Tuesday, 18 August 2020

विविध आक्षेपांनंतरही रशियाने सुरु केलं लसीचं उत्पादन.



🔰जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेसह काही देशांच्या आक्षेपानंतरही रशियानं आपल्या करोनाच्या लसीचं उत्पादन सुरू केलं आहे. गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीनद्वारे विकसित करण्यात आलेल्या ‘स्पुटनिक – व्ही’ या करोना विषाणूवरील लसीचं उत्पादन सुरू करण्यात आल्याचं रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. पुढील वर्षभरात करोना विषाणूच्या लसीचे देशात ५० कोटी कोटींपेक्षा अधिक डोस तयार करण्यास सक्षम असल्याचं रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

🔰“ही लसीच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसंच करोना विषाणूच्या विरोधात रोगप्रतिकारक क्षमता विकसित करण्यासदेखील ही लस यशस्वी ठरली आहे,” असं रशियाच्या आरोग्य मंत्रालाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ही लस एका व्यक्तीला दोन वेळा देण्यात येते आणि या विषाणूविरोधात दोन वर्षांपर्यंत रोग प्रतिकारक क्षमता विकसित करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. यापूर्वी या लसीची ७६ स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आल्याचं रशियाकडून सांगण्यात आलं आहे.

🔰या लसीचं उत्पादन लवकरच परदेशांमध्येही सुरू करण्यात येणार आहे. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि फिलिपिन्समध्येही याची चाचणी सुरू होणार असल्याची माहिती रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर दुसरीकडे ही लस किती सुरक्षित आहे आणि प्रभावशाली आहे याची चाचणी करण्यात आली नसल्याचं ब्रिटनचे वृत्तपत्र डेलीमेलनं म्हटलं आहे. इतकंच नाही तर या लसीचे काही दुष्परिणामही दिसून आले असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

🔰तम्ही तुमच्या करोना लसीचा ट्रायल डेटा प्रसिद्ध करा, जेणेकरुन तज्ज्ञांना परिणामकारकता तपासता येईल अशी WHO ने रशियाला यापूर्वी विनंती केली होती. डेली मेलच्या वृत्तानुसार आतापर्यंत केवळ ३८ स्वयंसेवकांवरच या लसीची चाचणी करण्यात आली. लसीचा डोस दिल्यानंतर त्यांच्यामध्ये १४४ प्रकारचे साईड इफेक्ट्स दिसले. तसंच चाचणीच्या ४२ व्या दिवसापर्यंत ३१ स्वयंसेवकांमध्ये साईड इफेक्ट्स दिसत असल्याचा दावा डेली मेलनं केला आहे. तर दुसरीकडे रशियानं आपली लस सुरक्षित असल्याचं सांगत २० देशांकडून लसीची मागणीही आल्याचं म्हटलं आगे. तर रशियन वृत्तसंस्था फोटांकानं स्वयंसेवकांमध्ये दिसत असलेल्या साईड इफेक्ट्सची यादी मोठी असल्याचं म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment