Tuesday, 21 February 2023

गाडगे महाराज




गाडगे महाराज (जन्म: फेब्रुवारी २३, १८७६- मृत्यु: २० डिंसेंबर १९५६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

बालपण :
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते.
डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

सामाजिक सुधारणा :
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.
"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश "
गाडगेबाबा प्रबोधन काव्य
भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
दुःखी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!

संक्षिप्त चरित्र :-
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.
१९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.
१९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले.
१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.
"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले.[१]
आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
१९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.
गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.
२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.

गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते.

गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर :
१४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."
तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

गाडगेबाबांचे विचार :
एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना...समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचार्‍या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ?

त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?"
पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा पण आम्हालाबी ब्राह्मण करा."

गाडगे महाराज यांच्यावरील पुस्तके :
The Wandering Saint (वसंत शिरवाडकर) - श्री गाडगे बाबा प्रकाशन समिती, मुंबई
आपले संत (एस.ए. कुलकर्णी) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९३)
कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे) -लोकवाड्मय गृह, मुंबई (१९९२)
गाडगेबाबा (वसंत पोतदार) -अक्षर प्रकाशन, मुंबई (१९९९)
गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी) - विजयश्री प्रकाशन, अमरावती (१९९३)
गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार) -योगेश प्रकाशन, पुणे (१९९३)
दिव्याला गाडगे महाराज (गो. भट) -नवलवय मुद्रणालय, अहमदाबाद (१९८२)
मानवता के पुजारी संत श्री गाडगे बाबा (स्यमंत सुधाकर) -गाडगेबाबा प्रकाशन समिती, मुंबई (१९९०)
मुलांचे गाडगेबाबा (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला कोल्हापूर (१९९२)
लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य (द.ता. भोसले) -ग्रंथाली, मुंबई (२००७)
श्री. संत गाडगे महाराज (मधुकर केचे) -साकेत प्रकाशन, औरंगाबाद (२००४)
श्री. संत गाडगे महाराज (गो.नी. दांडेकर) -मॅजेस्टिक, प्रकाशन मुंबई (१९९५)
श्री. संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पा.बा. कवडे) -अण्णासाहेब कोरपे चॉरिटेबल ट्रस्ट, अकोला (१९९४)
श्री. गाडगे महाराज गौरव ग्रंथ (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
श्री. गाडगे महाराज शेवटचे कीर्तन (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९५)
श्री. गाडगेबाबांचे विचार (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला, कोल्हापूर (१९९६)
श्री. गाडगेबाबांची पत्रे (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९१)
श्री. संत गाडगेबाबा विचार धन (ह.रा. हिवरे) -नारायणराव अमृतराव लभडे प्रकाशन (१९९९)
संत गाडगे महाराज (डॉ. श्याम दयार्णव कोपर्डेकर) - (१९९६)
संत गाडगे बाबांच्या आठवणी (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)

संकीर्ण :
डेबू हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.
देवकीनंदन गोपाळा हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.

पुरस्कार :
गाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान चालवले जाते. त्यांच्या नावाने काही पुरस्कारही देण्यात येतात.
१. महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार
२. पिंपरी शहर लॉन्ड्री संघटनेचे (अ) राष्ट्रसंत गाडगेबाबा सामाजिक जाणीव पुरस्कार.(ब) राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...