Thursday, 11 January 2024

लहुजी राघोजी साळवे


जन्म - १४ नोव्हेंबर १७९४–

मृत्यू -१७ फेब्रुवारी १८८१


एकोणिसाव्या शतकातील एक महाराष्ट्रीय क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक. लहुजीबुआ, लहुजी वस्ताद या नावांनीही ते परिचित होते आणि त्यांचे घराणे ‘ राऊत’ या नावाने ख्यातनाम होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवडी-पेठ (ता. पुरंदर) येथे राघोजी व विठाबाई या दांपत्यापोटी झाला. साळवे हे पराक्रमी घराणे असून छ. शिवाजी महाराजांनी लहुमांग यांस (लहुजींचे आजोबा) ‘राऊत’ ही पदवी देऊन पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली होती. लहुजींचे वडील राघोजी हे पेशवाईत शिकारखान्याचे प्रमुख होते, शिवाय शस्त्रागारखात्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे होती. खडकीच्या युद्घात पेशवाईचा अस्त झाला. त्यानंतर १७ नोव्हेंबर १८१७ रोजी झालेल्या लढाईत मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याविरुद्घ लढताना ते धारातीर्थी पडले. ते पाहून लहुजींनी आजन्म ब्रह्मचारी राहून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा द्दढनिश्चय केला. त्यांनी पुण्यातील गंजपेठेत व्यायामशाळा (तालीम) सुरु केली (१८२३), शिवाय शस्त्रास्त्रांच्या गुप्त प्रशिक्षणासाठी गुलटेकडी परिसरातील निर्जन, दाट झाडीमध्ये जागा निवडली.


महात्मा जोतीराव फुले व त्यांचे गोवंडे, परांजपे हे मित्र, वासुदेव बळवंत फडके, आप्पासाहेब भांडारकर, विठोबा गुठाळ वगैरेंना मल्लविद्येबरोबरच शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण लहुजींनी दिले. सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर आणि पुणे प्रांतातील तत्कालीन बंडखोर व दरोडेखोर मांग, रामोशी, भटके-विमुक्त यांना लहुजींनी एकत्र करुन स्वातंत्र्याचे बीज या बेडर माणसांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला. त्या सुमारास सत्तू नाईक याची टोळी दरोडेखोरीत अग्रेसर होती. त्याचेही मन वळवून त्याला क्रांतिवीर उमाजी नाईक आणि वासुदेव फडके यांना मदत करण्याचे आवाहन केले. अठराशे सत्तावनच्या उठावात लहुजींच्या तालमीत तयार झालेले अनेक क्रांतिवीर सामील झाले होते. त्यांना फाशी वा जन्मठेप अशा कठोर शिक्षा ब्रिटिशांनी ठोठावल्या. लहुजींपासून प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू , स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ही परंपरा पुढे नेली.


लहुजींनी महात्मा फुले यांच्या दलितोद्घारात सर्वतोपरी सहकार्य केले. म. फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली (१८४८). लहुजींनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस या शाळेत पाठविले आणि राणबा (हरिजन) च्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले. मुक्ताने लहुजी आणि फुले दांपत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला. तो ज्ञानोदय नियतकालिकात प्रसिद्घ झाला (१८५५). तो पुढे ना. वि. जोशीकृत पुणे वर्णन (पुरवणी अंक २) यात छापण्यात आला. फुले यांच्या शैक्षणिक कार्यास लहुजींनी भक्कमपणे मदत केली. फुले यांच्या मिरवणुकीत, सभेत वा कार्यक्रमात लहुजी आपल्या तालीमबाज शिष्यांसह हजेरी लावीत. वृद्घापकाळाने त्यांचे पुणे येथे निधन झाले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...