: (२६ ऑगस्ट १९१० - ५ सप्टेंबर १९९७) एक थोर मानवतावादी समाजसेविका. भारतात स्थायिक झालेल्या अँल्बेनियन महिला व शांततेच्या नोबेल पारितोषिकाची मानकरी. तेरेसाचे पूर्ण नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू. तिचा जन्म रोमन कॅथलिक अँल्बे-नियन कुटुंबात स्कॉपये (यूगोस्लाव्हिया) येथे झाला. तेरेसाचे वडील किराणामालाचे दुकानदार होते आणि आई शेतकर्याची मुलगी. तिचे बालपण सुखात गेले. स्कॉपथे येथील सरकारी शाळेत शिक्षण घेत असताना ती सेवाकार्यांत रस घेत असे. अठराव्या वर्षी सिस्टर्स ऑफ लॉरेटो या आयरिश संघात तिने प्रवेश केला. नंतर एक वर्ष डब्लिन (आयर्लंड) येथे तिने इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर तिने जोगीण बनून पूर्णतः मिशनरी कार्यास वाहून घेतले. त्या कार्यानिमित्त ती भारतात कलकत्ता येथे लॉरेटो मिशनच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये भूगोल विषयाची अध्यापिका म्हणून रूजू झाली (१९२९).
स्पॅनिश योगिनी संत तेरेसाच्या नावाने तिचे नामान्तर झाले आणि पुढे मातृवत सेवाधर्मामुळे ती ‘मदर तेरेसा’ या नावाने ओळखली जाऊ लागली. तिने १९ वर्षे अध्यापन केले. ती प्राचार्य झाली; अध्यापन करीत असताना शाळेजवळील मोती झील झोपडपट्टी-तील गरिबांच्या दीन जीवनाचे तिला अनेक वेळा दर्शन होत असे. त्यामुळे तिच्या मनात अपंग, पददलित, शोषित, पीडित, दीनदुबळे इत्यादींची सेवा करावी, हे विचार येत. किंबहुना हीच ईशसेवा होय, असे विचार तिच्यात दृढमूल झाले. एकदा दार्जिलिंगला जात असताना ‘तू गरिबांच्या सेवेला लाग’ असा जणू दैवी संदेशच तिला मिळाला. तेव्हा शैक्षणिक जबाबदारीतून मुक्त होऊन तिने केवळ निराश्रित व दीनदुबळे यांच्या सेवेस आमरण वाहून घेतले.
या कार्यासाठी तिने पोपची परवानगी मिळविली आणि कलकत्ता येथे मिशनरिज ऑफ चॅरिटी ही सेवाभावी संस्था स्थापन केली (१९५०). पुढे या संस्थेचे रूपांतर संघात झाले. तिच्या विचारांशी सहमत असणार्या स्त्री-अनुयायीही कार्यकर्त्या म्हणून तिला लाभल्या. सुरूवातीस समाजातील उच्चभ्रू लोकांकडून तेरेसासह सेवाभावी महि- लांची खूप हेटाळणी व अवहेलना झाली. तेरेसाला तर लोक सेंट ऑफ द गटर्स म्हणत; तथापि या टीकेला न जुमानता तिने सेवाकार्य अखंड चालू ठेवले. विशेषतः मृत्युशय्येवरील व्यक्तीस अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजांबरोबर सहानुभूती, सांत्वन व प्रेम यांची नितांत गरज असते, हे तेरेसाने जाणले आणि इतरांनाही दाखवून दिले. या संस्थेच्या जोगिणी गटारात, उकिरड्यात व इतरत्र टाकून दिलेल्या उपेक्षित मुलांचे मातृप्रेमाने संगोपन करू लागल्या. मुलांसाठी तिने स्वतंत्र अनाथ आश्रम काढले. तसेच बेवारशी, निर्वासित, निराश्रित व रोगीपीडित मरणोन्मुख व्यक्तींसाठी होम्स फॉर द डायिंग डेस्टिट्यूट्स (निर्मल हृदय) हे आधार आश्रम स्थापन केले (१९५२). १९६४ मध्ये तेरेसाने पश्चिम बंगालमध्ये कुष्ठगृहाची स्थापना केली. या लोकांची सेवा करण्यात ती स्वतःस कृतार्थ मानू लागली; कारण त्यांची सेवा म्हणजे येशूचीच सेवा होय, अशी तिची धारणा आहे. ती स्वतःस ख्रिस्ताची विनम्र दासी मानत असे.
