जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला असून त्या ठिकाणी मृतांची संख्याही अधिक आहे. दरम्यान, करोनाबाधितांची वाढती संख्या पाहता अमेरिकेनं आता प्लाझ्मा थेरेपीद्वारे रुग्णांवर उपाचार करणार असल्याची घोषणा केली. करोनाबाधितांच्या उपचारासाठी आता प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यात येईल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. अमेरिकेच्या एफडीएनंदेखील आपात्कालिन परिस्थितीत करोनाबाधितांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. याद्वारे ३० ते ५० टक्क्यांपर्यंत करोनाबाधितांचे प्राण वाचवले जाऊ शकतात, असा दावाही करण्यात आला आहे.
अमेरिकेचे आरोग्यमंत्री अॅलेक्स अझार आणि एफडीचे आयुक्त स्टिफन हेन यांनी ही घोषणा ऐतिहासिक असल्याचं म्हटलं. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्लाझ्मा थेरेपीनं करण्यात येणारे उपचार सुरक्षित असल्याचं सांगितलं. करोनावर मात केलेल्या रुग्णांचा प्लाझ्मा घेऊन तो करोनाबाधितांना दिला जाणार आहे. त्यानंतर रुग्णांची बरे होण्याची शक्यता वाढणार असल्याचं हेन यांनी सांगितलं. कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरपीमुळे करोनामुळे होणारे मृत्यू ३० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मदत मिळेल, असा दावा मेयो क्लिनिकच्या एका सर्वेक्षणाद्वारे करण्यात आला आहे.
*कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?*
या उपचार पद्धतीला अलीकडेच अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानेही प्रयोग- पाहणीच्या तत्त्वावर मान्यता दिली आहे. यात विशिष्ट रोगातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा त्याच आजाराच्या अन्य रुग्णांच्या शरीरात वापरला जातो. प्लाझ्मामध्ये आपल्या रक्तपेशी असतात. त्यात अॅण्टिबॉडीजदेखील असतात. त्या शरीरावर होणाऱ्या बाह्य़ आक्रमणाला परतवून लावण्यात आघाडीवर असतात. एकदा तसं झालं की आपल्या रक्तपेशी पुन्हा त्याच प्रकारचं आक्रमण झालं तर आधीचं आक्रमण लक्षात ठेवून वेळीच शत्रूला ओळखतात आणि त्याचा प्रतिकार करतात.
कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरपी पॅसिव्ह इम्युनिटी या जुन्या संकल्पनेनुसारच काम करते. उदाहरणार्थ काही आजारांच्या अॅण्टिबॉडीज घोडय़ामध्ये विकसित केल्या गेल्या आणि नंतर त्या माणसाला टोचण्यात आल्या. तर बीसीजी लस हे अॅक्टिव्ह इम्युनिटीचं उदाहरण आहे. ती शरीरात टोचून अपेक्षित प्रतिकारशक्ती वाढवली जाते. ग्युटन आणि हॉल यांच्या वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमातील पुस्तकांतील उल्लेखानुसार कोणतेही अँटीजेन न टोचता माणसामध्ये तात्पुरती प्रतिकारशक्ती निर्माण करता येऊ शकते. अॅण्टिबॉडीज देणं, टी सेल कार्यरत करणं किंवा अन्य व्यक्तीच्या रक्तातून या दोन्ही घटकांचा पुरवठा करणं किंवा ज्या प्राण्याच्या शरीरात अॅण्टीजेन घातलेले आहेत त्याच्याकडून या गोष्टी मिळवणं यातून प्रतिकारशक्ती वाढवता येते. या अॅण्टिबॉडीज रुग्णाच्या शरीरात दोन ते तीन आठवडे टिकून राहू शकतात. त्या काळात त्या रुग्णाचे त्या रोगापासून संरक्षण होते. दुसऱ्या माणसाच्या शरीरातून घेतलेल्या टी सेल्स काही आठवडे; तर प्राण्याच्या शरीरातून घेतलेल्या टी सेल्स काही तास ते काही दिवस टिकून राहू शकतात. या प्रकाराच्या रक्तप्रदानाला पॅसिव्ह इम्युनिटी असं म्हटलं जातं. टी सेल्स या रक्तपेशींची प्रतिकारशक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका असते.
No comments:
Post a Comment