Tuesday, 16 April 2024

गिफेन वस्तू (Giffen Goods)




🔰 हलक्या, निकृष्ट आणि कनिष्ठ दर्जाच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू. गिफेन वस्तूंबाबतची संकल्पना ब्रिटिश संख्याशास्त्रज्ञ सर रॉबर्ट गिफेन यांनी प्रथम मांडली.

🔰 गिफेन वस्तू या संकल्पनेत एखाद्या वस्तूची किंमत घटल्यास उपभोक्ता त्या वस्तूच्या मागणीत वाढ करण्याऐवजी घट करतो; याउलट, त्या वस्तूची किंमत वाढल्यास मागणीत घट करण्याऐवजी वाढ करतो, यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात.

🔰 उदा., केकच्या तुलनेत ब्रेड; गव्हाच्या तुलनेत ज्वारी व बाजरी; शुद्ध तुपाच्या तुलनेत वनस्पती तूप; नामांकित (Branded) कपड्यांच्या तुलनेत जाडेभरडे कपडे; नामांकित चप्पल, बूट यांच्या तुलनेत साध्या चप्पल, बूट; शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या तुलनेत बेन्टेक्सचे दागिने इत्यादी. गिफेन वस्तू ही संकल्पना वस्तूच्या भौतिक गुणवत्तेपेक्षा उत्पन्नाशी निगडीत आहे.

🔰 उदा., बाजारात पाव स्वस्त झाल्यावर गरीब लोक त्याची मागणी वाढवण्याऐवजी कमी करून वाचणारा पैसा दुसऱ्या पर्यायी वस्तूंवर (उदा., केक इत्यादी) खर्च करतात.

🔰 गिफेन वस्तू या संकल्पनेमुळे मागणीच्या सिद्धांताची बाजू भक्कम झाल्याचे दिसते. निकृष्ट दर्जाच्या वस्तू किंवा गुणवत्ताधारक वस्तू या बाबी उपभोक्ताच्या उत्पन्नानुसार ठरतात. या वस्तूंच्या किमतींचे त्यांच्या मागणीवर धनात्मक व ऋणात्मक हे दोन्ही परिणाम दिसून येतात.

🔰 गिफेन वस्तूंचा उपभोक्ता वर्ग त्या त्या देशातील दारिद्र्य, गरिबी यांची वास्तव स्थिती दर्शवितो. शासनाला विकसननीती तसेच कल्याणकारी नीती बनविताना अथवा राबविताना या संकल्पनेचा मार्गदर्शक म्हणून उपयोग होतो.

🔰 गिफेन वस्तूंच्या बाबतीत उपभोक्त्याच्या उत्पन्नाचा उपभोगावरील परिणाम आकृतीच्या साह्याने स्पष्ट करता येतो. यासाठी उपभोक्त्याची उत्पन्नरेषा अथवा अंदाजपत्रकीय रेषा, समवृत्ती-वक्र आणि उपभोक्त्याचा उपभोग-वक्र या सैद्धांतिक साधनांचा उपयोग करता येतो.

No comments:

Post a Comment