तिच्या कार्याचा कालानुरूप व्याप वाढला आणि कुष्ठरोग रूग्णालये, अनाथालये, महिला-अपंग-वृद्धांची आश्रमगृहे, फिरते दवाखाने, मरणोन्मुखांसाठी आधारगृहे, शाळा इ. विविध संस्था भारतात व भारतेतर देशांत पसरल्या. तेव्हा कार्यकर्त्यांची उणीव भासू लागली. या संस्थांत १९६२ पर्यंत फक्त सेविकांनाच प्रवेश होता; परंतु तेरेसाने मिशनरी ब्रदर्स ऑफ चॅरिटी ही वेगळी संघटना स्थापन करून पुरूष सेवकांना त्यात प्रवेश दिला. या संघात २,००० जोगिणी व ४०० ब्रदर्स कार्य करतात (१९८३).
मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या शाखा व उपशाखा जगभर ५२ देशांत प्रसृत झाल्या असून एकूण २२७ ठिकाणी संस्थेची सेवाकेंद्रे आहेत. भारतात व इतर देशांत संस्थेने चालविलेल्या ९८ शाळा, ४२५ फिरती रूग्णालये, १०२ कुष्ठरोग उपचार केंद्रे, २८ शिशुभवने, ४८ अनाथा-लये व ६२ आश्रमगृहे आहेत. महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद, विलेपार्ले या ठिकाणीही सेवा केंद्रे आहेत. मुंबई येथे आशादान नावाचे स्वीकार- गृह १९७६ मध्ये सुरू करण्यात आले. त्यात शिशुभवन, निर्मल हृदय व रूग्णांची सेवा या तिन्ही शाखा एकत्र केल्या आहेत. या संस्था-साठी लागणारा खर्च विविध देणग्यांतून तसेच तेरेसाला मिळालेल्या पारितोषिकांच्या रक्कमेतून करण्यात येतो.
दारिद्र्य, भूक, दुर्दशा आणि गर्भपातादी प्रकार यांमुळे कोणत्याही देशाची शांतता धोक्यात येते, असे तिचे मत आहे. म्हणून प्रथम या शत्रूंना दूर केले पाहिजे; यासाठी दुःखी व अपदग्रस्त लोकांची सेवा हाच एकमेव मार्ग आहे. या तिच्या सेवाकार्याची दखल घेऊन १९७९ चे शांततेचे नोबेल पारितोषिक तिला दिले. याशिवाय तिला त्रेचाळीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानसन्मान लाभले. त्यांपैकी मागसाय-साय पारितोषिक (१९६२), पोपचे शांतता पारितोषिक (१९७१), नेहरू पुरस्कार (१९७२), पद्मश्री देशिकोत्तमा, नॉर्वे लोकपारितोषिक (१९७९), भारतरत्न (१९८०) इ. महत्त्वाची व मानाची आहेत. विविध मान्यवर विद्यापीठांनी तिला डॉक्टरेट ही सन्मान्य पदवीही दिली आहे. ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा अत्युच्च ब्रिटिश पुरस्कार राणी दुसरी एलिझाबेथ हिने २४ नोव्हेंबर १९८३ रोजी तिच्या मानवतेच्या श्रेष्ठ सेवेबद्दल दिला. मदर तेरेसाचे विचार स्फुटलेखांद्वारे ए गिफ्ट फॉर गॉड (१९७५) या पुस्तकात संकलित केले आहेत.
‘मदर ऑफ द मॅनकाइंड’ म्हणूनच तिच्या ठायी वसत असलेल्या मातृत्वाच्या भावनेला गौरवाने उल्लेखण्यात येते. तिचे कार्य अति- श्रमाचे आणि कष्टाचे आहे. पीडितांना प्रेम देऊन त्यांचे जीवन सुसह्यकरण्याचा तिचा प्रयत्न जगन्मान्य झाला आहे. अपरिमित, आभाररहित अखंड कष्ट म्हणजेच मदर तेरेसा, असे समीकरण झाले आहे.
No comments:
Post a Comment