आज देखील काही संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. हे आजार योग्य काळजी घेतल्यास टाळता येऊ शकतात. असाच एक आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. या आजाराचे प्रमाण पावसाळ्यात वाढते म्हणून त्यासंदर्भात दक्षता घेणं गरजेचं आहे.
संसर्गजन्य आजारांमुळे मानवजातीला आतापर्यंत भरपूर नुकसान सोसावं लागलं आहे. पण प्रगत विज्ञानामुळे आणि निरनिराळ्या लसी आणि अँटीबायोटिक्सच्या सहाय्याने, संसर्गजन्य रोगांचे प्रमाण काही अंशी अटोक्यात आणण्यास यश आलं आहे. मात्र आज देखील काही संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. हे आजार योग्य काळजी घेतल्यास टाळता येऊ शकतात. असाच एक आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. या आजाराचे प्रमाण पावसाळ्यात वाढते म्हणून त्यासंदर्भात दक्षता घेणं गरजेचं आहे. लेप्टोस्पायरोसिस हा आजार झूनॉटिक (Zoonotic म्हणजे प्राण्यांपासून मनुष्याला होणारा) आजारांच्या श्रेणीमधील आहे.
लेप्टोस्पायरा नामक स्पायरोचीट या जातीच्या विषाणू (Bacteria) पासून तो होतो. प्रथम लेप्टोस्पायराचे जिवाणू सस्तन प्राणी (Mammals) जसे, उंदीर, मांजर, कुत्री, गाय, डुक्कर इत्यादीमध्ये ससंर्ग करतात आणि या प्राण्यांच्या मूत्र (Urine) वाटे, हे जिवाणू पाणी अथवा जमिनीत मिसळतात. लेप्टोस्पायराचे जिवाणू असलेल्या पाण्याशी आणि ओलसर जमिनीशी संपर्क आल्यास मनुष्यास या जिवाणूची लागण होते. त्वचेची अखंडता बाधीत झाल्यास, जसे त्वचेला जखम असल्यास, लेप्टोस्पायरा शरीरात प्रवेश मिळवू शकतात. तसंच डोळे, नाक, तोंड आणि जनेंद्रीयांच्या ओलसर त्वचेतून (Mucosa) देखील लेप्टोस्पायरा शरीरात प्रवेश करू शकतात.
सर्वाधिक धोका कोठे ?
लेप्टोस्पायरोसिस होण्याचा धोका पावसाळ्यात सर्वाधिक असतो. तुंबलेलं पाणी, पाण्याची छोटी मोठी तळे किंवा पुराचे पाणी ज्यामध्ये लेप्टोचे जिवाणू आहेत. अशा पाण्याशी संपर्क आल्यास, लेप्टोस्पायरोसिसची लागण होऊ शकते. तसंच प्राण्यांशी संपर्क येणारे व्यक्ती (उदा. वेटिरिनरी व्यवसाय, प्रयोगशाळेत काम करणारे आणि प्राण्यांच्या कत्तलखान्यात काम करणाऱ्या व्यक्तींना देखील या आजाराचा धोका अधिक असतो.
आजाराची लक्षणं :
रूग्णास फ्ल्यू सदृष्य आजाराची लक्षणं दिसून येतात. जसं ताप, थंडी, अंगदुखी, खोकला, डोक दुखी, स्नायूंचं दुखणं, डोळे लाल होणं इत्यादी. बरेच रूग्ण एखाद्या आठवड्याच्या कालावधीनंतर ताप कमी होऊन बरे होतात. पण काही रूग्णांमध्ये ३-४ दिवस बरं वाटल्यावर पुन्हा लक्षणं सुरू होतात आणि ती गंभीर स्वरूपाची असू शकतात. शरीरातील मुख्य अवयवांना बाधा होते आणि Multisystem Involvement मुळे रूग्ण दगावू शकतो.
या अवयवांना बाधा होऊ शकते :
यकृत (Liver) : कावीळीची लक्षणं दिसतात मूत्रपिंड (Kidney) : मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होऊन ते निकामी होऊ शकते. लघवीचे प्रमाण कमी झाल्यास तात्पुरतं डायलेसीस करावं लागू शकतं. फुप्फुस : फुप्फुसाला बाधा झाल्यास, रूग्णास खोकला, छातीत दुखणं व खोकल्यातून रक्त येऊ शकते. श्वासोच्छश्वासाच्या त्रासासारखी गंभीर समस्या उद्भवून कृत्रिम श्वासोच्छश्वासाचे यंत्राची रूग्णास गरज भासू शकते. तसंच रक्तातील पेशी कमी होऊन अंगावर लाल ठिपके अथवा लाल-काळे चट्टे उमटू शकतात. नाकातोंडातून अथवा लघवीद्वारे रक्तस्त्राव होऊ शकतो. वरील सर्व लक्षणं, लेप्टोस्पायरोसिस या विशिष्ट आजाराची नसल्यामुळे डेंग्यू किंवा कॉम्प्लिकेटेड मलेरिया, इत्यादी आजार असल्याची संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते.
निदान :
लेप्टोस्पायरोसिसच्या जिवाणूंविरूद्ध शरिरातील अँटिबॉडिज (Antibodies) ची चाचणी ELISA, MAT किंवा PCR टेस्टे द्वारे करून लेप्टोस्पायरोसिसचे निदान करता येते. * तसंच लिव्हर आणि किडणी या चाचण्या (lft, rft) सी.बी.सी, एक्स-रे या द्वारे निदान करण्यास मदत होऊ शकते.
उपचार :
सौम्य स्वरूपाचा आजार असल्यास बाह्य रूग्ण विभागातून गोळ्या-औषध घेणं आणि गुंतागुंतीच्या वरील नमूद केलेल्या लक्षणांबद्दल सतर्क राहाणं तसंच डॉक्टरांच्याच सल्ल्याने औषधोपचार करणं गरजेचं आहे.
प्रतिबंध :
लेप्टोस्पायरोसिसच्या प्रतिबंध करणं महत्त्वाचं आहे. घरामध्ये आणि वस्त्यांमध्ये स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून उंदरांचे प्रमाण वाढणार नाही. पावसाळ्यात योग्य काळजी घेणं, साचलेल्या पाण्यात अथवा पुराच्या पाण्यातून मार्गक्रमण करणं टाळणं, विशेषतः पायास जखम असल्यास. लेप्टोस्पायरोसिसची साथ असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने Doxycycline 200 mg आठवड्यातून एक टॅबलेट घेतल्यास काही प्रमाणात संरक्षण मिळू शकेल.
No comments:
Post a Comment