Monday, 1 April 2024

मागोवा इतिहासाचा....

८ मे,१९१५ लॉर्ड हार्डिंग्जच्या हत्तीवर बॉम्बस्फोट करणाऱ्या रासबिहारी बोस आणि शूर हुतात्म्यांच्या बलिदानाचा दिवस !


२३ डिसेंबर, १९१२ रोजी लॉर्ड हार्डिंग्ज आपल्या लवाजम्यासह कलकत्त्याहून निघून दिल्लीत प्रथमच पोचणार होता. एखाद्या राजासारखी हत्तीवरील हौद्यात बसून त्याची लेडीसह मिरवणूक निघणार होती. अन्य मांडलिक राजांचे हत्ती, घोडे, उंट त्याच्यापुढे असणार होते. इंग्रजांशी एकनिष्ठता दाखवण्याची उत्तम संधी ! रासबिहारी बोस आणि त्यांचे सहकारी यांनी या हत्तीवरच बॉम्ब फेकायचा  निर्धार केला. जुन्या किल्ल्यापासून लाहोर गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक तीन मजली इमारत त्यांनी हेरली. मिरवणुकीच्या वेळी इथे महिला घराच्या माड्यांवर बसून गम्मत पाहणार हे उघड होते. इमारतीत महिलेच्या वेशात जाऊन बसायचे आणि वरून बॉम्ब टाकायचा हे ठरले. मास्टर अमीरचंद, भाई बालमुकुंद, अवधबिहारी, वसंतकुमार विश्वास आणि स्वतः रासबिहारी यामध्ये सहभागी होते. हा बॉम्ब रासबिहारींनी स्वतः निर्माण केला होता. त्याचे नाव होते लिबेर्टो. हा सुरक्षिततेसाठी दोन भागात बनवलेला बॉम्ब होता.


लॉर्ड हार्डिंग्ज पत्नीसह हत्तीवर ठेवलेल्या चांदीच्या हौद्यात बसला, त्याच्या मागे जमादार बसला आणि राजाच्या ऐटीत मिरवणूक सुरु झाली. क्रान्तिकारकांनी ठरविलेल्या ठिकाणी हत्ती आला. बसंत कुमार बिस्वास बुरखाधारी स्त्रीचा वेष घालून वरच्या मजल्याच्या गच्चीत बसले होते. योग्य ठिकाणी हत्ती येताच त्यांनी बॉम्बचे दोन सुटे भाग जुळवले आणि नेम धरून बॉम्ब हौद्यावर फेकला. जमादार खलास झाला. पाठीकडच्या  चांदीच्या जाड पत्र्यामुळे हार्डिंग्ज वाचला परंतु जखमी झाला , त्याचा अंगरखा फाटला, पुढच्या सत्कार कार्यक्रमातून माघार घेण्याइतकी त्याची तब्येत बिघडली. मिरवणुकीचा त्याने इतका धसका घेतला, की पुढे कपूरथळामध्ये अशी मिरवणूक निघाली तेव्हा त्याने तेथील राजाला स्वतःच्या शेजारी बसवूनच मिरवणुकीत भाग घेतला !


बॉम्बस्फोट करून पाचही जण यशस्वीरीत्या गायब झाले. या स्फोटाच्या तपासात इंग्रजांना थेट यश कधीच मिळाले नाही. पण पुढे फितुरीमुळे रासबिहारी सोडून अन्य चौघे पकड़ले गेले. रासबिहारी जपानला गेले. तिथे त्यांनी आझाद हिन्द सेना उभारली. 

मास्टर अमीरचंद न्यायालयात बेडरपणे उद्गारले, 'तुम्ही ब्रिटिश संख्येने आहात कितीसे ? सर्व भारतीय तुमच्याकड़े पाहुन थुंकले तरी त्या लोटात तुम्ही वाहून जाल, दुर्दैवी आम्ही आहोत, आधी कोण थुंकणार यावर भांडत बसू.'


प्रत्यक्ष कोणताही पुरावा नसुनही इंग्रजांनी दिल्ली कारागृहात अवध बिहारी, भाई बालमुकुंद आणि मास्टर अमीरचंद यांना आजच्याच दिवशी फासावर चढवले तर बसंतकुमार बिस्वास या तरुणाला अम्बाला कारागृहात ११ मे दिनी फाशी देण्यात आले.

No comments:

Post a Comment