Wednesday, 12 August 2020

बलॅक बॉक्स म्हणजे काय? ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा का असतो?



मुंबईतील घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळलं. दुर्घटनेनंतर बचाव दलाला विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. प्रत्येक विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची चर्चा होते. पण हा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, तो नेमका कसा असतो, त्याचं महत्त्व काय हे जाणून घेऊया.

▪️बलॅक बॉक्स म्हणजे काय?

एखाद्या विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दोन उपकरणं अतिशय महत्त्वाची असतात. एक म्हणजे विमानाचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉरपिट व्हॉईस रेकॉर्ड (सीव्हीआर), यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात.एका उपकरणामध्ये कॉरपिटमधील संभाषण रेकॉर्ड होतं तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे, उदाहरणार्थ वेग आणि उंचीच मोजमाप होतं.

▪️बलॅक बॉक्सची वैशिष्ट्ये:

नावानुसार याचा रंगही काळा असेल, असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण ब्लॅक बॉक्सचा रंग नारिंगी असतो. या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. ब्लॅक बॉक्सची बॅटरी 30 दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो.ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या मागील भागात बसवलेला असतो, कारण दुर्घटनेच्या परिस्थितीत हा भाग सर्वात सुरक्षित समजला जातो.

▪️अपघाताचे कारण जाणण्यासाठी उपयुक्त

ब्लॅक बॉक्स अनेक चाचण्यांमधून जातो. उदाहरणार्थ ब्लॅक बॉक्स रेकॉर्डर 'एल-3 एफए 2100' 1110 अंश सेल्सिअस आगीत अनेक तास आणि 260 डिग्री सेल्सिअस तापमानात 10 तास राहू शकतो. इतकंच नाही तर मायनस 55 पासून प्लस 70 अंश सेल्सिअस तापमानातही ब्लॅक बॉक्स काम करतो.विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो. यात रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे विमान दुर्घटनेच्या कारणांचा पत्ता लागतो.

▪️बलॅक बॉक्स लावणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश

विमानात ब्लॅक बॉक्स लावणं अनिवार्य करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश होता. 1960 मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विमानात ब्लॅक बॉक्स लावला होता. भारतात  नागरी उड्डाण संचलनालयाने 1 जानेवारी, 2005 पासून सर्व विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये सीव्हीआर आणि एफडीआर लावणं अनिवार्य केलं.

▪️बलॅक बॉक्सचा शोध कोणी लावला?

ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी 1950 च्या दशकात ब्लॅक बॉक्सचा शोध लावला होता. मेलबर्नच्या वैमानिक संशोधन प्रयोगशाळेत काम करत होते. त्यावेळी कमर्शिअल एअरक्राफ्ट 'कॉमेट'चा अपघात झाला होता. या अपघाताचा तपास करणाऱ्या पथकात त्यांचा समोवश होता. विमान दुर्घटना होण्याआधीच्या घडामोडी रेकॉर्ड करता येईल का असा विचार करुन त्यांनी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा शोध लागला. क्वीन्सलॅण्डमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर ऑस्ट्रेलिया जगातील पहिला असा देश होता, ज्याने कमर्शिअल विमानात ब्लॅक बॉक्स लावणं अनिवार्य केलं होतं.

No comments:

Post a Comment