( जन्म - 3 जानेवारी 1839 - मृत्यू -10 मार्च 1897) : एकोणिसाव्या शतकातील शूद्र, दीन, दलित समाजासाठी कार्य करणाऱ्या क्रांतिदेवता आणि पहिल्या स्त्री शिक्षिका. तात्कालीन समाजव्यवस्थेमध्ये स्त्रीला सामाजिक महत्व मिळावे यासाठी सावित्रीबाईंनी अथव प्रयत्न केले आणि स्त्री शिक्षण चळवळीसाठी आपले आयुष्य निर्माण केले.
सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्हयातील नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील व लक्ष्मीबाई या दाम्पत्यापोटी झाला. नेवसे पाटील यांच्या घराण्यातील सावित्रीबाई हे पहिले अपत्य. लहानपणापासून विविध कामात सावित्रीबाई पुढाकार घेत. सावित्रीबाईंचा विवाह सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांच्याशी झाला. त्या काळात समाजामध्ये स्त्रीला अतिशय बंधने होती. स्त्रीला अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जात असे. शिक्षणापासून तर ती वंचित होतीच. जोतीराव करीत असलेल्या समाजसुधारणेच्या लोकशिक्षणाच्या कार्यात जोतीरावांच्या मदतीने सावित्रीबाईंनी स्वत:चे व्यक्तिमत्व निर्माण केले.
त्या काळात आपल्या समाजातील स्त्री समाजाला शिक्षण देणे महत्वाचे होते. त्यांना ज्ञानाची कवाडे उघडून द्यावी या उद्देशाने जोतीराव फुले यांनी प्रथम सावित्रीबाईंना शिकविण्यास सुरुवात केली. जोतीराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये भिडे वाडा येथे सुरु केली. त्या शाळेमध्ये सावित्रीबाईंनाच शिक्षिका म्हणून नेमले. या कार्याला त्या काळच्या समाजातून खूप विरोध झाला. शिकविण्यासाठी बाहेर पडलेल्या सावित्रीबाईंवर शेण, चिखलाचे गोळे, दगड फेकले जात. त्यांच्यावर अपशब्दांचे वार होत. तरीही सावित्रीबाई दलित व मुस्लिम मुलींसाठी शाळा काढल्या. पुणे व सातारा जिल्हयात सुमारे अठरा शाळा सुरु केल्या. सावित्रीबाईंनी शिक्षिका व शिक्षणतज्ज्ञ म्हणून अनेक शैक्षणिक प्रयोग केले. मुलींची शाळेतील कमी संख्या व अधिक गुणवत्ता पालकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्व पटविण्यासाठी साक्षरता अभियान असे अनेक प्रयत्न शिक्षण क्षेत्रात त्यांनी केले. 1852 साली जोतीरावांच्या व सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्याबद्दल सरकारी शिक्षण खात्याकडून त्या दोघांचा मेजर कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सत्कार करण्यात आला.
या शिक्षणाबाबत केलेल्या महत्वाच्या कार्याबरोबरच अनेक प्रकारचे सामाजिक कार्यही सावित्रीबाईंनी केले. सर्वधर्मीय महिलांचे मेळावे सावित्रीबाईंनी घेतले. विधवा पुनर्विवाह चळवळीत सावित्रीबाईंनी भाग घेतला. त्यांच्या पुढाकाराने ब्राम्हण विधवांच्या बाळंतपणासाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ स्थापन करुन त्यांची बाळंतपणे सावित्रीबाईंनी स्वहस्ते केली. विधवांच्या केशवपनाची रुढी संपुष्टात आणण्यासाठी जोतीरावांनी घडवून आणलेल्या नाभिकांच्या संपात सावित्रीबाईंचा महत्वपूर्ण सहभाग असल्याचे काही कागदपत्रांवरुन स्पष्ट होते.
सावित्रीबाई हया आधुनिक मराठीतील आद्य कवयित्री. ‘काव्यफुले’, ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे त्यांचे काव्यसंग्रह. जोतीरावांची भाषणे सावित्रीबाईंनी चार भागात संपादित केली आणि त्याव्दारे जोतीरावांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले. सावित्रीबाईंच्या कार्यास त्यांच्या माहेरहून विरोध होता तर समाजरचनेविरुध्द काम करतात म्हणून जोतीरावांना आणि सावित्रीबाईंना त्यांच्या सासऱ्यांनी घराबाहेर काढले, पण त्या दोघांनीही आपले ध्येय सोडले नाही. त्यावेळेस सावित्रीबाईंनी रोवलेली स्त्रीशिक्षणाची बीजे आज वटवृक्षात रुपांतरीत झाली आहेत.
No comments:
Post a Comment