Sunday, 30 August 2020

साने गुरुजी


महाराष्ट्राच्या भावशक्तीचे प्रतीक असलेला राष्ट्रभक्त व जनतेसाठी अंत:करण पिळून लिहिणारा एकमेवाद्वितीय साहित्यिक !


साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने ! त्यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या उदाहरणातून स्वावलंबनाचे  धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.


१९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. या संदर्भात गुरुजी म्हणतात ‘शाळेत जे शिक्षण तुम्हाला घेता येत नाही, असे खरे विचारप्रवर्तक शिक्षण, मने बनविणारे, विचार दृढ करणारे शिक्षण हे मासिक तुम्हाला देणार आहे.’ शिक्षकांबद्दल ते म्हणत, ‘खरा शिक्षक तो की, ज्याच्याभोवती गुळाच्या ढेपेला ज्याप्रमाणे मुंगळे चिकटतात, तशी मुले गोळा होतात.’


त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वत: खादीचाच वापर करत असत. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक, दुष्काळात शेतकर्‍यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य - या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले.  ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध केल्या. त्यातील ‘बलसागर भारत होवो’ सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने  त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.


‘बलसागर भारत होवो। विश्र्वात शोभूनी राहो।।

राष्ट्रार्थ प्राण हे उरले। मी सिद्ध मराया हो ।।’


या काव्यपंक्तींनी त्या काळात प्रेरणा निर्माण केली होती. आजही ही कविता तेवढीच परिणामकारक आहे.


समाजातील जातिभेद,अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसर्‍या पांडुरंगाला खर्‍या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.


स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते.ते स्वत: तामीळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबर्‍या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो.मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. आजही त्यांच्या कविता सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा देतात, काही कविता शाळाशाळांतून प्रार्थना म्हणून म्हटल्या जातात. साने गुरुजींनी स्फुर्तिदायी कविता लिहिल्या, ‘श्यामची आई’ सारखी सार्वकालिक सर्वोत्कृष्ट कादंबरी लिहिली;  त्यांनी ‘स्त्री जीवन’ हा जात्यावरच्या ओव्यांचा संग्रहही लिहिला, तसेच ‘भारतीय संस्कृती’ या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथाचे लेखनही केले. त्यांनी अन्य भाषांतील चांगल्या पुस्तकांचे मराठी भाषांतरही केले. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. ‘श्यामची आई’ ही सुप्रसिद्ध कादंबरीही त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचने’ सुद्धा विनोबजींनी (धुळे येथील तुरुंगातच) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला.


साने गुरुजी हे अतिशय हळव्या मनाचे व्यक्तिमत्त्व होते. विनोबाजी त्यांना यथार्थतेने अमृताचा पुत्र म्हणत. स्वातंत्र्यासाठी त्यांनी पराकोटीचा त्याग करून , मनापासून प्रयत्न केले होते. स्वतंत्र देशाची सुंदर स्वप्ने त्यांनी पाहिली होती. ती स्वप्ने साकार करण्यासाठी ते कष्टही करत होते. पण त्यांचे आदर्श विचार, त्यांच्या कल्पनेतील भारत यांच्या विपरीत अनुभव त्यांना येऊ लागले. त्यांच्या संवेदनशील मनाला हा विरोधाभास सहन झाला नाही. मनाच्या हताश अवस्थेतच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. म्हणूनच आचार्य अत्रे यांनी त्यांच्याबद्दल ‘मृत्यूचे चुंबन घेणारा कवी’ असे उद्गार काढले. ६० वर्षांनंतर आजही साधना हे साप्ताहिक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालविले जात आहे, तसेच आंतरभारती चळवळही त्यांचे अनुयायी पुढे नेत आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...