Wednesday, 12 August 2020

पशींच्या स्वभक्षणाचा ‘नोबेल’ शोध कसा घडला?



जपानचे योशिनोरी ओसुमी हे संशोधनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असले तरी त्यांनी पेशींच्या स्वभक्षणावर संशोधनासाठी १९८८ मध्ये वेगळी प्रयोगशाळा सुरू केली. मानवी शरीरात लायसोसोम नावाचा जो भाग असतो त्यातील ऑरगॅनेलीत प्रथिनांचा ऱ्हास कसा होतो, याचा शोध घेताना त्यांनी यिस्टच्या पेशींचा अभ्यास केला. मानवी शरीरातील पेशींचा मृत्यू व नवीन पेशी निर्माण होणे या प्रक्रियेत बिघाड झाला तर अनेक रोग होतात.

पेशींची आत्महत्या किंवा स्वनाश होतो पण यातही खराब पेशीतील काही भाग काढून ते लायसोसोमकडे फेरवापरासाठी पाठवले जातात. यिस्टच्या पेशी इतक्या लहान असतात की सूक्ष्मदर्शकातूनही ही प्रक्रिया उलगडणे शक्य नव्हते त्यामुळे ओसुमी यांनी नवीन युक्ती करताना यिस्टमधील व्हॅकुलीच्या प्रथिन ऱ्हासाची प्रक्रिया प्रथम बिघडवली व त्याचा परिणाम पेशींचे स्वभक्षण म्हणजे ऑटोफॅगीवर काय होतो ते तपासले. यिस्टच्या पेशीत उत्परिवर्तन करून त्यांच्यातील ऑटोफॅगी प्रक्रिया थांबवून परिणाम तपासले. त्यानंतर व्हॅक्युओलीत ऱ्हास न झालेल्या प्रथिनांची म्हणजे व्हेसिकलची गर्दी झाली. या प्रक्रियेशी संबंधित जनुकेही त्यांनी शोधून काढली. त्याबाबतचा शोधनिबंध १९९२ मध्ये प्रसिद्ध झाला. १९५० मध्ये पेशींमधील ऑर्गनेलीचा शोध लागला होता. त्यात प्रथिने, कबरेदके व मेद यांना पचवणारी विकरे शोधली गेली होती. पेशीतील हे कार्य करणारा भाग म्हणजे लायसोसोम व तेथे पेशी नष्ट केल्या जातात किंवा ज्यात शक्य असेल तिथे दुरुस्त केल्या जातात. लायसोसोमच्या शोधासाठी बेल्जियमचे ख्रिस्तीयन द डय़ुव यांना १९७४ मध्ये वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.

योशिनोरी ओशुमी हे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणजे मायक्रोबायॉलॉजिस्ट असून त्यांचा जन्म १९४५ मध्ये जपानमधील फुकुओका येथे झाला. १९७४ मध्ये ते टोकियो विद्यापीठातून पीएच.डी. झाले. ते रसायनशास्त्राकडे वळले पण त्यात फार संधी नाही, असे समजल्याने ते रेणवीय जीवशास्त्राकडे वळले. त्यांना नोकरी नव्हती, मग त्यांनी एका विद्यापीठात उंदरातील बाह्य़पात्र फलनाचा अभ्यास केला. नंतर एकदम त्यांनी यिस्टच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या ज्या शोधाला नोबेल मिळाले. तो शोध त्यांनी वयाच्या ४३व्या वर्षी लावला होता. आता ते टोकियो इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्राध्यापक आहेत. पेशींचा स्वनाश तसेच त्यांच्या काही भागांचा फेरवापर शरीरात कसा होतो हे त्यांनी यिस्टवरील संशोधनातून सिद्ध केले आहे. ऑटोफॅगी प्रक्रिया बिघडण्यास कारण ठरणारी जनुकेही त्यांनी शोधली, हे मोठे आव्हानात्मक काम होते. लायसोसोमवरील संशोधन त्यांनी निर्णायक पातळीवर नेले. ते वैद्यकशास्त्रात नोबेल मिळवणारे जपानचे सहावे संशोधक आहेत. आतापर्यंत जपानच्या २३ जणांना विविध शाखांत नोबेल मिळाले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...