराद्वारे केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातल्या व्याघ्र गणनेनी नवीन गिनीज विश्व विक्रम स्थापित केला आहे. सन 2018-19 मध्ये केलेले सर्वेक्षण हे संसाधन आणि माहिती या दोन्ही गोष्टी संग्रहीत करण्याच्या दृष्टीने आजपर्यंतचे सर्वात व्यापक सर्वेक्षण होते.
🔴ठळक बाबी...
🔰नव्या गणनेनुसार, देशात सुमारे 2967 वाघ आहेत. वर्तमानात, जागतिक संख्येच्या सुमारे 70 टक्के वाघ भारतात आहेत.
🔰वगवेगळ्या 141 क्षेत्रात 26,838 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते आणि त्याद्वारे 121,337 चौरस किलोमीटर (46,848 चौरस मैल) क्षेत्रफळाचे प्रभावी सर्वेक्षण करण्यात आले. या सापळा रुपी कॅमेऱ्यांनी वन्यजीवांची 34,858,623 छायाचित्रे हस्तगत केली. त्यात 76,651 वाघ आणि 51,777 बिबट्या होते; बाकीचे इतर स्थानिक प्राणी होते.
वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प निर्धारित वेळेच्या चार वर्ष आधीच भारताने पूर्ण केला आहे.
पार्श्वभूमी
🔰चार वर्षातून एकदा होणारी राष्ट्रीय व्याघ्र गणना ही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाद्वारे भारतीय वन्यजीव संस्थेच्या तांत्रिक सहकार्यातून राबविण्यात येत असून राज्य वनविभाग व हितधारक त्याची अंमलबजावणी करीत आहेत. नऊ व्याघ्र क्षेत्रांवर सुरु करण्यात आलेला ‘प्रोजेक्ट टायगर’ सारखा प्रजाती विशेष कार्यक्रम आता 50 व्याघ्र क्षेत्रांवर सुरु आहे.
🔰वाघांचा वावर असणाऱ्या देशातल्या सरकारच्या प्रमुखांनी सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे जागतिक पातळीवर वाघांची संख्या 2022 सालापर्यंत दुप्पट करण्याचा निर्धार सेंट पीटर्सबर्ग घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या करुन केला आहे. याच बैठकीत 29 जुलै हा दिवस जगभर जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरुन व्याघ्र संवर्धनाविषयी जागृती निर्माण होण्यास मदत मिळणार.
No comments:
Post a Comment